आदिवासी विकास विभागात आणि महामंडळात शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार २००४ ते २००९ या कालावधीत झाल्याचा ठपका माजी न्यायमूर्ती एम जी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ठेवला असून त्याची जबाबदारी तत्कालीन मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यावर टाकली आहे. 

या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी आणि फौजदारी कारवाई करण्याची मागणी असलेली जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित असून न्यायालयापुढे सुमारे तीन हजार पानी चौकशी अहवाल सादर झाला आहे.

आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने डॉ. गावित यांच्या कार्यकाळात अनेक योजना राबविण्यात आल्या. या खात्यात मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार झाले आणि आदिवासींसाठी अनेक योजनांमध्ये सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला, असा आरोप करणारी याचिका बळीराम मोतीराम व गुलाब पाटील यांनी अ‍ॅड. राजेंद्र रघुवंशी यांच्यामार्फत केली असून गेली काही वर्षे त्यावर सुनावण्या झाल्या. चौकशीच्या मागणीनंतर माजी न्यायमूर्ती गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली व त्यांनी तीन वर्षांच्या कालावधीत २००४ ते २००९ या काळातील गैरव्यवहारांची चौकशी केली.

अर्जदारांनी २०१२ पर्यंतच्या अनेक खरेदी प्रकरणांच्या चौकशीची मागणी केली असून गावित यांच्याबरोबरच बबनराव पाचपुते, राजेंद्र गावित व शरद गावित यांच्यावरही आरोप होते. पण त्यांच्याविरुद्ध पुरावे न मिळाल्याने आणि २००९ पर्यंतच चौकशी केल्याने समितीने त्यांच्यावर ठपका ठेवलेला नाही.


देवनार पोलीस ठाण्यापासून सुरुवात केलेल्या पोलिसांच्या ८ तास सेवेला एक वर्षपूर्ण झाले आहे. वर्षभरात पोलिसांना ८ तास सेवेचा प्रयोग यशस्वी पार पाडल्यामुळे सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे

पोलीस आयुक्त पडसलगीकर यांच्यासह सहआयुक्त देवेन भारती आणि अप्पर पोलीस आयुक्त लख्मी गौतम यांनी देवनार पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला हजेरी लावत पोलीस दलाकडून समाधानी असल्याचे मत व्यक्त केले.

मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यात पोलिसांना ८ तास सेवा देण्याचा मानस पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार मुंबईतील देवनार पोलीस ठाण्याच्या रवींद्र पाटील यांनी गेल्या वर्षी मार्च महिन्यात पोलिसांच्या आठ तास डयुटी कशी करता येऊ शकते याची एक प्रतिकृती तयार केली होती.

त्यानंतर पोलीस आयुक्तांनी मार्च महिन्यापासून हा प्रस्ताव प्रायोगित तत्वावर राबविण्यास मंजूरी दिली. मे महिन्यापासून देवनारसह काही पोलीस ठाण्यात आठ तासांची ड्युटी सुरू करण्यात आली.

कामकाज सुरळीत चालत असल्याचे लक्षात येताच अन्य पोलीस ठाण्यांनीही हा उपक्रम राबविण्यात आला. देवनार पोलीस ठाण्यापासून सुरुवात करण्यात आलेल्या या प्रयत्नांना एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच मुंबईच्या सर्व पोलीस ठाण्यात ८  तास सेवा सुरु करण्यात येणार  आहे.


एकाच प्रक्षेपकातून तब्बल 104 उपग्रह पाठविण्याचा विश्‍वविक्रम भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) केला, त्याचे जगभरातून कौतुक झाले. त्यानंतर आता इस्त्रोने एक सोलर हायब्रिड इलेक्ट्रिक कार तयार केली आहे. ही कार संपूर्णत: स्वदेशी बनावटीची आहे. 

तिरुअनंतपुरम येथे विक्रम साराभाई अंतराळ संशोधन केंद्र येथे या कारचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. ही पर्यावरणपुरक कार उंच, सखल भागावर देखील चालविता येत असल्याचे इस्त्रोने म्हटले आहे. 

पेट्रोल, डिझेल सारख्या इंधनावर चालणाऱ्या गाड्यांमुळे सध्या पर्यावरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या नव्या कार सारखी वाहने बाजारात आल्यास प्रदुषण मुक्त अशी पर्यायी वाहतुक व्यवस्था निर्माण होऊ शकते असेही इस्त्रोने म्हटले आहे. 

इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, या कारमध्ये हाय एनर्जी लिथियम बॅटरी बसविण्यात आली आहे. ही बॅटरी सूर्यप्रकाशावर चार्ज करता येणे शक्य आहे. अशा प्रकारची कार बनवितांना कारवर सोलार पॅनल बसविणे आणि त्याची बॅटरीशी जोडणी करणे हे मोठ आव्हान असल्याचे इस्त्रोने म्हटले आहे. 


Top