भारतीय वंशाच्या हिंदुजा बंधूंनी ब्रिटनमधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असण्याचा मान मिळवला आहे. हिंदुजा समूहाची संपत्ती १६.२ अब्ज पौंड असून मागील वर्षापेक्षा यंदा त्यांच्या संपत्तीमध्ये ३.२ अब्ज डॉलरची वाढ नोंदविण्यात आली आहे.

हिंदुजा बंधूंसह ब्रिटनमधील १००० प्रमुख अतिश्रीमंतांच्या यादीमध्ये ४० अन्य भारतीय वंशाच्या व्यक्तींचा समावेश आहे."द संडे टाइम्स रिच लिस्टने" ब्रिटनमधील श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. मागील वर्षी युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या निर्णयाचा ब्रिटनमधील अब्जाधीशांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे "द संडे टाइम्स रिच लिस्ट"मध्ये नमूद करण्यात आले आहे.

याउलट ब्रिटनमधील अब्जाधीश १४ टक्‍क्‍यांनी वाढले असल्याचेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे. ब्रिटनमधील प्रमुख भारतीय वंशाच्या अब्जाधीशांच्या यादीत श्रीचंद आणि गोपीचंद हिंदुजा, डेव्हिड आणि सिमन रुबेम, लक्ष्मी मित्तल, मोहसीन आणि झुबेर इस्सा, लॉर्ड स्वराज पॉल, प्रकाश लोहिया, अनिल अगरवाल, सुनील वासवानी, नवीन आणि वर्षा इंजिनिअर, जसमिंदर सिंह, भिक्‍खू आणि विजय पटेल, जटानिया बंधू, अनिश कपूर यांचा समावेश आहे.


फ्रान्सच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इमॅन्युएल मॅक्रॉन यांना जनतेने कौल दिला आहे. मॅक्रॉन यांनी उजव्या विचारसरणीच्या मरीन ल पेन यांचा पराभव केला. मॅक्रॉन हे नेपोलियन बोनापार्टनंतरचे फ्रान्सचे सर्वांत तरुण नेते ठरले आहेत. मॅक्रॉन हे माजी इन्व्हेस्टमेंट बॅंकर असून, ते ३९ वर्षांचे आहेत.

देशाचे ते सर्वांत तरुण अध्यक्ष ठरणार आहेत. प्राथमिक अंदाजानुसार मॅक्रॉन यांना ६५-६६ टक्के आणि ल पेन यांना ३३-३४ टक्के मते मिळाली आहेत. फ्रान्सच्या अध्यक्षपदासाठी ६५.३ टक्के मतदान झाले होते. अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी १९६९ नंतर हे सर्वांत कमी मतदान आहे.

उजव्या विचारसरणीच्या नॅशनल फ्रंट पक्षाच्या नेत्या मरीन ल पेन आणि एन मार्श या पक्षाचे संस्थापक इमॅन्युएल मॅक्रॉन हे रिंगणात होते.पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मतदानाच्या पहिल्या फेरीत इतर सर्व उमेदवारांमध्ये या दोघांनीच आघाडी घेतली होती. त्यामुळे स्पष्ट बहुमतासाठी आज "रन ऑफ" फेरी झाली.


आता मूळची बारामतीची आणि सध्या ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेल्या राजगौरी सुरजकुमार पवार हिने "ब्रिटिश मेन्सा" बुद्‌ध्यांक चाचणीमध्ये १६२ गुण मिळवत नवा विक्रम केला आहे. यामुळे राजगौरीचा बुद्‌ध्यांक थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन आणि स्टीफन हॉकिंग यांच्यापेक्षाही दोन गुणांनी अधिक भरला आहे.

अवघे बारा वर्षे वय असणाऱ्या राजगौरीने उच्च बुद्‌ध्यांकासाठी ओळखल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध "ब्रिटिश मेन्सा" या संस्थेचे सदस्यत्वही मिळवले आहे. मागील महिन्यामध्ये मॅंचेस्टरमध्ये झालेल्या "ब्रिटिश मेन्सा आयक्‍यू" परीक्षेत राजगौरी सहभागी झाली होती. या परीक्षेमध्ये तिला १६२ गुण मिळाले होते.

एखाद्या अठरा वर्षांखालील मुलीने एवढे गुण संपादन करणे हा विक्रमच समजला जातो. "चेशायर काउंटी" मधील एक टक्का विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, त्यात राजगौरीही होती. ब्रिटनमध्ये ज्यांचा बुद्‌ध्यांक अत्युच्च समजला जातो, अशा २० हजार व्यक्तींमध्ये १५०० विद्यार्थी असून, त्यात राजगौरीचाही समावेश आहे. राजगौरीचे वडील डॉ. सूरजकुमार पवार हे मूळचे बारामतीचे. मॅंचेस्टर विद्यापीठातील नोकरीच्या निमित्ताने ते ब्रिटनमध्ये स्थायिक झाले.

सध्या ते तेथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असून, त्यांच्या सौरऊर्जेच्या संशोधनाची ब्रिटन सरकारनेही दखल घेतली आहे. आता बुद्‌ध्यांक परीक्षेत सर्वोत्तम गुण प्राप्त करणारी सर्वांत लहान वयाची मुलगी ठरण्याचा मानही राजगौरी हिला मिळाला आहे. राजगौरीला भविष्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले.


Top