भारताची वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी हिने महिला वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेटचा उच्चांक प्रस्थापित केला. तिने ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज कॅथरीन फिट्झपॅट्रीक हिचा १८० विकेटचा विश्वविक्रम मोडला. झूलन ३४ वर्षांची आहे.

"महिला क्रिकेटची कपिल देव" अशी तिची ओळख आहे. दक्षिण आफ्रिकेतील चौरंगी क्रिकेट स्पर्धेत तिने हा टप्पा गाठला. १५३ सामन्यांत तिच्या १८१ विकेट झाल्या. कॅथरीनने १०९ सामन्यांत १८० विकेट घेतल्या होत्या.


जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट वयाच्या ८५ व्या वर्षी चढण्याच्या प्रयत्नात नेपाळचे मिन बहादूर शेरचान मृत्युमुखी पडले. या घटनेमुळे एव्हरेस्ट चढण्यासाठी वयोमर्यादा घालण्याचा विचार नेपाळचे प्रशासन करीत आहे. यापूर्वी शेरचान यांनी २००८ मध्ये ७६ वर्षांचे असताना एव्हरेस्ट शिखर सर केले होते.

त्यावेळी ही कामगिरी करणारे ते जगातील सर्वांत जास्त वयाचे गिर्यारोहक ठरले होते. मात्र २०१३ मध्ये ८० वर्षीय जपानी नागरिक युईचिरो मिउरा यांनी हा नवा विक्रम प्रस्थापित केला. तो मोडण्यासाठी शेरचान यांनी ही मोहीम सुरू केली होती, मात्र यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

नेपाळच्या नियमांनुसार एव्हरेस्टवर चढण्यासाठी किमान वय 16 असणे आवश्यक आहे. मात्र, कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर शनिवारी संध्याकाळी ८५ वर्षीय शेरचान यांना प्राण गमवावे लागले. यापूर्वी, शैलेंद्रकुमार उपाध्याय या ८२ वर्षीय व्यक्तीने २०११ मध्ये एव्हरेस्ट चढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला.


Top