message for students

स्पर्धा परिक्षा : समज – गैरसमज


प्रिय विद्यार्थी मित्र – मैत्रिणींनो,

आजच्या या स्पर्धात्मक युगामध्ये लाखो स्पर्धक परिक्षा देत असतात आणि या स्पर्धा परिक्षामधून आपण यशस्वी व्हावे असे सर्वांनाच वाटत असते. परंतु ज्या स्पर्धकांचा स्वतःच्या क्षमतेवर पूर्णपणे विश्वास असतो तो स्पर्धकच या स्पर्धापरीक्षेमध्ये यशस्वी होतो.

आजच्या या आधुनिक युगामध्ये M.P.S.C. सारख्या स्पर्धा परीक्षेचे महत्व दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यामुळे या सर्व बाबींची योग्य ती जाणीव असणारे व स्पर्धा परीक्षांचे नियोजनबद्ध तंत्र आत्मसात करणारे स्पर्धकच आपले भवितव्य उत्कृष्ट बनवू शकणार आहेत. यामध्ये काही शंकाच असणार नाही. परंतु डिग्री सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडलेल्या लाखो तरुणाने स्वतः आपले आत्मपरीक्षण करावे, ‘मी कोण आहे?’ ‘मला काय बनायचे आहे?’ आणि ‘माझे कर्तव्य काय आहे?’ त्यानुसार त्याने आपले ध्येय निश्चित करावे. कारण आपल्यापैकी बऱ्याच स्पर्धकांना या स्पर्धा परीक्षेची संपूर्णपणे माहितीच नसते. तसेच पोलीस अधिक्षक, तहसीलदार सारख्या नोकऱ्या अथवा पद माहीत असतात; परंतु या नोकऱ्या कशा मिळवाव्यात याबद्दल स्पर्धकाला काहीच माहिती नसते. या पदाचे फॉर्म कधी निघतात? ते कसे भरले जातात? पदवीधर झाल्यानंतर सरळ नोकरी लागते का? अशा अनेक प्रश्नांमध्ये स्पर्धक वर्ग आणि पालक अडकून पडलेले असतात. परंतू काही अपवादात्मक स्पर्धक पाहिले असता काहींना या नोकऱ्यांबद्दल तसेच भरती प्रक्रियेबद्दल माहिती असते; परंतु अभ्यास कसा करावा? याबद्दल शंका असते.

वास्तविक पाहता MPSC यांसारख्या स्पर्धा परिक्षांचा अभ्यासक्रम जरी खूप विस्तारित व मोठा असला तरी जो स्पर्धक नियोजनबद्ध, जिद्दीने आणि मेहनतीने अभ्यास करतो तोच स्पर्धक या स्पर्धापरिक्षेमध्ये यशस्वी होतो. कारण या स्पर्धा परिक्षेद्वारे उमेदवाराची/स्पर्धकांची बुद्धिमत्ता, त्याला निर्माण झालेल्या समस्यांचे निवारण तो कशाप्रकारे करतो या सर्व बाबी येथे तपासल्या जातात. आणि म्हणूनच या स्पर्धा परिक्षेमध्ये तुम्हाला जर यश मिळवायचे असेल तर सर्वप्रथम आपले ध्येय निश्चित करा. एकदाचे ध्येय निश्चित झाल्यावर आपले ध्येय यशस्वी करण्यासाठी स्वतःला आपण त्या कार्यात पूर्णपणे झोकून द्यावे. कारण या स्पर्धा परिक्षेमध्ये जर यश मिळवायचे असेल तर हे आव्हान अगदी मनापासून स्वीकारले पाहिजे. या परिक्षेबाबत थोडे जरी गैरसमज आपल्या मनात निर्माण झाले तर आपल्या जीवनातून फार मोठी संधी आपण गमावित आहोत आणि एकदा का अशी मोठी संधी हातातून निघून गेल्यावर रडत बसण्याला, अभ्यासाला वेळ मिळाला नाही आणि नशिबाला दोष देण्याला काहीही अर्थ उरत नाही.

ज्यावेळी एखादा स्पर्धक आपल्या स्पर्धा परिक्षेचे ध्येय निश्चित करतो तेव्हा त्याने आपले ध्येय जिद्दीने पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील आणि जागरूक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येक स्पर्धकाला आपल्या परिस्थितीची पूर्णपणे जाणीव असते आणि त्यामुळे आपली परिस्थिती आपणच बदलू शकणार आहोत. या स्वतःच्या आत्मविश्वासावर कायम राहून आपले अधिकारी बनायचे स्वप्न पूर्ण करून आपण आपले व आपल्या कुटुंबियाचे नावलौकिक करावे.

जो स्पर्धक या स्पर्धापरिक्षेशी संघर्ष करतो तोच या स्पर्धा परिक्षेत टिकून राहतो. त्यामुळे या स्पर्धापरिक्षेमध्ये एखादे जरी पद मिळवायचे असेल तर आपणास खूप मेहनत घ्यावीच लागेल. याचे भान ठेवून प्रत्येक स्पर्धकाने MPSC च्या स्पर्धा परिक्षेच्या युद्धाला तयार व्हावेत. कारण स्पर्धा परिक्षेचे फॉर्म भरणारे लाखो स्पर्धक आपणास भेटतात. परंतु जिद्दीने व नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करणारे स्पर्धक अगदी हातात बोटावर मोजण्याएवढेच असतात. त्यामुळे योग्य ते वेळापत्रक येणाऱ्या प्रत्येक महिन्याच्या दिवसाला, प्रत्येक स्पर्धकाने स्वतः स्वतःला विचारले की, “मी दिवसभरात काय केले? किती अभ्यास केला? आणि किती प्रश्नसंच सोडविले याचा पुरेपूर मनस्वी विचार करावा. कारण आजची गोष्ट उद्यावर ढकलणारा स्पर्धक आपल्या आयुष्याचे सोने करीत नाही. आणि त्यामुळेच प्रत्येक स्पर्धकाने या सर्व बाबींचा जाणीवपूर्वक विचार करून अभ्यासास लागावे. आणि आपले ध्येय आत्मसात करण्यासाठी स्वतः चंदनाप्रमाणे झिजावे. कारण प्रत्येकांच्या आयुष्यात संधी ही एकदाच येते आणि आलेल्या संधीचा पुरेपूर सदुपयोग करून घेणे, हे प्रत्येक स्पर्धा परिक्षेत उतरलेल्या स्पर्धकांचे कर्तव्य असते. कारण गेलेले वर्ष, महिने, दिवस, गेलेले वय आणि वेळ या सर्व बाबी आपल्या आयुष्यात पुन्हा कधीच येत नाही. त्यामुळे या परिक्षेविषयी आढळणारे गैरसमज यांचे योग्य त्या वेळीच निराकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

याच गैरसमजातील आणखी एक गैरसमज असा आहे की, या स्पर्धा परिक्षा तोच विद्यार्थी/स्पर्धक यशस्वी होतो जो शाळा, कॉलेजमध्ये गुणवत्ता यादीमध्ये येतो. परंतु वास्तविक पाहता MPSC च्या स्पर्धा परिक्षेमध्ये अशा विध्यार्थ्यांचे प्रमाण अल्प असते व उर्वरित स्पर्धक हे सर्वसाधारण शैक्षणिक पार्श्वभूमीवरील असतात. म्हणूनच पदवी शिक्षण पूर्ण केलेले प्रत्येक स्पर्धक या स्पर्धापरिक्षेची पूर्णपणे विचार करू शकतो. परंतु अशा या स्पर्धा परिक्षेची तयारी करताना कोणत्याही स्पर्धकाने कोणत्याही प्रकारच्या अफवांना अथवा गैरसमजुतीला बळी न पडता, न घाबरता, आत्मविश्वासाने परिक्षा द्याव्यात. कारण ज्या स्पर्धकांची नकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती असते. अशा स्पर्धकापासून इतर स्पर्धकाच्या मनामध्ये सुद्धा स्पर्धा परिक्षेविषयी गैरसमज निर्माण होतात. त्यामुळे आपण केलेल्या मेहनतींवर पूर्णपणे विश्वास ठेवून योग्य ती सावधगिरी बाळगून नियोजनबद्ध व वेळेचे भान ठेवून स्पर्धा परिक्षा द्याव्यात आणि अधिकारी बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण करावे.

कित्येक पालक – विध्यार्थ्यांच्या मनात इंग्रजी भाषेविषयी गैरसमज निर्माण झालेले असतात की, ज्या स्पर्धकाला / विद्यार्थ्याला इंग्रजी चांगल्याप्रकारे बोलता – लिहिता येते, तोच स्पर्धक या स्पर्धा परिक्षेमध्ये यशस्वी होतो. परंतु वास्तविक पाहता राज्यासेवेच्या मुख्य परिक्षेत समाविष्ट असणाऱ्या अनिवार्य इंग्रजी पेपरव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही पेपरमध्ये इंग्रजी भाषेचा प्रश्न निर्माण होत नाही.

थोडक्यात, इतर अभ्यासक्रमाच्या संदर्भात आणि त्यावर आधारित प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजीचे सर्वसाधारण अथवा विशेषीकृत ज्ञान अत्यावश्यक ठरत नाही. परंतु सध्याच्या या आधुनिक युगात आपणास किमान इंग्रजी लिहिता – वाचता येण्यासारखे आवश्यक ज्ञान प्रत्येक स्पर्धकाजवळ असतेच. अशा प्रकारे पूर्व व मुख्य परीक्षेचे दोन महत्वाचे टप्पे पार करून आलेल्या स्पर्धकापुढे मुलखातीविषयीही अनेक गैरसमजुती आढळतात. परंतु जो स्पर्धक पूर्व आणि मुख्य अशा दोन परिक्षेचे टप्पे पार पाडतो तो आपली पात्रता सिद्ध करीत असतो. हे लक्षात घेऊनच मुलाखत मंडळ त्या स्पर्धकाची मुलखात घेत असतात. त्यामुळे प्रत्येक स्पर्धकाने आपल्यावर कोणत्याही प्रकारचे दडपण येणार नाही. याची काळजी घेऊन येणाऱ्या प्रत्येक प्रश्नांचे आत्मविश्वासाने व कौशल्याने उत्तरांना सामोरे जावेत आणि चांगले गुण प्राप्त करून नेत्रदीपक यश मिळवावे.

अशाप्रकारे स्पर्धापरिक्षेची पद्धत व्यवस्थित समजून घ्या व स्पर्धापरिक्षेच्या तयारीसाठी योग्य दिशेने वाटचाल सुरु करा. जिद्दीने

स्पर्धापरिक्षेच्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा !

श्री. मनोहर ए. पाटील

संस्थापक

RELIABLE ACADEMY


Top

Whoops, looks like something went wrong.