john mccain

जॉन मॅक्केन


3996   27-Aug-2018, Mon

जॉन मॅक्केन हे अमेरिकेच्या राजकारणातील एक वेगळे रसायन होते. त्यामुळेच त्यांच्या जाण्याने तेथील लोकशाही मूल्यांचा खंदा पुरस्कर्ता, लढवय्या राजकारणी गेल्याचे शल्य कुणालाही वाटल्यावाचून राहणार नाही. जॉन मॅक्केन यांची अ‍ॅरिझोनातून पहिल्यांदा १९८६ मध्ये सिनेटर म्हणून निवड झाली. शेवटपर्यंत ते सिनेटर होते इतका लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास होता. २००८ मध्ये अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा बराक ओबामा यांनी पराभव केला होता. जय-पराजय हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नव्हते. प्रसंगी स्वपक्षाच्या विरोधात जाऊन मते मांडली. हे करण्यासाठी जे धाडस लागते ते त्यांच्याकडे होते, त्यामुळेच अमेरिकी राजकारणाची सुसंस्कृत परंपरा त्यांनी आणखी उंचीवर नेऊन ठेवली होती.

त्यांची कारकीर्दही नौदलातूनच सुरू झाली. अमेरिकेच्या प्रभावशाली सिनेटर्सपैकी एक असलेले मॅक्केन हे भारतमित्र होते. त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या २०१६ मधील अमेरिका भेटीवेळी सीएनएनसाठी लिहिलेल्या संपादकीयात एरवी मोजक्या मित्रदेशांना जवळ करणाऱ्या अमेरिकेने भारताला वेगळे स्थान दिल्याचे कौतुक केले होते. व्हिएतनाम युद्धात त्यांचे विमान पाडण्यात आले व नंतर त्यांना कैद करून छळ करण्यात आला. पाच वर्षे ते व्हिएतनाममध्ये तुरुंगात होते, ओबामा यांच्याविरोधातील लढतीच्या वेळी एका महिलेने प्रचाराच्या वेळी ओबामा हे ‘अरब’ आहेत, असे म्हटले होते, त्या वेळी त्यांनी तिच्या हातातला ध्वनिक्षेपक घेऊन ते अतिशय सभ्य, पण काही मूलभूत मुद्दय़ांवर आमच्या पक्षाशी मतभेद असलेले अमेरिकी नागरिक असल्याचे सांगितले होते. ओबामा यांच्या विजयानंतर त्याचे ऐतिहासिक महत्त्व समर्थकांसमोर सांगण्याची दिलदारीही त्यांच्याकडे होती.

रिपब्लिकन पक्षाने ओबामा हेल्थकेअर रद्द करण्यासाठी खूप प्रयत्न केल्यानंतरही मॅक्केन यांनी मात्र स्वपक्षाविरोधात मतदान केले होते. मॅक्केन यांनी ट्रम्प यांना कसून विरोध केला होता, कारण त्यांचा अर्धवटपणाचा राष्ट्रवादी बाणा त्यांना कधीच पसंत नव्हता. ट्रम्प यांना तर ते काटय़ासारखे न सलते तरच नवल. मॅक्केन यांनी ट्रम्प यांच्या स्थलांतर धोरणाला विरोध क रताना चुकीच्या धोरणांनी अमेरिका महान होणार नाही हे ठणकावून सांगितले होते. मृत्यू कोणाला टळत नसतो. जीवनात महत्त्वाची असते ती सभ्यता व चारित्र्य, त्यामुळेच आपण सुखी किंवा दु:खी बनतो, असे त्यांनीच एका पुस्तकात म्हटले आहे. गेल्या उन्हाळ्यातच त्यांना मेंदूचा कर्करोग झाल्याचे निदान झाले, पण तरी ते खचले नाहीत. त्यांच्या रूपाने सत्यवचनी राजकारणी व रोनाल्ड रेगन यांच्या राजकीय क्रांतीचा पाईक असलेला निष्ठावान रिपब्लिकन नेता गमावला आहे.

uri avnery

युरी अव्हेन्री 


5765   25-Aug-2018, Sat

‘छळाकडून बळाकडे’ असा प्रवास केलेल्या इस्रायलबद्दल अनेकांना कुतूहलयुक्त कौतुक असते. मात्र हिटलरी छळातून मुक्त होऊन राष्ट्र म्हणून बळ कमावल्यानंतरही इस्रायलने पॅलेस्टाईन व गाझा किनारपट्टीतील लोकांचा छळच आरंभला, हेही उघड आहे. इस्रायलच्या निर्मितीपासून पॅलेस्टिनी लोकांवर झालेल्या अत्याचारापर्यंतच्या कहाण्या जगभरातील लेखकांनी जगासमोर आणल्या आहेत. इस्रायलने पॅलेस्टिनी लोकांचा इतिहास बदलून टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना अमेरिका-इंग्लंडसारख्या बडय़ा देशांनी मदत केली, हेही अनेक पुस्तकांतून वाचायला मिळाले आहे. या लेखकांपैकी एक युरी अव्हेन्री हे इस्रायलमधील एक नावाजलेले पत्रकार, राजकीय नेते आणि लेखक होते.  स्वतंत्र पॅलेस्टाईनला मान्यता द्यावी या मताचे ते कट्टर समर्थक होते. त्यांनी स्वदेश- स्वधर्माचा रोष पत्करून सत्याची बाजू लावून धरली.

हेल्मट ऑस्टरमन हे त्यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म जर्मन ज्यू कुटुंबात झाला.नंतर ते ब्रिटिशांचा अंमल असलेल्या पॅलेस्टाईनमध्ये ते स्थलांतरित झाले. हिटलर तेव्हा नुकताच सत्तेवर आला होता. तेव्हा हेल्मट यांनी आपले नाव बदलून युरी असे ठेवले. नंतर ते लष्करात दाखल झाले. १९४८ च्या अरब-इस्रायल युद्धात त्यांनी भाग घेतला. लिखाणाची आवड असल्याने ते युद्धभूमीवरून ‘हारेत्झ’या दैनिकासाठी लिखाणही करत. या सर्व वार्तापत्रांचे ‘इन द फील्ड्स ऑफ फिलिस्तिया’ या नावाने पुस्तकही निघाले. १९५० मध्ये युरी व त्यांच्या तिघा मित्रांनी ‘हाओलम हाझे’ हे साप्ताहिक सुरू केले. अत्यंत स्पष्ट आणि परखड लिखाण ते करत असल्याने त्यांचा स्तंभ लोकप्रिय झाला होता. या लिखाणातून त्यांच्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ला झाला. त्यांच्या कार्यालयावर बॉम्ब फेकण्यात आले. एका गुंडाने त्यांच्यावर चाकूहल्ला करून त्यांच्या हाताची बोटे तोडण्यात आली. अशी अनेक अनेक संकटे आली तरी पत्रकारितेचा धर्म त्यांनी सोडला नाही.

युरी यांनी आपली राजकीय कारकीर्द ज्यूवादी- झायोनिस्ट चळवळीतून सुरू केली. भूमिगत राहून ब्रिटिश आणि पॅलेस्टिनी अरबांशी संघर्ष करणारी ही चळवळ होती. मात्र नंतर या चळवळीने इतरांवर दहशत बसविणारी, अन्याय्य हत्या करून जमीन ओरबाडण्याची कृत्ये सुरू झाल्याने ते या चळवळीतून बाहेर पडले. इस्रायलने १९८२ मध्ये लेबनॉनवर आक्रमण केले तेव्हा त्यांनी पॅलेस्टिनी मुक्ती संघटनेचे अध्यक्ष यासर अराफत यांची भेट घेऊन वाद ओढवून घेतला होता. १९९३ मध्ये युरी यांनी ‘गुश शॅलोम’ ही शांती आघाडी स्थापन केली. 

इस्रायलमध्ये उजव्या आणि कट्टर धर्माध पक्षांचा जोर वाढत असताना युरी यांनी नेहमी धर्मनिरपेक्षता आणि शांततेचाच पुरस्कार केला. हमास तसेच गाझा पट्टीतील पुरोगामी पॅलेस्टिनी गटांशीही बोलणी करण्यात काहीही गैर नाही हेच ते सांगत असत.  ते दोन वेळा पार्लमेंटवरही निवडून गेले. द सोल्जर्स टेल- द ब्लडी, इस्रायल विदाऊट झायोनिझम, माय फ्रेंड, द एनिमी ही त्यांची काही गाजलेली पुस्तके. कायम शांततेचा पुरस्कार करणारे अव्हेन्री गेल्या सोमवारी निवर्तले, पण त्याआधी त्यांनी आपल्या साप्ताहिकातील स्तंभ लिहून पूर्ण केला होता.

 upsc physical geography

यूपीएससीची तयारी : प्राकृतिक भूगोल


6080   23-Aug-2018, Thu

मागील लेखामध्ये भूगोलाच्या प्रश्नांचे विश्लेषण आपण पाहिले. आजच्या लेखामध्ये आपण भूगोल या विषयातील प्राकृतिक भूगोल या घटकाची परीक्षेच्या दृष्टीने तयारी कशी करावी याबाबत माहिती घेणार आहोत.

प्राकृतिक भूगोल या घटकावर २०१३ मध्ये ४; २०१४ मध्ये ५; २०१५ मध्ये ६; २०१६ मध्ये ५; आणि २०१७ मध्ये ४ प्रश्न विचारण्यात आले होते.

अभ्यासाक्रमामध्ये भारत व जगाचा भूगोल असे नमूद केलेले आहे म्हणून प्राकृतिक भूगोलाची तयारी करताना जगाचा प्राकृतिक भूगोल आणि भारताचा प्राकृतिक भूगोल अशी सर्वसाधारण विभागणी करावी लागते. या विषयाचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाचे नियोजन करताना सर्वप्रथम या विषयातील घटकाची माहिती असणे आवश्यक असते. प्राकृतिक भूगोलामध्ये मुखत्वे भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, जैविक भूगोल आणि पर्यावरणीय भूगोल यांसारख्या घटकांचा समावेश होतो. या सर्व घटकांचे मूलभूत अर्थात पारंपरिक ज्ञान सर्वप्रथम अभ्यासावे लागते. वर नमूद केलेल्या घटकासंबंधी अभ्यासाव्या लागणाऱ्या संकल्पना, त्यांची वैशिष्टय़े याची माहिती सर्वप्रथम असणे आवश्यक ठरते.

२०१३ ते २०१७ दरम्यान घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षांमध्ये या घटकावर विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांची थोडक्यात चर्चा करणार आहोत.

‘भूखंड अपवहन सिद्धांताद्वारे तुम्हाला नेमके काय समजते? याच्या समर्थनार्थ प्रमुख पुराव्यानिशी चर्चा करा.’ (२०१३)

या प्रश्नाचा मुख्य रोख हा भूखंड अपवहन सिद्धांतावर आहे आणि हा प्रश्न योग्य पद्धतीने समजून घेण्यासाठी हा सिद्धांत नेमका काय आहे, त्याची मांडणी कोणी केली आणि यामध्ये नेमक्या कोणत्या प्राकृतिक घडामोडींची चर्चा करण्यात आलेली आहे अशा विविधांगी पलूंचा विचार करून या प्रश्नाचे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.

हिमालयातील हिमनद्यांमध्ये होणारी घट आणि भारतीय उपखंडामध्ये जागतिक तापमान वाढीच्या लक्षणाचा संबंध उघड करा. (२०१४)

या प्रश्नाचे आकलन होण्यासाठी हिमनदी म्हणजे काय, तिची निर्मिती कशी होते, या प्रकारच्या नद्या हिमालय पर्वत रांगांमध्येच का आहेत, याची माहिती सर्वप्रथम असणे गरजेचे आहे. या प्रश्नाचा मुख्य कल हा एका विशिष्ट प्रक्रियेशी म्हणजे जागतिक तापमान वाढीशी जोडण्यात आलेला आहे आणि जागतिक तापमान वाढीमुळे या हिमनद्यांमध्ये कशी घट होत आहे याची पुराव्यानिशी चर्चा करून या प्रश्नाचे उत्तर आपणाला लिहावे लागते.

आर्क्टिक समुद्रामध्ये शोधण्यात आलेल्या खनिज तेलाचे आर्थिक महत्त्व काय आहे आणि याचे संभाव्य पर्यावरणीय परिणाम काय असू शकतात. (२०१५)

आर्क्टिक समुद्राचे भौगोलिक स्थान काय आहे आणि याचा पृथ्वीच्या वातावरणावर नेमका काय परिणाम होतो याची सर्वप्रथम माहिती असणे गरजेचे आहे आणि त्यानंतर आर्क्टिक समुद्रातील खनिज तेलाचे आर्थिक महत्त्व हे सद्य:स्थितीमध्ये जगातील विविध देशाची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी होऊ शकतो आणि आर्क्टिक समुद्रावर आधिपत्य असणाऱ्या देशांना याचा होणारा आर्थिक लाभ आणि या खनिज तेलाचे उत्पादन करताना या समुद्रामध्ये केले जाणारे उत्खनन आणि यामुळे येथील प्रदेशाच्या भौगोलिक रचनेत होणारा बदल आणि या बदलांचा येथील पर्यावरणावर होणारा परिणाम अशा विविधांगी बाबींचा एकत्रित विचार केल्याशिवाय या प्रश्नाचे योग्य उत्तर लिहिता येणार नाही.

२०१६ मध्ये या घटकातील, हिमालय पर्वतातील दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे, परिणामकारकरीत्या केलेले जमीन आणि पाणी व्यवस्थापन हे मानवी विपत्ती कमी करू शकते, दक्षिण चिनी समुद्राचे भूराजकीय महत्त्व, भारतातील प्रमुख शहरांमधील पुरांची समस्या, भारतातील अंतर्गत जल वाहतूक व समस्या इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.

२०१७ मध्ये आशिया मान्सून आणि लोकसंख्या संबंध, महासागरीय क्षारतेतील फरकाची कारणे सांगा आणि याच्या बहुआयामी परिणामांची चर्चा करा, कोळसा खाणीच्या विकासासाठी असणारी अपरिहार्यता आणि याचे प्रतिकूल पर्यावरणीय परिणाम असे प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि हे प्रश्न प्राकृतिक भूगोलाची पारंपरिक माहिती आणि चालू घडामोडीचा संबंध जोडून विचारण्यात आलेले होते.

उपरोक्त प्रश्नांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, पर्यावरण आणि हवामान संबंधित घटकांवर अधिक प्रश्न विचारले गेले आहेत. त्याचबरोबर प्रश्न विचारताना या विषयाचे पारंपरिक ज्ञान, यातील महत्त्वाच्या संकल्पना तसेच यासंबंधी घडणाऱ्या चालू घडामोडींचा एकत्रित वापर केलेला दिसून येतो. यातील बहुतांश प्रश्न भारत व जगाच्या प्राकृतिक घडामोडीच्या पाश्र्वभूमीचा एकत्रित विचार करून विचारण्यात आलेले आहेत. म्हणून प्राकृतिक भूगोलाची संपूर्ण तयारी करण्याबरोबरच चालू घडामोडीचा अभ्यास करावा लागतो. थोडक्यात अभ्यासक्रमामध्ये नमूद घटकाच्या आधारे या प्रश्नांची विभागणी करावी व अभ्यासाची दिशा निर्धारित करावी. त्याचबरोबर महत्त्वाची बाब म्हणजे प्रश्न विचारण्याचा कल हा केव्हाही बदलला जाऊ शकतो त्यामुळे हा घटक र्सवकष आणि सखोल पद्धतीने अभ्यासणे अपरिहार्य ठरते.

संदर्भ साहित्य

या घटकाची मूलभूत माहिती सर्वप्रथम अभ्यासावी. यासाठी आपणाला एनसीईआरटीच्या Fundamentals of Physical Geography (XI), Indian Physical Environment(XI), या क्रमिक पुस्तकांचा आधार घेता येतो ज्यामुळे या विषयाचे सरळ व सोप्या भाषेत आकलन करता येऊ शकेल. या माहितीला विस्तारित करण्यासाठी “Certificate Physical and Human Geography (by Goe Cheng Leong), Fundamentals of Physical Geography (by Majid Husain), India _ Comprehensive Geography ( by D.R. Khullar), World Geograhy (by Majid Husain) या संदर्भ ग्रंथांचा आधार घेता येतो.

या विषयाच्या स्वत:च्या नोट्स तयार कराव्यात तसेच आपली अभ्यासाची तयारी कितपत झालेली आहे हे कळण्यासाठी उत्तर लेखनाचा सराव करावा व मूल्यमापन करून घ्यावे. त्यामुळे यातील उणिवा दूर करून अधिक नेमकेपणाने उत्तर लिहिण्याचा सराव करता येतो व चांगले गुण प्राप्त करता येऊ शकतात. तसेच महत्त्वाची बाब म्हणजे हा घटक आपणाला सामान्य अध्ययनासाठी तयार करायचा आहे याचे भान ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे नोट्स तयार करताना त्यातील समर्पकता आणि महत्त्वाच्या मुद्दय़ांचाच अंतर्भाव करणे अधिक श्रेयस्कर ठरते.

rahi sarnobat

राही सरनोबत


6716   23-Aug-2018, Thu

खेळाडूंना कारकीर्दीत काही वेळा धोकादायक दुखापतींना सामोरे जावे लागते. त्यातून शंभर टक्के तंदुरुस्त होण्यासाठी मानसिक तंदुरुस्तीही आवश्यक असते. भारतासाठी नेमबाजीत पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळविणाऱ्या अभिनव बिंद्रा यालाही ऑलिम्पिकपूर्वी करिअरला धोका निर्माण होणाऱ्या दुखापतीस तोंड द्यावे लागले होते. नेमबाजीत त्याला आदर्श ठेवीत अनेक खेळाडूंनी या खेळात करिअर केले.

राही सरनोबत या मराठमोळ्या खेळाडूनेही त्याचाच आदर्श ठेवीत मोठय़ा हिमतीने दुखापतीस तोंड दिले! दुखापतीमधून तंदुरुस्त झाल्यानंतर तिने सर्वार्थाने सरावावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळेच आशियाई क्रीडा स्पर्धेत ती सुवर्णमोहोर नोंदवू शकली. आशियाई स्पर्धेतील विक्रमाबरोबरच, सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज होण्याचा मान तिने मिळविला.

हे यश तिला सहजासहजी मिळाले नाही. शेवटपर्यंत तिला तुल्यबळ प्रतिस्पध्र्याशी झुंजावे लागले. सर्वोच्च यशासाठी आवश्यक असणारी एकाग्रता तिने दाखविली, पण ‘टायब्रेकर’मध्ये सर्वात महत्त्वाचा असलेला संयमही तिने दाखविला. जरा एकाग्रता भंग झाली, तर सुवर्णपदक गमावण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊनच तिने दाखविलेली चिकाटी, संयम व आत्मविश्वास अतुलनीय आहे.

कोल्हापूरच्या मातीमधून भारतास ज्याप्रमाणे अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पहिलवान दिले, त्याचप्रमाणे तेजस्विनी सावंत व राही यांच्यासारखे नेमबाजही दिले आहेत. राजवर्धनसिंह राठोडच्या ऑलिम्पिक रौप्यपदकापाठोपाठ अभिनव बिंद्राच्या सुवर्णपदकानंतर नेमबाजी हा जागतिक स्तरावर पदक मिळविण्यासाठी हुकमी क्रीडा प्रकार आहे, याची जाणीव आपल्या देशात निर्माण झाली.

अखिल भारतीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धामध्ये एक हजारपेक्षा जास्त स्पर्धक सहभागी होत असतात, हीच नेमबाजीची पावती आहे. राही हिने आशियाई स्पर्धेपूर्वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, जागतिक अजिंक्यपद स्पर्धामध्येही पदकांची लयलूट केली आहे. लंडन ऑलिम्पिकमध्येही तिने देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. आशियाई स्पर्धेतील सोनेरी कामगिरीमुळे तिच्याकडून ऑलिम्पिक पदकाच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

lalithambika

डॉ. ललिताम्बिका


5106   22-Aug-2018, Wed

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी १५ ऑगस्ट २०१२ रोजी मंगळ मोहिमेची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांत म्हणजे ५ नोव्हेंबर २०१३ रोजी ती मोहीम भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोने फत्ते केली! वैज्ञानिकांना एकदा लक्ष्य ठरवून दिले तर ते किती कमी वेळात, किती अचूकतेने काम करू शकतात याचा तो वस्तुपाठ होता. आता यंदाच्या १५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना अवकाशात पाठवण्याच्या मोहिमेची घोषणा केली आहे.

मानवाला अवकाशात म्हणजे आपल्या पृथ्वीबाहेरच्या कक्षेत नेण्याची ही मोहीम आहे. ती यशस्वी झाल्यास रशिया, अमेरिका, चीन यांच्यानंतर मानवाला अवकाशात पाठवणारा भारत हा चौथा देश ठरेल. या अवकाश मोहिमेची धुरा इस्रोच्या नियंत्रण प्रणाली अभियंता डॉ. ललिताम्बिका यांच्यावर सोपवण्यात आली आहे. इस्रोत अनेक महिला वैज्ञानिक आहेत, त्यांनी वेगवेगळ्या मोहिमांत काम केले असले तरी संपूर्ण मोहिमचे नेतृत्व प्रथमच महिला वैज्ञानिकाला मिळाले आहे. मानवी अवकाश मोहीम ही वास्तविक खूप अवघड व कालहरण करणारी आहे. सन २०२२ पर्यंत मानवाला पृथ्वीबाहेर पाठवण्याच्या या मोहिमेसाठी ९००० कोटी खर्च येणार आहे.

डॉ. व्ही. आर. ललिताम्बिका यांनी तीस वर्षे इस्रोत काम केले असून, ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक, भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक, स्वदेशी स्पेस शटल अशा अनेक मोहिमांत त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्या केरळमध्ये शिकलेल्या असून त्यांना दोन मुले आहेत. संसार करतानाच त्यांनी इस्रोच्या अवकाश मोहिमांचीही जबाबदारी लीलया पार पाडली आहे. नियंत्रण अभियांत्रिकीत पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर १९८८ मध्ये त्यांनी तिरुवनंतपुरमच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथून कामास सुरुवात केली. प्रक्षेपकांचे इंधन, त्यांची रचना, स्वयंचलित नियंत्रण हा त्यांच्या संशोधनाचा प्रमुख भाग आहे. इस्रोत त्या समाधानी आहेत, कारण येथे अगदी कनिष्ठांना त्यांच्या संकल्पना मांडण्याची संधी दिली जाते. त्यात कुणाचा अहंगंड आडवा येत नाही, सांघिक कार्याने कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते हे इस्रोने दाखवून दिले आहे. मानवी अवकाश मोहीम ही आव्हानात्मक आहे यात शंका नाही, असे ललिताम्बिका यांनी सांगितले.

यापूर्वी इस्रोने एकाच वेळी १०४ उपग्रह सोडले, त्यातही त्यांनी मोठी भूमिका पार पाडली होती. ललिताम्बिका यांना २००१ मध्ये इस्रोचे सुवर्णपदक  मिळाले असून, २०१३ मध्ये इस्रोचा उत्कृष्टता पुरस्कारही मिळाला आहे. त्यांच्या या निवडीने सर्वच संशोधन क्षेत्रातील महिलांचे मनोबल उंचावेल यात  शंका नाही.

kofi annan

कोफी अन्नान


3624   21-Aug-2018, Tue

कोफी अन्नान हे संयुक्त राष्ट्रांचे पहिले कृष्णवर्णीय आफ्रिकी सरचिटणीस. या खंडासमोर आजही गरिबी निर्मूलन, रोगराई निर्मूलन, समान न्याय आणि संधी या समस्या विक्राळ रूप धारण करून आहेत. स्वाभाविकच अन्नान यांनी सरचिटणीसपदाच्या कार्यकाळात या समस्या सोडवण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले. आफ्रिकेत आणि आफ्रिकेबाहेरही.

१९९६ मध्ये अन्नान संयुक्त राष्ट्रांचे सातवे सरचिटणीस झाले, तोपर्यंत त्यांनी जवळपास ३५ वर्षे या संस्थेत विविध पदांवर व्यतीत केली होती. त्यामुळे संस्थेत त्यांच्याविषयी अपार आदर आणि आशा होती. तो काळ संघर्ष आणि अंतर्गत यादवींचा. तर अन्नान यांचा स्वभाव अत्यंत नेमस्त आणि जुळवून घेण्याचा. पण वेळप्रसंगी अमेरिकेसारख्या देशासमोरही अन्नान यांनी खमकेपणा दाखवलाच. यादवी निर्मूलन, सरकारच अस्तित्वात नसलेल्या देशांमध्ये शांतिपथके पाठवणे हेच केवळ संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट असता कामा नये, हे ते आवर्जून नमूद करत. त्यांच्याच कार्यकाळात अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये गरिबी निर्मूलन, रोगराई निर्मूलन या कामांसाठीही संयुक्त राष्ट्रांनी महत्त्वाचे योगदान द्यावे याविषयी ते आग्रही असत.

इराक, तत्कालीन युगोस्लाव्हिया या आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. असे करताना प्रसंगी हस्तक्षेप करावा लागल्यास देशाच्या सार्वभौमत्वाचा मुद्दा गौण असतो. कारण संयुक्त राष्ट्रांचा जाहीरनामा हा मानवकल्याणाविषयी आहे. सरकारकल्याणाविषयी नाही, असे त्यांनी अनेकदा ठासून सांगितले!  त्यांचे पूर्वसुरी इजिप्तचे बुट्रोस बुट्रोस-घाली यांच्याविषयी विशेषत: तत्कालीन अमेरिकन सरकारमध्ये प्रचंड नाराजी होती. अमेरिकेचा पाठिंबा पुन्हा प्राप्त करून घेणे हे अन्नान यांच्यासमोरील मोठे आव्हान होते. ते त्यांनी यथास्थित पार पाडले.

जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्रांचा निर्वासितांसाठीचा आयोग अशा अनेक संलग्न संघटनांमध्ये काम करून झाल्यानंतर या जागतिक संघटनेच्या नेमक्या उद्दिष्टांविषयीची त्यांची वैचारिक बैठक पक्की झाली होती. त्यामुळेच संयुक्त राष्ट्रे आणि अन्नान यांना २००१ मधील शांततेचे नोबेल विभागून देण्यात आले होते. संयुक्त राष्ट्रांसाठी शांतिपथके पाठवण्याबाबत भारताने दाखवलेल्या सातत्याचे त्यांनी नेहमी कौतुक केले. स्वित्र्झलड आणि अमेरिकेत उच्चशिक्षण घेऊनही त्यांच्यात मायभूमी घानातील ग्रामीण मातीतला साधेपणा कायम राहिला. त्यांच्या निधनाने विशेषत: भारत, आफ्रिका आणि जगातील इतर भागांमध्ये अजूनही गरिबीत राहत असलेल्या जनतेने एक सच्चा हितचिंतक गमावला आहे.

dr.fakruddin bennur

प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर


5823   21-Aug-2018, Tue

महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचा वसा घेऊन ५०-५० वर्षांपूर्वी जी पिढी पुढे येऊन पुरोगामी चळवळीत सक्रिय झाली, त्यात प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर यांचा आवर्जून नामोल्लेख करावा लागेल. त्या काळी जमातवादाचा प्रभाव असूनही मुस्लीम समाजातून हा बंडखोर आणि जिज्ञासू वृत्तीचा तरुण पुढे येतो आणि स्त्रियांच्या तलाक प्रश्नावर हमीद दलवाई यांच्याबरोबर मुस्लीम सत्यशोधक समाजाशी जोडला जातो. पुढे प्रा. डॉ. मोईन शाकीर आणि डॉ. असगरअली इंजिनीयर यांच्या संपर्कात आल्यानंतर प्रा. बेन्नूर यांच्या सामाजिक वाटचालीची दिशा बदलली तरी स्त्रियांच्या प्रश्नांवरील त्यांची मते अखेपर्यंत ठाम होती.

स्त्री शिक्षण, स्त्रियांचे स्वातंत्र्य आणि स्वावलंबन, त्यांचा सन्मानाने जगण्याचा हक्क याविषयी ते नेहमीच जागरूक राहात. बागवान या मुस्लीम ओबीसी समाजात जन्मलेले प्रा. बेन्नूर हे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे कट्टर समर्थक, सामाजिक  सौहार्दाचे सच्चे पुरस्कर्ते आणि विवेकवादी होते. मात्र कधीही कोणतीही वैचारिक गुलामगिरी त्यांनी पत्करली नाही. महात्मा गांधीजी हा त्यांचा श्रद्धेचा विषय असूनही ते गांधीवादी झाले नाहीत. मार्क्‍सवादाविषयी आपुलकी निर्माण झाली तरीही ते मार्क्‍सवादी झाले नाहीत. समाजवादी, आंबेडकरी चळवळीशी खूप घनिष्ठ संबंध आला. मात्र तरीही त्याचा शिक्का त्यांनी लावून घेतला नाही.

निधर्मवादी राज्यव्यवस्थेच्या संकल्पनेवर त्यांची अगाध निष्ठा होती. ती आयुष्याच्या अखेपर्यंत त्यांनी कधीही ढळू दिली नाही. सामाजिक चळवळ पुढे नेताना प्रा. बेन्नूर हे मुस्लीम ओबीसी चळवळीबरोबरच मुस्लीम मराठी साहित्य परिषदेची उभारणी करून थांबले नाहीत, तर ही चळवळ नेहमीच सक्रिय कशी राहील, याची काळजी ते नेहमीच घेत. राष्ट्रीय एकात्मता परिषद, विचारवेध संमेलन आदी चळवळीलाही त्यांनी बळ देण्याचे काम केले. १९८०च्या सुमारास गुजरातेत राखीव जागांच्या विरोधात आंदोलन सुरू झाले तेव्हा त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी राखीव जागांचे कट्टर समर्थक असलेल्या प्रा. बेन्नूर यांनी त्याच काळात सोलापुरात डॉ. अरुण लिमये यांच्यासमवेत राखीव जागा समर्थन परिषद भरविली होती. त्यांच्या साहित्यलेखनात हिंदू-मुस्लीम ऐक्य व मुस्लीम समाजाच्या समस्यांचे पैलू आढळतात.

आज सोमवारी त्यांना मानपत्र प्रदान करण्याचे तसेच त्यांच्या तीन पुस्तकांच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन करण्याचे ठरले होते; परंतु  शुक्रवारीच बेन्नूर यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने पुरोगामी विचारवंत आपण गमावला आहे.

ajit wadekar

वाडेकरांचा वारसा


6970   18-Aug-2018, Sat

स्थितप्रज्ञ धीरोदात्तपणा अंगी बाणवलेले वाडेकर अभिनिवेशविरहित, तरीही परिणामकारक ठरले.. ही सुसंस्कृततेची मूल्ये त्यांचा आत्मविश्वास वाढविणारी ठरली..

इंग्लंडच्या दौऱ्यावर कसोटी मालिका खेळण्यासाठी गेलेल्या भारतीय संघासाठी सध्या पळता भुई थोडी झालेली आहे. मुळात अजूनही इंग्लंडमध्ये भारतीय क्रिकेट संघाला फारशा कसोटी मालिका जिंकता येत नाहीत. अशा चाचपडलेल्या स्थितीत आपला संघ असताना, इंग्लिश भूमीवर भारताला पहिली कसोटी मालिका जिंकून देणारे कर्णधार अजित वाडेकर यांचे जाणे मन अधिकच खंतावणारे ठरते. वाडेकर यांचे जाणे हा इतरही अर्थानी युगान्त ठरतो. क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे, हे विधान हास्यास्पदच ठरविणारी सध्याची स्थिती.

‘स्वॅगर’च्या नावाखाली भावनांचे उघडेवागडे प्रदर्शन मांडणे हे फॅशन स्टेटमेंट वगैरे बनले आहे. पण वाडेकर यांनी मात्र अंगभूत सभ्यता, शालीनता क्रिकेटमध्येही रुजवली. त्यांचे व्यक्तिमत्त्व क्रिकेटच्या मैदानावर आणि मैदानाबाहेर; क्रिकेटपटू, कर्णधार, व्यवस्थापक, निवड समिती अध्यक्ष अशा विविध रूपांमध्ये वावरत असताना आणि अगदी अखेपर्यंत तसेच राहिले. त्यांनी क्रिकेटला सामावून घेतले. अनेक जबाबदाऱ्या यथार्थ पार पाडल्या. पण क्रिकेटमुळे ते झाकोळले गेले नाहीत. क्रिकेट हेच सुख-दुख होऊन बसते आणि क्रिकेटला सोडू शकत नाहीत असे अनेक लहान-महान क्रिकेटपटू आपल्या आजूबाजूला वावरत असताना, वाडेकर यांनी मात्र एक सन्मान्य अलिप्तपणा जपला.

यशाची चव चाखल्यानंतर असा अलिप्तपणा सोपा नसतो. १९६०च्या दशकात अजित वाडेकर एक क्रिकेटपटू आणि नंतर कर्णधार म्हणून उदयाला आले. १९६७च्या न्यूझीलंड दौऱ्यात मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशी पहिला विजय मिळवला, त्या वेळी त्या सामन्यात वाडेकरांनी शतक झळकावले. ते त्यांचे एकमेव शतक. म्हणजे परदेशी भूमीवरील पहिल्या विजयामध्ये वाडेकर यांचेही योगदान होतेच. पण ती त्यांची सर्वपरिचित ओळख नाही. ते घराघरांमध्ये पोहोचले ते भारतीय संघाने त्यांच्या नेतृत्वाखाली प्रथम वेस्ट इंडिजला वेस्ट इंडिजमध्ये आणि नंतर इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवल्यानंतर. हे दोन्ही संघ त्या वेळी बलाढय़ होते आणि मायदेशी खेळत होते. त्यांच्या तुलनेत भारतीय खेळाडू हौशे-नवशेच गणले जात. बरेचसे सधन कुटुंबांची पाश्र्वभूमी असलेले देखणे क्रिकेटपटू, सामन्यातले काही तास (पण पूर्ण सामना नव्हे) मनोरंजन करीत आणि खुल्या दिलाने पराभवाला सामोरे जात, अशी भारतीय क्रिकेटपटूंची गोंडस प्रतिमा होती. तिला तडे देण्याची जबाबदारी भारतीय क्रिकेटपटूंची होती आणि पतौडीच्या संघाने ते थोडय़ाफार प्रमाणात करूनही दाखवले होते. पण न्यूझीलंडचा संघ म्हणजे इंग्लंड-वेस्ट इंडीज-ऑस्ट्रेलियाचा संघ नव्हता. त्यामुळे वाडेकरांच्या भारतीय संघाने इंग्लंड आणि वेस्ट इंडिज जिंकल्यानंतरच भारतीय क्रिकेटला जगात गांभीर्याने घेतले जाऊ लागले.

वाडेकर यांची भारतीय संघाचे कर्णधार म्हणून ज्या वेळी तत्कालीन निवड समितीप्रमुख विजय र्मचट यांनी निवड केली, तेव्हा ते उत्तम फलंदाज होते. पण सर्वोत्कृष्ट नव्हते. मुंबईचे नेतृत्व उत्तम प्रकारे करायचे. मात्र त्यांच्याहीपेक्षा अधिक चांगले नेतृत्वगुण दाखवलेले कर्णधार (उदा. पतौडी) भारतीय क्रिकेटमध्ये खेळतच होते. शिवाय खुद्द र्मचट यांच्याच मते (याविषयी त्यांनी नंतर सांगितले) वाडेकर धावा जमवण्याच्या बाबतीत पुरेसे महत्त्वाकांक्षी नव्हते. र्मचट यांना भावला वाडेकर यांचा स्थितप्रज्ञ धीरोदात्तपणा. वाडेकर यांनी मैदानावर कधीच भावनांचे प्रदर्शन केले नाही.

यशापयशाला ते सारख्याच स्थितप्रज्ञपणे सामोरे जायचे. कोणत्याही परिस्थितीत विचलित व्हायचे नाहीत. पतौडी यांच्याभोवती वलय होते. त्या वेळच्या भारतीय संघातील बहुतेक खेळाडूंवर त्यांचा पगडा होता. पतौडी यांनी न्यूझीलंड दौऱ्यात विजय मिळवून दिल्यानंतर त्यांच्या महत्त्वाकांक्षेला नवाबी वर्चस्ववादाची जोड मिळाली होती. त्यामुळे वाडेकर यांच्याविषयी त्यांचे मत फारसे चांगले नव्हते. वाडेकर यांनी सुसंस्कृतपणा दाखवत पतौडी यांच्याशी तरीही दोस्ती जमवण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी होऊ शकला नाही. पण त्यामुळे निष्कारण उदास न होता वाडेकर यांनी वेस्ट इंडीज आणि इंग्लंड या दौऱ्यांवर लक्ष केंद्रित केले. भारतीय संघात त्या वेळी मोठय़ा प्रमाणावर गटबाजी होती. अनेक चांगले खेळाडू होते. तरी एक संघ म्हणून कुणीही एकत्रपणे चांगले खेळून दाखवत नव्हते. वाडेकर यांनी पतौडींचे खास मित्र एम. एल. जयसिंहा यांना उपकर्णधार बनवले. दिलीप सरदेसाई यांना र्मचट यांचा विरोध डावलून आग्रहाने दोन्ही दौऱ्यांवर नेले. सुनील गावस्करांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. वाडेकर यांच्या नावावर नशीबवान कर्णधार असा शिक्का मारला जातो. मात्र त्यांनी केलेली संघनिवड कल्पक आणि वेगळी होती. वैयक्तिक गुणवत्तेपेक्षा त्यांची पसंती उपयुक्ततेला होती. यातूनच त्यांनी इरापल्ली प्रसन्ना यांच्याऐवजी त्यांनी भागवत चंद्रशेखर यांच्यावर अधिक विश्वास दाखवला. इंग्लंडमधील ओव्हल कसोटीतील निर्णायक विजयात चंद्रशेखर यांचे मोलाचे योगदान राहिले. सलीम दुर्राणी, अब्बास अली बेग, फारुख इंजिनीयर यांना त्यांनी वेगवेगळ्या सामन्यांमध्ये संधी दिली आणि त्यांचे बहुतेक निर्णय यशस्वी ठरले. ‘नशीबवान कर्णधारा’ची ही लक्षणे नव्हेत! एकदा इंग्लंड दौऱ्यात एका सामन्याच्या आधी भारतीय संघाला एका अत्यंत सुमार हॉटेलात उतरवण्यात आले. त्याविरुद्ध वाडेकर आणि तत्कालीन व्यवस्थापक हेमू अधिकारी यांनी आवाज उठवला आणि अधिक चांगल्या हॉटेलात भारतीय संघाची रवानगी झाली! फार थोडय़ा भारतीय कर्णधारांनी अशा प्रकारचा खमकेपणा त्यापूर्वी दाखवला होता.

एक फलंदाज म्हणून वाडेकर डावखुरे होते आणि शैलीदार, आक्रमक खेळायचे. त्यांची आकडेवारी चांगली असली, तरी असामान्य नाही. कसोटीमध्ये एकापेक्षा अधिक शतके झळकवण्याची त्यांची योग्यता होती. कर्णधारपदाची जबाबदारी घेतल्यानंतर त्यांचा धावांचा ओघ आटला असे सांगितले जाते. पण सभ्य, सुसंस्कृत, शालीन असले, तरी वाडेकर एक चिवट, कणखर फलंदाज होते. वेस्ली हॉल, जॉन स्नो, चार्ली ग्रिफिथ यांच्यासमोर उभे राहून, अनेकदा उसळत्या चेंडूचा मारा सहन करत त्यांनी प्रतिहल्ले चढवलेले आहेत.

पण वाडेकरांचे विश्लेषण क्रिकेटच्या पलीकडे जाऊन करावे लागेल. वाडेकर हे मध्यमवर्गीय, सुसंस्कृत मराठी ‘आयकॉन’ होते. शाळेत कधी क्रिकेट खेळले नाहीत. कारण चांगले शिकून कारकीर्द बनवण्याच्या मानसिकतेचा पगडा त्यांच्या घरावरही होता. एका परीक्षेत चांगले गुण मिळाल्याबद्दल बक्षीस म्हणून वाडेकरांच्या हातात पहिल्यांदा बॅट दिली गेली. क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द घडण्यास सुरुवात झाल्यानंतरही बँकिंगसारखी सुरक्षित नोकरी त्यांनी पत्करली. मूल्यांवर विश्वास होता, त्यातून आत्मविश्वासाला बळ मिळाले. त्यामुळेच पूर्वीचे अनेक बडे बडे कर्णधार करू शकले नाहीत, अशी कामगिरी त्यांनी करून दाखवली. महत्त्वाकांक्षेच्या राक्षसाने कधी त्यांच्यावर गारूड केले नाही. याच मूल्याधिष्ठित आणि अभिमानी मानसिकतेतून सुनील गावस्कर उदयाला आले. सचिन तेंडुलकर जन्माला आला. मुंबई क्रिकेटला ‘खडूस’ म्हणून हिणवणाऱ्यांना हे गुण कळलेच नाहीत. प्राप्त परिस्थितीत हे गुण यशस्वितेची शाश्वती देऊ शकत नाहीत, असे कॉर्पोरेटीकरणाची झिंग चढलेले विद्वान छातीठोकपणे सांगतात.

वाडेकर यांनी कधी त्यांचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला नाही. सुनील गावस्कर आघाडीवीर म्हणून फलंदाजीस जाताना ‘सी यू स्किपर’ या शब्दांत वाडेकरांचा निरोप घेत. ‘नॉट फॉर अ लाँग टाइम’ असे त्यावर वाडेकर बजावत. आपल्या हाताखालील खेळाडूंनी काय करावे, याचा हा खास वाडेकरी शैलीतला सल्ला. नेमका आणि अभिनिवेशविरहित, तरीही परिणामकारक! नेमके हेच गुण गाण्यात असलेल्या हिराबाई बडोदेकरांनी जसा महाराष्ट्रीय मध्यमवर्गीय महिलेला रंगमंच मिळवून दिला, तसे वाडेकरांनी सुशिक्षित मध्यमवर्गीय मराठी तरुणांना अव्वल क्रिकेटचे मैदान मिळवून दिले. वाडेकरांचा हा वारसा नाकारता येणारा नाही.

chemmanam chako

चेम्मनम चाको


7033   18-Aug-2018, Sat

समाजाकडे तटस्थ दृष्टिकोनातून बघून आरसा दाखवण्याचे काम कलाकार, साहित्यिक नेहमीच करीत असतात, पण ते समजून घेण्याची सहनशक्ती समाजाकडे असणेही आवश्यक असते, जी अलीकडच्या काळात कमी होत चालली आहे. केरळमधील कवी चेम्मनम चाको यांनी त्यांच्या कवितांतून अशाच पद्धतीने तेथील समाजातील अनिष्ट रूढी, परंपरांवर टीका केली होती. त्यांच्या निधनाने एक सर्जनशील मार्गदर्शक गमावला आहे.

७ मार्च १९२६ रोजी कोट्टायम जिल्ह्य़ात मुलाकुलम या वैकोमजवळच्या गावात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पमबाकुडा सरकारी शाळा, पिरावोम माध्यमिक शाळा, अलुवा यू. सी. स्कूल, तिरुअनंतपूरम युनिव्हर्सिटी कॉलेज येथे त्यांचे शिक्षण झाले. शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांच्या घरात कुणीच लेखनाकडे वळलेले नव्हते, अशा परिस्थितीत ते लेखणी हाती घेऊन सरस्वतीचे उपासक बनले. सात भावंडांपैकी ते सहावे.

घरातल्या लोकांना तर त्यांनी शेतात काम करावे असे वाटत होते, पण त्यांनी पुस्तकांची वाट धरली. शेतातले काम टाळण्यासाठी ते पुस्तके वाचण्याचा बहाणा करीत असत. लहानपणापासून त्यांचे प्रचंड वाचन होते. पिरावोम येथील शाळेत जाताना त्यांना भाताच्या शेतातून वाट काढत जावे लागे. त्या वेळी स्वातंत्र्यलढा सुरू होताच त्यात त्यांनी उडी घेतली नसती तरच नवल!

स्वातंत्र्याच्या प्रेरणेतूनच त्यांनी ‘प्रवचनम’ ही पहिली कविता लिहिली. त्यानंतर त्यांचा ‘विलाम्बरम’ हा काव्यसंग्रह १९४७ मध्ये प्रसिद्ध झाला. शाळा व कॉलेजात त्यांनी मल्याळम भाषा शिकवण्याचे काम केले. केरळ विद्यापीठाचा शब्दकोश विभाग व प्रकाशन विभागात त्यांनी नोकरी केली. १९८६ मध्ये ते निवृत्त झाले. केरळ साहित्यात कवितेतून विनोद व टीकात्मकता या दोन्ही गोष्टी साध्य करणाऱ्या कुंजन नंबियार यांच्याही ते एक पाऊल पुढे होते. विशेष म्हणजे त्यांनी मुलांसाठीही कथा-कविता लिहिल्या होत्या. ‘नेल्लू’ या काव्याने त्यांचे नाव झाले. तो काळ होता १९६७ मधला. त्या वेळी राज्यात दुष्काळ पडलेला असताना लोक रबरासारखी नगदी पिके घेत होते. त्यामुळे लोकांना पुढे गहू व इतर धान्यांसाठी रेशन दुकानांवर अवलंबून राहण्याची वेळ आली, तो या कवितेचा विषय बनला. त्यांच्या त्या काव्याला अशी सामाजिक पाश्र्वभूमी होती. त्यांच्या कवितांची भाषांतरे इंग्रजीत करण्यात आली. ती भारतीय कवितांच्या ऑक्सफर्ड संग्रहात समाविष्ट आहेत. केरळ साहित्य अकादमी व केरळ चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे ते सदस्य होते. १९७७ मध्ये त्यांच्या राजपथ काव्यसंग्रहास केरळ साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, तर २००६ मध्ये त्यांना केरळ साहित्य परिषदेने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले होते.

कुंजन नंबियार पुरस्कार, महाकवी उल्लूर पुरस्कार, कुरुप्पन पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले. लेखनातून केरळच्या समाजजीवनावर परखड भाष्य त्यांनी केले, जीवनाच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रास स्पर्श करणारे असेच त्यांचे लेखन होते. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील कवी व सामाजिक घडामोडींचा सर्जनशील भाष्यकार आपण गमावला आहे.

Thomas abraham

थॉमस अब्राहम


8182   16-Aug-2018, Thu

सनदी अधिकाऱ्यांबद्दल, राजनैतिक अधिकाऱ्यांबद्दल सामान्यांचे काही अपेक्षावजा समज असतात. ‘आयएएस’ या सेवेतील माणसाने प्रधान सचिवपदी जाणे, ही कारकीर्दीची परमावधी समजली जाते किंवा ‘इंडियन फॉरेन सव्‍‌र्हिस’- आयएफएस- मधील व्यक्तीने अमेरिकेत किंवा संयुक्त राष्ट्रांत काम करणे, हे कारकीर्दीची शान मानले जाते. प्रत्यक्षात या साऱ्या सनदी सेवा स्वत:च्या कारकीर्दीसाठी नसून देशसेवेसाठी असतात. त्यामुळेच ‘आयएएस’मधले एखादे महापालिका आयुक्तही लक्षात राहील असा बदल घडवून लोकांचा दुवा घेतात, आठवणीत राहतात.

ऐन नेहरूकाळात, देश स्वतंत्र्य झाला त्यास उणीपुरी तीन-चार वर्षेच झाली असताना ‘आयएफएस’मध्ये जाऊन राजनैतिक अधिकारी झालेले थॉमस अब्राहम हे श्रीलंकेतील कामासाठी- भारत आणि भारतीय वंशाच्या लोकांचे जे हितरक्षण त्यांनी केले त्यासाठी- नेहमी स्मरणात राहतील. राजदूत (श्रीलंका हा राष्ट्रकुल देश, म्हणून तेथील भारतीय ‘उच्चायुक्त’) पदावरून निवृत्त झालेल्या थॉमस अब्राहम यांचे रविवारी, वयाच्या ९१ व्या वर्षी केरळमधील कडापरा या त्यांच्या मूळ गावी निधन झाले.

‘जगण्यासाठी, पोटासाठी भारतातून १०० वर्षांपूर्वी श्रीलंकेत आलेल्या तमिळींना एवढय़ा-तेवढय़ा कारणावरून बेकायदा रहिवासी ठरवले जाते. हे प्रकार नेहरू असताना घडत नव्हते.

शास्त्रीजींनी १९६४ साली सिरिमाओ भंडारनायकेंशी केलेल्या परतपाठवणी कराराचा गैरफायदा श्रीलंका घेते आहे. असे होऊ नये, तमिळींना श्रीलंकेतच- त्यांच्या कर्मभूमीत- राहता यावे, यासाठी या कराराचा गाभा समजून घेण्याची गरज आहे’ असे म्हणणे अब्राहम यांनी १९७८ ते ८२ या काळात प्रथम मोरारजी आणि नंतर इंदिरा गांधींपुढे मांडले, तमिळींची परतपाठवणी ‘नैसर्गिक’ होत नसून त्यामागे वांशिक दुस्वास हेही कारण असू शकते हेही ओळखले आणि १९६४च्या कराराचा योग्य अर्थ तत्कालीन श्रीलंकन सत्ताधाऱ्यांना मान्य करावयास लावला. पुढे तमिळ-प्रश्न पेटला, ही निराळी गोष्ट. पण हिंसाचाराआधीच तमिळींना ‘बाहेरचे’ आणि ‘घुसखोर’ ठरवून, सुरक्षेची मोघम कारणे देऊन जो अन्याय होत होता, त्याचे निराकरण अब्राहम यांच्या कार्यनिष्ठेमुळे झाले.

बर्न (स्वित्र्झलड) येथे तसेच पूर्व युरोपातही काही काळ काम केलेल्या अब्राहम यांना, दक्षिण आणि आग्नेय आशियातच खरा रस होता. त्या देशांच्या इतिहासात त्यांना, त्यांच्या इतिहासकार पत्नी मीरा यांच्याप्रमाणेच, रस होता. भेटलेल्या व्यक्तींवर त्यांची सहज छाप पडे, म्हणूनच सिंगापूरचे ली क्वान यू किंवा पी. एन. हक्सर यांच्या आत्मचरित्रांतही थॉमस अब्राहम यांचे उल्लेख आढळतात.

 


Top