political science imp study

राज्यव्यवस्था (मूलभूत अभ्यास)


10130   10-Aug-2018, Fri

मागील लेखामध्ये मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर दोनच्या प्रश्नांचे विश्लेषण व त्याआधारे चर्चा करण्यात आली. या चच्रेच्या अनुषंगाने या पेपरमधील भारतीय राज्यघटना आणि राज्यव्यवस्था या उपघटकाच्या तयारीबाबत या व पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. विधि उपघटकाबाबत ( समर्पक कायदे) त्यानंतर चर्चा करण्यात येईल.

या पेपरची विभागणी पुढील चार उपविभागांमध्ये केल्यास अभ्यासासाठी सोयीचे ठरते.

१. भारताचे संविधान व प्रशासन मूलभूत व संकल्पनात्मक भाग

२. राजकारण संकल्पनात्मक भाग

३. राज्यव्यवस्था व प्रशासन विश्लेषणात्मक भाग

४. समर्पक कायदे

हे सगळे विभाग एकमेकांशी संबंधित असल्यमुळे त्यांचा स्वतंत्रपणे नव्हे तर टप्प्याटप्प्याने अभ्यास आवश्यक आहे मूलभूत संज्ञा संकल्पना समजून घेऊन पुढचा विश्लेषणात्मक अभ्यास, चालू घडामोडींच्या अनुषंगाने करणे फायद्याचे ठरते. पहिल्या तीन उपविभागांच्या अभ्यासाचे नेमके स्वरूप कसे असावे ते पाहू.

भारताचे संविधान

घटनेच्या सरनाम्यातील तत्त्वज्ञान, हेतू व्यवस्थित समजून घेऊन या आधारे पुढील अभ्यास करणे आवश्यक आहे. घटनेतील सगळ्या कलमांचा अभ्यास आवश्यक नाही. मूलभूत हक्क (Fundamental Rights) ची क्र. १४- ३२ ही कलमे सर्व बारकाव्यासहित समजून घ्यावी. याचप्रमाणे राज्याची नीतीनिर्देशक तत्त्वे (Directive Principles of State Policy)) मूलभूत कर्तव्ये (Fundamental Duties) या बाबतची कलमेही परिपूर्ण करायची आहेत. केंद्र राज्य संबंध (Centre State Relations) ही संकल्पना वेगवेगळ्या मुद्दय़ांच्या संदर्भात समजून घ्यावी लागते. यामध्ये प्रशासकीय, आíथक, न्यायिक व इतर बाबतीत केंद्र शासन व राज्य शासन यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी कशा प्रकारे झाली आहे त्याबाबतची कलमे नीट समजून घ्यायला हवी. याबाबत घटनेच्या सातव्या अनुसूचीचा संदर्भ लक्षात घ्यायला हवा.

घटनात्मक पदे,  (Constitutional posts)  अभ्यासताना

1. संबंधित कलम  2 .काय्रे

3.अधिकार  4.नेमणुकीची पद्धत

5.पदावरून काढण्याची पद्धत 2 सध्या त्या पदावरील व्यक्तिचे नाव हे मुद्दे पाहावेत.

केंद्रीय लोकसेवा आयोग (upsc) व महाराष्ट्र लोकसेवा आयोग (mpsc) याबाबतची

 कलमे  , त्यांची रचना  , काय्रे  , सध्याचे सदस्य व अध्यक्ष  ,त्यांची वाटचाल.

याबाबत विश्लेषणात्मक प्रश्न विचारले जाऊ शकतात.

प्रशासकीय प्रशिक्षण संस्थांच्या , स्थापनेमागची पाश्वभूमी ,कायदे  , रचना  , बोधचिन्ह  , बोधवाक्य  , काय्रे  , त्यांचे प्रमुख  , त्यांच्या वाटचालीचे टप्पे, इ. माहिती असणे आवश्यक आहे. प्रशासकीय न्यायाधिकरणांचा अभ्यासही आवश्यक आहे.

घटनादुरुस्ती (Constitutional Amendmen) व न्यायिक पुनर्वलिोकन (Judicial review) हे दोन मुद्देही महत्त्वाचे आहेत. घटनादुरुस्ती प्रक्रिया या विभागात अभ्यासली की पुढच्या टप्प्यामध्ये त्या त्या मुद्दय़ांबाबतच्या घटनादुरुस्त्या लक्षात घ्यायच्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे घटनेचा अर्थ विषद करणारे महत्त्वाचे निर्णय माहीत असणे आवश्यक आहे.

    प्रशासन

प्रशासनामध्ये तीन घटक पाहायचे आहेत. पहिला घटक राज्य प्रशासनामध्ये (State Administration) मंत्रालयीन कामकाजाची कल्पना असणे गरजेचे आहे. दुसरा घटक आहे ग्रामीण प्रशासन. यामध्ये जिल्हा ते ग्रामपंचायत उशा उतरंडीचा सारणी पद्धतीमध्ये (table from) अभ्यास करता येईल. यामध्ये पुन्हा महसुली व विकासात्मक व पोलीस प्रशासन वेगवेगळे लक्षात घ्यायला हवे. अधिकाऱ्यांची उतरंड व त्यांचे अधिकार, कार्य, नेमणूक, राजीनामा, पदावरून काढून टाकणे या बाबी समजून घ्यायला हव्यात. स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी याच प्रशासनाचा भाग आहेत. तिसरा घटक आहे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा. यांचे प्रकार, निवडणूक, रचना, काय्रे, अधिकार इ. बाबी व्यवस्थित समजून घ्याव्यात.

स्थानिक नागरी व ग्रामीण प्रशासनातील पदाधिकाऱ्यांची उतरंड व त्यांचे अधिकार, कार्य, नेमणूक या बाबीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. त्र्याहत्तराव्या व चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्त्यांमधील तरतुदी, स्थानिक स्वराज्य संस्थाकडे सोपवलेले विषय, सुरू केलेल्या समित्या / आयोग इ.चा अभ्यास आवश्यक आहे. या समित्यांकडून करण्यात आलेल्या शिफारशी, त्या अनुषंगाने घेण्यात आलेले निर्णय व त्यांची अंमलबजावणी यांचा नेमका अभ्यास करायला हवा.

dr.sumdhidra

डॉ. सुमथिंद्र नाडिग


6271   10-Aug-2018, Fri

कन्नड साहित्यक्षेत्राला महिनाभराच्या अवधीतच दोन धक्के पचवावे लागले. काव्य आणि गीतलेखन हेच ज्यांचे श्रेयस व प्रेयस होते असे एमएन व्यास राव यांचे गेल्या महिन्यात आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाच्या धक्क्यातून साहित्यक्षेत्र सावरत नाही तोच बुधवारी विख्यात कवी डॉ. सुमथिंद्र नाडिग यांनी जगाचा निरोप घेतल्याची वार्ता आली.

कन्नड साहित्याच्या साठोत्तरी कालखंडातील अत्यंत महत्त्वाचे कवी असलेल्या नाडिग यांचा जन्म ४ मे १९३५ चा. चिकमंगळूर जिल्ह्य़ातील कलासा हे त्यांचे मूळ गाव. तरुणपणापासूनच साहित्याची गोडी त्यांना लागली. कन्नड ही तर त्यांची मातृभाषा होती आणि इंग्रजी साहित्यात त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली होती. या शिवाय मराठी, कोंकणी, हिंदी आणि बंगाली भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. १९६० मध्ये गोपाल कृष्ण अडिग यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकात आधुनिक साहित्य चळवळ सुरू झाली तेव्हा नाडिग त्या चळवळीत ओढले गेले. याच काळात त्यांचा ‘पंचभूत’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला.

आधुनिक कन्नड काव्यात तो खूपच महत्त्वाचा मानला गेला. नंतर त्यांनी अनेक कविता लिहिल्या. काव्याच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल अडिग यांच्याखेरीज नरसिम्हचारी, अयप्पा पणिक्कर, सीतांशू यशश्चंद्र, मनोहर राय सरदेसाई, एस एल भैरप्पा, यू आर अनंतमूर्ती यांसारख्या प्रथितयश लेखकांनाही घ्यावीशी वाटली, यातच त्यांच्या लेखनातील कस दिसून येतो. ‘दाम्पत्य गीता’ या त्यांच्या काव्यसंग्रहात प्रेम आणि विवाह याविषयीच्या कविता आहेत. समीक्षकांनी या काव्यसंग्रहाचीही आवर्जून दखल घेतली. द रा बेंद्रे वा के एस नरसिम्ह स्वामी यांच्यासारख्या दिग्गज लेखकांच्या साहित्यकृतींवर लिहिताना त्यातील उणिवांवरही त्यांनी बोट ठेवले. लघुकथांबरोबरच मुलांसाठीही त्यांनी अनेक पुस्तके लिहिली.

रवींद्रनाथ टागोरांची काही पुस्तके त्यांनी कन्नडमध्ये अनुवादित केली. अखंड शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या नाडिग यांनी म्हैसूर विद्यापीठासोबतच अमेरिकेतील टेम्पल विद्यापीठातूनही पदव्युत्तर पदवी संपादन केली. हरिद्वारच्या गुरुकुल कांगडी विद्यापीठाने ‘शब्द मार्तण्ड’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात त्यांना वेगळाच आनंद मिळत असल्याने गोवा विद्यापीठासह देशभरातील अनेक विद्यापीठांत अतिथी प्राध्यापक म्हणून ते जात. तीन वर्षे ते नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्षही होते. कर्नाटक सरकारचा व काही खासगी पुरस्कार त्यांना मिळाले, मात्र साहित्य अकादमीसारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारापासून ते वंचित राहिले. असे असले तरी कन्नड साहित्यातील त्यांची कामगिरी विसरता येणार नाहीच.

shantabai kate

शांताबाई काटे


8294   09-Aug-2018, Thu

लोककलांचा इतिहास कितीही देदीप्यमान असला, तरी त्याचे वर्तमान मात्र चिंतेने ग्रासलेले असते. मराठी चित्रपटातून तमाशाची सद्दी संपल्यानंतर हा कला प्रकार केवळ फडांपुरताच मर्यादित राहिला. त्यामुळे त्याचे अर्थकारणही बदलले आणि तमाशा कलावंतांच्या भाळी विपन्नावस्थेचे सावटही आले. तमाशासम्राज्ञी शांताबाई काटे या अशाच कलावंतांपैकी एक.

तमाशाचे विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या तुकाराम खेडकर यांच्या प्रेरणेने त्या तमाशा या लोककलेच्या चरणी रुजू झाल्या. ५०-६० वर्षांच्या कलासेवेनंतर शांतामावशी शेवटी अकोले तालुक्यातील नातसुनेकडे राहत होत्या. त्या मूळच्या शेवगाव तालुक्यातील आख्खी कोरडगावच्या. वयाच्या बारा-तेराव्या वर्षी शेतात खुरपायला जाणाऱ्या शांता नावाच्या या देखण्या मुलीला बघून एकाने तिला तमाशात पाठवण्याचा सल्ला दिला.  शांताबाई तमाशाच्या फडात उतरल्या. सुरुवातीला नाशिक जिल्ह्य़ातल्या एका तमाशात १० वर्षे शांताबाईंनी काम केले. त्या वेळी मुंबईत माधवराव नगरकर यांचा तमाशा जोरात होता. शांताबाईंनी एक दिवस मुंबई गाठून नगरकरांच्या तमाशात काम करायला सुरुवात केली. पुढे त्यांच्या रूपावर नगरकर भाळले. नगरकर आणि शांताबाई काटे या जोडीने तब्बल ३० वर्षे तमाशा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मुंबईतल्या अनेक गाजलेल्या तमाशा फडातून त्यांनी काम केले. महारथी कर्ण, हरिश्चंद्र तारामती, संत तुकाराम अशी वगनाटय़े बघायला रसिक गर्दी करायचे. शांताबाई तब्बल पावशेर वजनाचे खऱ्या सोन्याचे दागिने घालून मिरवायच्या. कुणी अडला नडला भेटला की अंगावरचा एखादा दागिना सहज काढून द्यायच्या. माधवराव नगरकर यांच्यानंतर चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्ता महाडिक, कांताबाई सातारकर यांच्या नावाजलेल्या तमाशांमध्ये शांतामावशींनी फड गाजवले. हलाखीच्या परिस्थितीतही त्या स्वाभिमानाने जगल्या. चरितार्थासाठी त्या दहा टक्के व्याजाने पैसे कर्जाने घेत व आपले तुटपुंजे मानधन आले की त्यातून त्या परतफेड करीत आणि पुन्हा कफल्लक होत, असे हे विपन्नावस्थेचे दुष्टचक्र सतत सुरू राहिले. मानलेल्या मुलीनेही त्यांना वाऱ्यावर सोडले.  त्यामुळे लोकांनाच त्यां8च्यावर अंत्यसंस्कार करायची वेळ आली. एकेकाळी लोकांचे मनोरंजन करून त्यांची वाहवा मिळवणाऱ्या, प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या तमाशासम्राज्ञीची मृत्यूनेच सुटका केली व एका शोकांतिकेचा अखेरचा अंक संपला.

richard dsouza

रिचर्ड डिसूझा


3982   07-Aug-2018, Tue

तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र व विज्ञान अशा अगदी वेगळ्या शाखांमध्ये एकाच वेळी पारंगत असणे ही तशी दुर्लभ गोष्ट, पण गोव्याचे खगोल वैज्ञानिक रिचर्ड डिसूझा यांच्याकडे ती आहे! अलीकडेच मिशिगन विद्यापीठाच्या दोन संशोधकांनी असा शोध लावला की, आपल्या आकाशगंगेला एक भावंड होते. ती एक दीर्घिकाच होती, पण तिला शेजारच्या अँड्रोमीडा म्हणजे देवयानी या दीर्घिकेने २ अब्ज वर्षांपूर्वी गिळले. या संशोधनात रिचर्ड डिसूझा यांचा मोठा वाटा आहे. हा शोधनिबंध नुकताच ‘नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला. दीर्घिका, त्यांचा जन्म, गुरुत्वीय बलाने होणारी ओढाताण, एकमेकांशी टकरी असा सगळा प्रवास या शोधनिबंधात मांडला आहे. देवयानीने इतर अनेक लहान दीर्घिका गिळल्या आहेत.

संगणक सादृशीकरणाच्या माध्यमातून डिसूझा यांनी ती गिळली गेल्याचे स्पष्ट केले. जी दीर्घिका (गॅलॅक्सी) देवयानीने गिळली तिचे नाव ‘एम ३२ पी’. या शोधाला वेगळा अर्थही आहे, तो म्हणजे जेव्हा दोन दीर्घिकांची टक्कर होते तेव्हा त्याचा उरलेल्या दीर्घिकांच्या रचनेवर परिणाम होतो तसा तो आपल्या आकाशगंगेवर झाला असावा.

डिसूझा यांचे कुटुंब गोव्यात असले तरी रिचर्ड यांचा जन्म पुण्याचा. काही काळ कुवेतमध्ये राहून, १९९० मध्ये ते गोव्याला आले. मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांनी भौतिकशास्त्रात बीएस्सी, तर जर्मनीच्या हायडेलबर्ग विद्यापीठातून त्यांनी एमएस्सी केले. पुण्यात परत येऊन त्यांनी तत्त्वज्ञान व धर्मशास्त्रात पदवी घेतली. लुडविग मॅक्सिमिलन विद्यापीठातून त्यांनी खगोलशास्त्रात डॉक्टरेट केली. आता मिशिगन विद्यापीठात डॉक्टरेटनंतरचे संशोधन ते करीत आहेत त्यातच त्यांनी हा शोध लावला आहे. दीर्घिका, त्यांची वाढ, विलीनीकरण यावर डिसूझा यांचे संशोधन  आहे. सहा महिन्यांत हे संशोधन केल्याचे ते सांगतात. टक्कर वा विलीनीकरणानंतर दीर्घिकांच्या मूळ चकत्या कुठल्या बदलांतून गेल्या असाव्यात याचा अभ्यास यातून पुढे करता येईल. देवयानी व एम ३२ पी या दीर्घिकांच्या विलीनीकरणानंतर आता काही अब्ज वर्षांनी ‘मॅग्लानिक क्लाऊड’ या दीर्घिकेस गिळल्यानंतरही आपली आकाशगंगा सहीसलामत राहील असा याचा अर्थ आहे.

धर्मशास्त्र व तत्त्वज्ञान यांच्या अभ्यासातून विचारात व्यापकता आली, असे डिसूझा यांचे मत आहे. पुणे, बंगळूरु येथे खगोलशास्त्रातील सैद्धांतिक  अभ्यासावर भर आहे; पण निरीक्षणात्मक संशोधनासाठी मोठी गुंतवणूक करावी लागेल, असे ते सांगतात. धर्मशास्त्र, विज्ञान, तत्त्वज्ञान यांची गल्लत न करताही काम करता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे.

lawyer gita mittal

न्या. गीता मित्तल


5559   06-Aug-2018, Mon

जम्मू-काश्मीरमध्ये अनेकदा संवेदनशील विषय न्यायव्यवस्थेपुढे निवाडय़ासाठी येत असतात, त्यामुळे तेथील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती होणे हे तसे आव्हानात्मकच. त्यात या न्यायालयात प्रथमच महिलेची मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांचे नाव आहे न्या. गीता मित्तल.

१९५८ मध्ये दिल्लीत एका सुशिक्षित कुटुंबात गीता मित्तल यांचा जन्म झाला. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी एलएलबी केले. २००४ मध्ये त्यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. त्याआधी त्यांनी १९८१ पासून अनेक न्यायालयांत वकिली केली. २००८ मध्ये त्यांनी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या कार्यकारी मंडळाचे संचालकपद स्वीकारले.

२०१३ मध्ये नवी दिल्लीच्या दी इंडियन लॉ इन्स्टिटय़ूट या संस्थेच्या प्रशासकीय समितीवर त्यांची नियुक्ती झाली. लैंगिक गुन्हेगारी मार्गदर्शक तत्त्वे अंमलबजावणी समितीवर काम करतानाच त्यांनी दिल्लीतील कनिष्ठ न्यायालयात जिवास धोका असलेल्या साक्षीदारांसाठी न्यायालयीन प्रकल्प सुरू केला. त्यासाठी वेगळ्या प्रकारची न्यायालये सुरू केली. भारतातील असे पहिले न्यायालय त्यांच्या प्रयत्नातून २०१२ मध्ये दिल्लीत सुरू झाले.

न्यायालयीन कामाशी निगडित अनेक समित्यांवर त्यांनी काम केले. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीविरोधातील समितीच्या त्या सदस्य होत्या. अंतर्गत स्थलांतरित व्यक्तींना निवाऱ्याचा अधिकार, दंगलग्रस्तांना नुकसानभरपाई, लष्करातील महिलेस विवाहाचा अधिकार, निमलष्करी दलात लैंगिक  कमतरता असलेल्या व्यक्तीची नेमणूक, डीएनए तपासणीच्या आधारे लैंगिक गुन्ह्य़ांचा निवाडा, गर्भवती राहिल्याने महिलेस पुढील सेवेतून काढण्यास प्रतिबंध असे महत्त्वाचे निकाल त्यांनी दिले. २०१२च्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर न्या. जे.एस. वर्मा समितीच्या अहवालात वीरेंदर विरुद्ध सरकार या खटल्यात न्या. मित्तल यांनी दिलेला निकाल हाच मुख्य आधार होता.

न्या. गीता मित्तल यांची कामगिरी शाळेत असल्यापासूनच चमकदार होती, त्यांना राष्ट्रपतींचे प्रशस्तिपत्र मिळाले होते. व्हॉलिबॉलमध्ये त्यांनी दिल्लीचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केले होते. त्यामुळे नेतृत्वाचे गुण त्यांच्यात तेव्हापासून दिसत होते. अमेरिकेत त्यांनी जागतिक परिसंस्था व संवर्धनाचे प्रशिक्षण घेतले. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व चतुरस्र आहे. २०१८ मध्ये त्यांना  नारीशक्ती पुरस्कार मिळाला होता. आव्हानांचे संधीत रूपांतर करण्याची त्यांची हातोटी वेगळीच आहे, त्यामुळे जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात त्यांची झालेली नेमणूकही त्यांच्या निकालांनी गौरवास्पद ठरेल यात शंका नाही.

ramapada chowdhury

रमापद चौधुरी


5570   04-Aug-2018, Sat

‘एक दिन अचानक’ (१९९०) हा मृणाल सेन यांचा चित्रपट, तर त्याच वर्षीचा ‘एक डॉक्टर की मौत’ हा तपन सिन्हा दिग्दर्शित चित्रपट. याखेरीज द्विपेर नाम तिरंग (१९६३), एख्खोनि (१९७०), पिकनिक (१९७२), बनपलाशिर पदाबलि (१९७३), जे जेखाने दांडिए (१९७४), खारिज (१९८२) असे विविध दिग्दर्शकांचे बंगाली चित्रपट.. हे सगळे चित्रपट रमापद चौधुरी यांच्या कादंबऱ्यांवरून बेतलेले होते. त्यांच्या इतक्या कादंबऱ्यांवर चित्रपट कसे काय झाले? काय एवढे निराळेपण होते त्यांच्या लिखाणात?

‘मी माझ्या काळाच्या आणि मध्यमवर्गाच्या गोष्टी कादंबऱ्यांतून मांडतो’ हे रमापद यांचे उद्गार नीट समजून घेतले, तर त्यांच्या लिखाणाचे निराळेपणही कळेल. कादंबरी हा साहित्यप्रकार त्यांना मुळातून कळला होता, कादंबरी म्हणजे खूप जास्त पानांची कथा नव्हे. कादंबरीने काळाचा आणि पात्रांचा पट मांडायचा असतो, याची जाण त्यांनी ‘प्रथम प्रहर’ या १९५४ साली प्रकाशित झालेल्या, पण त्याआधीच लिहिलेल्या पहिल्या कादंबरीपासूनच दाखवली होती.  ही कादंबरी रेल्वेने घडवलेल्या सामाजिक परिवर्तनाबद्दल आहे! रमापद यांच्या घडत्या वयाशी तिचा संबंध आहे.

बंगालातल्या खरगपूर शहरात १९२२ साली ते जन्मले, तेव्हापासून ते १९३९ साली मॅट्रिक पास होईपर्यंत  रेल्वे-कारखान्याने आणि नागपूर-बंगाल रेल्वेने घडवलेल्या बदलांचे ते साक्षीदार होते. ‘खरगपूर त्या काळातच ‘मिनि इंडिया’ झालं होतं. कॉस्मोपॉलिटन झालं होतं’ हा बदल आणि त्यातून येणारे ताणतणाव त्यांनी तरुण वयात टिपले. पण पुढल्या ‘बीज’ या कादंबरीपासून, मध्यमवर्गाचा विचार त्यांनी अधिक साकल्याने केला.

‘बीज’मध्ये परागंदा होणारा संशोधक-प्राध्यापक, त्याच्याविषयी प्रवादांची राळ उठवणारे लोक, त्याला शोधणारे लोक.. या साऱ्यातून सामाजिक प्रवृत्तींचा पट त्यांनी उभारला. ‘लज्जा’ (१९६० च्या दशकातील याच कादंबरीवर मृणाल सेन यांचा ‘एक दिन अचानक’ आधारित आहे), किंवा ‘खारिज’मधूनही, नायक आणि नायिका केंद्रस्थानी असले तरी परिघावरल्या पात्रांनाही निर्णायक महत्त्व देणारा कथागोफ त्यांनी विणला.

‘‘दोन मित्र. दोघेही गरीब तरुण, पण मेहनती. पुढे यापैकी एक होतो राष्ट्रपती. दुसराही करतो प्रगती; पण स्वत:चं ऐसपैस घर आणि सुखवस्तू कुटुंब असण्यापुरती. कमावत्या काळात दोघे दुरावतात. उतारवयात राष्ट्रपतीपद मिळाल्यावर, पहिल्याला येते दुसऱ्याची आठवण. तो जातो मित्राच्या घरी , स्वत:ची खासगी पण लांबलचक मोटारगाडी घेऊन.. मित्र कुठेय? सकाळपासून बाहेर पडलाय, घरचेही वाट पाहतात.. गाडी जाते निघून. मग तासाभरानं हा परत येतो घरी. ‘रस्त्यावर फुलांचा सडा पडला होता.. वेचत वेचत गेलो पुढं, म्हणून झाला उशीर..’ म्हणत नेहमीसारखं हसतो. घरचे सर्द.’’ यासारख्या नाटय़मय प्रसंगांतून (कादंबरी : छाद), साध्याही विषयांतील मोठा आशय त्यांनी दाखवून दिला.पण बहुतेक कादंबऱ्या या एक-दोघा पात्रांवर केंद्रित नव्हत्याच. अनेक पात्रे, त्यांची आयुष्ये एकेका कादंबरीतून चौधुरींनी मांडली.

‘बाडी बदले जाए’ या अशाच बहुपेडी कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार (१९८८) मिळाला. हा चौधुरींना मिळालेला राष्ट्रीय स्तरावरचा एकमेव पुरस्कार. पश्चिम बंगालमधील सरकारे बदलली, तरी राज्यस्तरीय महत्त्वाचे तीन पुरस्कार त्यांना मिळाले. स्वत्व जपण्याच्या सवयीमुळे कदाचित आणखी पुरस्कार मिळाले नाहीत. नव्वदीपर्यंत कणखर राहूनच चौधुरी निवर्तले.

anil sahasrabudhe

अनिल सहस्रबुद्धे


4435   04-Aug-2018, Sat

अभ्यासूवृत्ती, संशोधन यांना प्रयत्नांचे, मेहनतीचे पाठबळ देणाऱ्या व्यक्ती अधिक यशस्वी होतात. प्रा. अनिल दत्तात्रय सहस्रबुद्धे हे अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) अध्यक्षपदी त्यांची नुकतीच फेरनिवड झाली. तंत्रशिक्षणाच्या अभ्यासाचा दर्जा सुधारणे, त्या संस्थांमध्ये समन्वय ठेवणे हे या परिषदेचे एक प्रमुख काम. अशा या महत्त्वाच्या संस्थेची धुरा योग्य व्यक्तीच्या हाती आहे, त्यामुळे भावी पिढीच्या दृष्टीने हे एक आशादायक चित्र आहे.

सहस्रबुद्धे हे मूळचे कर्नाटकचे. हुबळीतील महाविद्यालयातून त्यांनी तंत्रशिक्षण व अभियांत्रिकीची पदवी १९८० मध्ये घेतली. तेव्हा ते सुवर्णपदकाचे मानकरी ठरले होते. त्यानंतर बेंगळुरुच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’मधून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. १९८३ मध्ये  इंडियन इस्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये वैज्ञानिक अधिकारी म्हणून त्यांनी कारकीर्दीला सुरुवात केली. काही महिन्यांनी ते टाटा कन्सल्टन्सीमध्ये रुजू झाले. एकंदर ३१ वर्षांच्या देदीप्यमान कारकीर्दीत त्यांनी शैक्षणिक तसेच संशोधन व महत्त्वाच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यानंतर अरुणाचल प्रदेशातील इटानगर, गुवाहाटी त्याचबरोबर पुण्यातील नामांकित अशा ‘कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’ येथे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. विविध ठिकाणी काम करताना नावीन्याचा ध्यास हे त्यांच्या कामाचे सूत्र राहिले. त्यांच्या कामाची दखल घेऊन  विविध तज्ज्ञ समित्यांवरही त्यांना काम करण्याची संधी मिळाली. त्यात प्रामुख्याने संशोधनाचे पायाभूत स्तरावर काम करणारी संस्था असेल किंवा विद्यापीठ अनुदान आयोगासारख्या महत्त्वपूर्ण संस्थांचा समावेश आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील विकासाबाबतचे योगदान तसेच उद्योगप्रवणतेला चालना देणारे उपक्रम राबविल्याबद्दल  ‘प्राज’ उद्योगाकडून त्यांना गौरवण्यात आले आहे. अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा सुधारणे त्याचबरोबर या क्षेत्रातील अपप्रवृत्तींना आळा घालणे हे महत्त्वाचे आव्हान सहस्रबुद्धे यांच्यापुढे आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून राज्यातील विविध खासगी महाविद्यालयांत हजारो जागा रिक्त राहत असल्याने अनेक महाविद्यालये बंद पडली वा बंद पडण्याच्या मार्गवर आहेत. यासाठी विविध क्षेत्रांतील कंपन्यांना कशा प्रकारचे मनुष्यबळ हवे आहे याचा विचार करून नवनवीन अभ्यासक्रम व विषय सुरू करण्यावर आता भर द्यावा लागणार आहे.

burton richter

बर्टन रिश्टर


4922   02-Aug-2018, Thu

भौतिकशास्त्रातील कणभौतिकी शाखेने आतापर्यंत विश्वाच्या उत्पत्तीचे कोडे उलगडण्याच्या दिशेने मोठी वाटचाल केली आहे. त्यात युरोपातील सर्न प्रयोगात हिग्ज बोसॉनसारखे गुणधर्म असलेला कण शोधण्यापर्यंत आपण मजल मारली, पण यात पायाभूत काम फार पूर्वीपासून सुरू झाले. त्यात अणूतील एकेक उपकणांचा शोध लागत गेला. बर्टन रिश्टर या भौतिकशास्त्रज्ञाचाही यात मोठा वाटा होता.

१९७६ मध्ये चार्म क्वार्क नावाच्या नव्या अणू उपकणांचा शोध लागला होता, त्यात रिश्टर यांचे संशोधन महत्त्वाचे ठरले. त्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार विभागून मिळाला होता. आपले विश्व ज्या द्रव्याचे बनलेले आहे त्याच्या आकलनात या शोधाने मोठी भर टाकली होती. द्रव्याचा अधिक सखोल अभ्यास यात शक्य झाला. अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठात ते प्रदीर्घ काळ प्राध्यापक होते.

सरकारच्या विज्ञान धोरणांवर सकारात्मक उद्दिष्टांसाठी प्रभाव टाकण्याचे काम केले, त्यातूनच त्यांनी हवामान बदलांच्या अलीकडे चर्चेत असलेल्या प्रश्नावर पुस्तकही लिहिले होते. स्टॅनफर्डमधील उच्च ऊर्जा कण त्वरणक व प्रगत कण शोधक अशा दोन यंत्राची रचना, उभारणी व नवीन कणांच्या शोधातील योगदान एवढी मोठी कामगिरी त्यांनी केली.

१० नोव्हेंबर १९७४ रोजी त्यांनी भौतिकशास्त्रात मूलभूत संशोधन करताना अशा एका कणाचे अस्तित्व शोधून काढले ज्याचे गुणधर्म वेगळे होते. त्याला नंतर ‘चार्म क्वार्क’ असे नाव देण्यात आले. या कणांच्या शोधातून द्रव्याच्या रचनेविषयी नवीन सिद्धांताला त्यामुळे पाठबळ मिळण्यास मदत झाली. त्या वेळी त्यांनी या कणाचा लावलेला शोध नोव्हेंबर क्रांती म्हणून ओळखला गेला होता. त्याच वेळी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचे भौतिकशास्त्रज्ञ सॅम्युअल सी. सी. टिंग यांनीही हेच गुणधर्म असलेल्या कणाचे संशोधन केले होते. रिश्टर व टिंग यांना १९७६ मध्ये या शोधासाठी नोबेल मिळाले.

रिश्टर यांचा जन्म न्यूयॉर्कमधला. वडील कपडा कामगार, आई गृहिणी. तो दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता,  त्यामुळे नेहमीच दिवे मालवले जात (ब्लॅकआऊ ट). त्यात डोक्यावरचे आकाश स्वच्छ दिसायचे. त्यातून त्यांच्यात आकाशगंगा व विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण झाले. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून पीएच.डी. केल्यानंतर ते स्टॅनफर्डमध्ये प्राध्यापक झाले. तेथील ऊर्जा प्रयोगशाळेचे नेतृत्व केले. २०१४ मध्ये त्यांना अमेरिकेतील प्रतिष्ठेचे विज्ञान पदक मिळाले होते. अनेक विज्ञान संस्थांचे ते मानद सदस्यही होते. त्यांच्या निधनाने विश्वाच्या व अणूच्या अंतरंगात डोकावणारा एक प्रतिभाशाली वैज्ञानिक काळाच्या पडद्याआड गेला आहे.

steve ditko

स्टीव्ह डिटको


3057   01-Aug-2018, Wed

काही काल्पनिक व्यक्तिरेखाही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन जातात, त्यापैकी एक ‘स्पायडरमॅन’! कॉमिक बुकच्या- चित्रकथांच्या माध्यमातून स्पायडरमॅन जगात सर्वाच्या मनावर कोरला गेला. या व्यक्तिरेखेची निर्मिती करणाऱ्यांपैकी एक असलेले स्टीव्ह डिटको यांचे अलीकडेच निधन झाले. आबालवृद्धांच्या मनात ठसलेल्या या व्यक्तिरेखेची मूळ कल्पना स्टॅन ली यांची, पण त्या स्पायडरमॅनला सदेह रूप दिले ते डिटको यांनीच. त्याआधीही कॉमिक पुस्तकांमध्ये पात्रांचे तपशीलवार चित्रण करणारे कलाकार म्हणून डिटको यांची ओळख होती.

डिटको यांचा जन्म पेनसिल्वानियातील जॉन्सटाऊनचा. लहानपणापासूनच त्यांना कॉमिक्सची आवड होती. त्यांच्या काळात ‘बॅटमन’, ‘द स्पिरिट’ या कॉमिक्समुळे त्यांची घडण झाली. १९४५ मध्ये शाळा पूर्ण केल्यानंतर त्यांना लष्कराच्या वृत्तपत्रांसाठी कॉमिक स्ट्रिप्स काढण्याचे काम मिळाले. नंतर त्यांनी बॅटमनचे कलाकार जेरी रॉबिन्सन यांच्या हाताखाली न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेतले. त्यातूनच त्यांची ओळख ‘माव्‍‌र्हल कॉमिक्स’चे स्टॅन ली व कलाकार जॅक किर्बी यांच्याशी झाली. ‘माव्‍‌र्हल’मध्येच त्यांनी स्पायडरमॅन साकारला. १९६२ मध्ये ‘अमेझिंग फॅण्टसी’च्या अंकात स्पायडरमॅनची छबी पहिल्यांदा झळकली. त्यानंतर १९६३ मध्ये ‘माव्‍‌र्हल कॉमिक्स’ने ‘अमेझिंग स्पायडरमॅन’ ही स्वतंत्र मालिकाच आणली. स्पायडरमॅनने ३६० दशलक्ष पुस्तकांचा विक्रम केला आहे. त्यानंतर डिटको यांनी ‘डॉक्टर स्ट्रेंज’ हे पात्र निर्माण केले, पण तोवर ते ‘माव्‍‌र्हल कॉमिक्स’मधून वेगळे झाले होते. त्यानंतर त्यांनी स्क्विर्ल गर्ल, मिस्टर ए, कॅप्टन अ‍ॅटम या पात्रांची निर्मिती केली. ‘शार्लटन कॉमिक्स’साठी त्यांनी काही काळ काम केले व नंतर ‘माव्‍‌र्हल’चा प्रतिस्पर्धी असलेल्या ‘डीसी कॉमिक्स’मध्ये १९६८ मध्ये ते रुजू झाले. तिथे त्यांनी क्रीपरची निर्मिती केली. ती बॅटमनची छोटी खलनायकी आवृत्ती होती. २०१७ पर्यंत ती चित्रे ‘डीसी कंटिन्युइटी’मध्ये प्रसिद्ध होत होती.

डिटको यांचे आयुष्य अगदी बंदिस्त होते. त्यांनी कधी मुलाखती दिल्या नाहीत किंवा जाहीर कार्यक्रम घेतले नाहीत. अतिशय नम्र असे त्यांचे व्यक्तित्व. त्यांनी प्रत्येकाच्या मनात दडलेला नायक ‘स्पायडरमॅन’च्या रूपाने चित्ररूपात प्रकट केला. ‘माव्‍‌र्हल कॉमिक्स’ने जी सांस्कृतिक क्रांती केली त्याचे मूळ स्पायडरमॅनच होते. नंतर स्पायडरमॅनची हीच व्यक्तिरेखा- डिटको यांनी ठरवलेल्या अंगकाठी, चेहरामोहरा आणि वेशभूषेनुसारच-  चित्रपट, टीव्ही शो अशी सगळीकडे वापरली गेली. डिटको यांचा समावेश नंतर १९९४ मध्ये ‘विल इसनर हॉल ऑफ फेम’मध्ये करण्यात आला. डिटको यांच्या निधनाने एक अनोखा कॉमिक्स कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.

hanan hameed

हनन हमीद


6174   31-Jul-2018, Tue

 

प्रसिद्धीची बदलती तंत्रे आणि अतिरेकी धार्मिकतेने पांघरलेला सोशल मीडियाचा नवा बुरखा यामुळे किती सामाजिक उत्पात होऊ शकतात याची एक झलक केरळमधील हनन हमीद हिला भोगाव्या लागलेल्या मानसिक यातनांमुळे दिसली. हनन हमीद ही केरळमधील कोचीनजीकच्या मंडवाना या गावात राहणारी स्वतःचे भविष्य घडवू पाहणारी तरूणी. काडीमोड घेतलेली आई आणि धाकटा भाऊ यांच्यासह राहणारी आणि महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता घरखर्चाला हातभार लावण्यास धडपडत असलेली.

भल्या पहाटे उठून, मासळीबाजारातून मासे खरेदी करायचे आणि सकाळचे कॉलेज झाले की मासे विकायला बसायचे, हा तिचा परिपाठ. शिक्षणासाठी पैसे कमावत असतानाच चित्रपटात अभिनय करण्याचे स्वप्नही ती पाहात असे. तिची धडपड आणि आस्था पाहून एका दैनिकाने याची बातमी केली. त्यानंतर सोशल मीडियावरही तिचे कौतुक होऊ लागले. बातमी वाचूनच अरूण गोपी नामक एका दिग्दर्शकाने तिला चित्रपटात भूमिका देऊ केली आणि सगळे बिनसले.

हल्ली माहिती आणि जाहिरात यातील फरक संपल्याचाही हा परिणाम म्हणाला लागेल. तिच्याविषयीची बातमी हा चित्रपटाच्या प्रसिध्दीचा एक भाग होता, असे समजून तिच्यावर टीका सुरू झाली. डोक्यावर आच्छादन न घेताच मासे विकायला बसली, यावरूनही तिला लक्ष्य केले गेले आणि तिला घराबाहेर पडणे अशक्य झाले.

आधीच्या कौतुकाचे रुपांतर क्षणात टीकेच्या भडीमारात झाले. अखेर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यावर सोशल मीडियावरील हल्लेखोरांचा बंदोबस्त केला गेला. हनन या हल्ल्याने थोडी विचलित झाली असली तरी तिने आपला निश्चय मात्र ढळू दिलेला नाही. केरळसारख्या मातृप्रधान व्यवस्थेतही एका तरूणीला हे सगळे सहन करावे लागत असेल तर अन्यत्र कशी स्थिती असेल, याचा विचारही करवत नाही. 


Top