gopaldas neeraj

गोपालदास नीरज


5654   22-Jul-2018, Sun

देव आनंद यांनी लखनऊतील एका मुशायऱ्यात एका कवीच्या कविता ऐकल्या आणि  त्यांना मुंबईला येण्यास सांगितले. कविता, ग्मज्मला आणि नज्म्म लिहिणे हाच त्यांचा श्वास आणि ध्यास होता.  त्यांचे नाव होते गोपालदास सक्सेना ऊर्फ ‘नीरज’.

नीरज यांचे ‘कारवाँ गुजर गया..’ हे गीत लोकप्रिय नंतर झाले. त्याआधी याच नावाचा त्यांचा काव्यसंग्रह आला होता, जो साठच्या दशकात युवा पिढीत तुफान लोकप्रिय होता. देव आनंदने नीरज यांना सचिनदांकडे नेले. रंगीला या शब्दापासून सुरू होणारे गाणे त्यांना हवे होते. त्यातून नीरज यांनी लिहिले रंगीला रे तेरे रंग में.. हे सदाबहार गाणे; जे ५० वर्षांनंतरही तसेच ताजे टवटवीत वाटते. पुढे मग ए भाय जरा देख के चलो,  बस यही अपराध मैं हर बार करता हूं, पैसे की पहचान यहां,  शोखियों में घोला जाए फूलों का शबाब, दिल आज शायर है ग्मम आज नग्म्मा है, फूलों के रंग से, चूडम्ी नहीं ये मेरा दिल है, लिखे जो खत तुझे,  खिलते हैं गुल यहाँ.. अशी अनेक गीते त्यांनी लिहिली. प्रेम पुजारी, मेरा नाम जोकर, शर्मिली यांसारख्या चित्रपटांतील त्यांची गाणी गाजली तरी हे चित्रपट मात्र तिकीटबारीवर आपटले.  नीरज यांची गाणी घेतली की चित्रपट पडतो, अशी ओरड तेव्हा काहींनी सुरू केली. गीतलेखनाचे तीन मानाचे पुरस्कार मिळाले तरी त्यांना मग काम मिळणे बंदच झाले.

देव आनंदही त्यांना टाळू लागल्याने मग एके दिवशी सरळ बॅग भरून त्यांनी मुंबईला कायमचा रामराम ठोकला आणि इटावा या आपल्या मूळ गावी पुन्हा गेले. जगण्यासाठी त्यांना अनेक नोकऱ्या कराव्या लागल्या. ते सरकारी कार्यालयात टंकलेखक होते तसेच एका दुकानात विक्रेता म्हणूनही त्यांना काम करावे लागले. शेवटी मेरठच्या एका महाविद्यालयात  हिंदीचे प्राध्यापक व नंतर विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. दर्द दिया है, आसावरी, मुक्तकी, कारवां गुजर गया.. (सर्व काव्यसंग्रह), लिख लिख भेजत पाती (पत्रलेखन), पंत-कला, काव्य और दर्शन (समीक्षा) ही त्यांची ग्रंथसंपदा. पद्मश्री (१९९१) आणि पद्मभूषण (२००७) किताबाने सरकारने त्यांना गौरविले होते.

‘बदन के जिसके शराफत का पैरहन देखा, वो आदमी भी यहाँ हमने बदचलन देखा’ वा ‘जब लगा कक्षाएं न लेने का आरोप’ सारखी ग़जम्ल असो वा ‘मानव होना भाग्य है, कवि होना सौभाग्य है’सारखा दोहा सादर करताना कविसंमेलनात त्यांचाच प्रभाव असायचा. त्यांच्या कवितांमध्ये जीवनविषयक तत्त्वज्ञानाबरोबरच प्रगल्भतेची किनार होती. ‘आज भले कुछ भी कह लो तुम, पर कल विश्व कहेगा सारा, नीरज से पहले गीतों में सबकुछ था पर प्यार नहीं था’ असे आत्मविश्वासाने लिहिणारा कवी हिंदीत तरी सापडणारही नाही.हरिवंशराय बच्चन, ओशो हे त्यांच्या कवितांचे चाहते होते. ओशो यांनी अखेरच्या काळात त्यांना बोलावून त्यांच्याशी दीर्घकाळ संवाद साधला होता.  ९३ वर्षांचे दीर्घ आयुष्य त्यांना मिळाले. गुरुवारी प्रेमाचा हा प्रवासी अनंतात विलीन झाला.

ASISH SARAF

आशीष सराफ


3213   21-Jul-2018, Sat

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्तेत आल्यानंतरचा ‘मेक इन इंडिया’ हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प. त्यासाठी मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीत सप्ताह सोहळाही आयोजित केला गेला. नवीन गुंतवणूक, प्रकल्प याबाबत गेल्या चार वर्षांत नेमके कितपत साध्य झाले हे सिद्ध करणारी आकडेवारीही नाही. एक मात्र खरे की या ‘मेक इन इंडिया’ घोषणेमुळे अनेक एमएनसी अर्थात मल्टी नॅशनल कंपन्या म्हणजेच विदेशातील आघाडीच्या कंपन्यांनी भारतातून उत्पादन करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.

दोन दिवसांपूर्वी नवी नियुक्ती जाहीर करणाऱ्या फ्रेंच कंपनी एअरबसचे तेच. अमेरिकी बोइंगची ही कट्टर स्पर्धक कंपनी. ‘मेक इन इंडिया’ला प्रेरित होऊनच कंपनीने देशातील संरक्षण क्षेत्रातील व्यवसायातील स्थान भक्कम करण्याचे निश्चित केले. आणि ही महत्त्वाची जबाबदारी आता मराठमोळ्या नेतृत्वाकडे देण्यात आली. एअरबसच्या हेलिकॉप्टर व्यवसाय विभागाचे प्रमुख म्हणून आशीष सराफ यांची नियुक्ती प्रत्यक्षात आली आहे. सराफ जानेवारी २०१६ पासून कंपनीचे उपाध्यक्ष म्हणून औद्योगिक विकास तसेच भागीदारी विभागाची जबाबदारी हाताळत होते. थर्मेक्स, डेलॉइटसारख्या कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदावर कार्य करणाऱ्या सराफ यांचा एकूणच संरक्षण क्षेत्रातील हवाई साधने, उपकरण निर्मिती क्षेत्रातील अनुभव मोठा आहे.  टाटा समूहाचे संरक्षण क्षेत्रातील अंग असलेल्या भागीदारीतील कंपनीतही ते काही काळ होते.

नागपूर आणि पुण्याच्या अनुक्रमे विश्वेश्वरैय्या एनआयटी व सिम्बॉयसेस आयबीएमचे पदवीधर राहिलेल्या सराफ यांनी विदेशातील अनेक विद्यापीठातून उच्च व्यावसायिक शिक्षण घेतले आहे. सराफ यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने जूनमधील सर्वोच्च एअरबस विमानांची विक्री नोंदविली आहे. तर स्वत: सराफ हे हवाई क्षेत्रातील कार्यात उच्च गुणवत्ता राखणारी उत्पादने विकसित करणारे उत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही गौरविले गेले आहेत. एअरबसकडे आजच्या घडीला १०० हून अधिक हेलिकॉप्टर असून वैद्यकीय तसेच पर्यटन सुविधा पुरविणाऱ्या व्यवसायातही सराफ यांचे मार्गदर्शन कंपनीला लाभणार आहे.

मात्र सराफ यांची नवी निवड ही कंपनीला भारताच्या संरक्षण क्षेत्रात पाय अधिक घट्ट रोवण्याच्या दिशेने झाली आहे. या क्षेत्रात सध्या देशी टाटा तसेच महिंद्र अँड महिंद्र समूह आहेच. तुलनेत सराफ यांच्या नेतृत्वाखाली अधिक उल्लेखनीय कामगिरी बजाविण्याच्या दृष्टिकोनातून ही नियुक्ती एअरबस समूहासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

dr tca raghavan

डॉ. टीसीए राघवन


6957   19-Jul-2018, Thu

राजनैतिक अधिकारी म्हणून काम करतानाच साक्षेपी इतिहासकार ही डॉ. टीसीए राघवन यांची दुहेरी ओळख. इंडियन कौन्सिल फॉर फॉरेन अफेअर्स म्हणजे आयसीडब्ल्यूएच्या महासंचालकपदी त्यांची अलीकडेच करण्यात आलेली नियुक्ती त्यांच्यातील या चतुरस्रतेमुळे सयुक्तिकच आहे. राघवन यांनी दक्षिण आशियातील देशांत राजनैतिक अधिकारी म्हणून काम करताना प्रत्यक्ष घेतलेला अनुभव, पाकिस्तानातील नियुक्तीत त्यांनी बजावलेली कामगिरी यांसह परराष्ट्र खात्यात काम करतानाच्या कारकीर्दीवर आधारित केलेले लेखन या त्यांच्या जमेच्या बाजू.

इस्लामाबाद व सिंगापूर येथे त्यांनी भारताचे उच्चायुक्त म्हणून काम केले. ‘अटेंडंट लॉर्ड्स’, ‘बैराम खान अ‍ॅण्ड अब्दुर रहमान पोएट अ‍ॅण्ड कोर्टियर इन मुघल इंडिया’ ही त्यांची प्रमुख पुस्तके. त्यात अलीकडेच ‘दी पीपल नेक्स्ट डोअर – दी क्युरियस हिस्टरी ऑफ इंडियाज रिलेशन्स विथ पाकिस्तान’ हे पुस्तक विशेष गाजते आहे. त्यात भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंधांचा इतिहास राजनैतिक अधिकारी या नात्याने त्यांनी मांडला आहे. दोन्ही देशांतील संबंधांचे अधिक जिवंत चित्रण, काही किस्से, सामान्य लोकांच्या मनाला स्पर्श करणाऱ्या गोष्टी याची जोड असल्याने त्यात कृत्रिमता नाही. भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंधांचा विचार करताना बहुतेकांनी पूर्वग्रह ठेवूनच मांडणी केली, तसे राघवन यांनी केलेले नाही हे त्यांचे वेगळे वैशिष्टय़. राघवन हे दिल्ली विद्यापीठाचे पदवीधर. नंतर इतिहासातच पदव्युत्तर पदवी घेऊन जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून आधुनिक भारतीय इतिहासात त्यांनी विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी घेतली.

  १९८२ मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण विभागाचे सहसचिव म्हणून काम केले. त्यात त्यांनी दक्षिण आशिया धोरणाच्या आखणीत अनेक मुद्दय़ांवर सखोल विचार केला. राघवन यांचे नाव पाकिस्तान अभ्यासविषयक तज्ज्ञ म्हणून अग्रक्रमाने घेतले जाते. ब्रिटन, भूतान व कुवेत या देशांमध्येही त्यांनी काम केले. २०१२ मध्ये दिल्लीत सामूहिक बलात्काराच्या घटनेतील मुलीला सिंगापूरला उपचारांसाठी हलवण्यात आले होते, त्या वेळी राघवन सिंगापूरमध्ये उच्चायुक्त होते. त्या कसोटीच्या प्रसंगात आंतरराष्ट्रीय माध्यमांना त्यांनी खुबीने हाताळले. भारताचे पाकिस्तानमधील उच्चायुक्त म्हणून ३१ डिसेंबर २०१५ रोजी ते निवृत्त झाले. राघवन हे पारंपरिक ‘बाबू’ पठडीतील अधिकारी नक्कीच नाहीत. त्यामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांकडे इतिहासाचे कुठलेही ओझे न बाळगता ते अतिशय निकोप दृष्टिकोनातून बघू शकतील यात शंका नाही.

anjolie ela menon

अंजोली इला मेनन


6967   18-Jul-2018, Wed

आपल्या चित्रांमधून स्त्रियांची विविध रूपे व त्यांचे भाव टिपणाऱ्या अव्वल महिला  चित्रकारांपैकी एक म्हणजे अंजोली इला मेनन. त्यांना नुकताच राष्ट्रीय कालिदास सन्मान मध्य प्रदेश सरकारने प्रदान केला आहे. दृश्य कलेत स्त्रीजीवनाची विविध रूपे मांडण्याच्या मेनन यांच्या कर्तृत्वाचा खास उल्लेख पुरस्कार समितीने केला आहे. भारतातील अतिशय संवेदनशील व सिद्धहस्त कलाकारांपैकी त्या एक.

सन १९५८ मध्ये त्यांचे एकल चित्र प्रदर्शन दिल्लीत झाले होते तेव्हापासून आतापर्यंत त्यांची कलाकीर्द अव्याहत सुरू आहे. विविध साधनांनी मेनन यांनी स्त्री प्रतिमा रेखाटल्या. मॅसोनाइटवर तैलरंगाने चित्रे रंगविणे, ही त्यांची खास पद्धत. जलरंगांतही त्यांनी काम केले आहे. इटलीच्या मुरानो बेटावर जाऊन त्यांनी काच-कलाकृती घडवल्या. मुंबई विमानतळाच्या ‘टर्मिनल टू’वरील सर्वात मोठय़ा भित्तिशिल्पासह, अनेक भित्तिशिल्पे (म्यूरल) त्यांनी घडविली आहेत. त्यांना इस. २००० मध्ये पद्मश्रीने गौरवण्यात आले होते.

बंगालमध्ये (आताचा पश्चिम बंगाल) १९४० साली त्यांचा जन्म झाला. तामिळनाडूतील निलगिरी हिल्सच्या लॉरेन्स स्कूलमध्ये त्या शिकल्या. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी जे.जे. इन्स्टिटय़ूट ऑफ अप्लाइड आर्ट्स या मुंबईतील उपयोजित कलासंस्थेचा रस्ता पकडला. नंतर दिल्ली विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी साहित्यात पदवी घेतली. त्याच काळात त्या मोदिग्लियानीसारखा इटालियन चित्रकार तसेच अमृता शेरगिल यांच्या चित्रशैलीने- तसेच एम. एफ. हुसेन यांच्या शैलीने प्रभावित झाल्या.

वेगवेगळ्या शैलींतील ५३ चित्रांचे पहिले एकल प्रदर्शन त्यांनी केले तेव्हा त्यांचे वय होते अवघे अठरा. नंतर फ्रेंच शिष्यवृत्तीवर त्यांना पॅरिसमधील इकोल द ब्यू आर्ट्स या संस्थेत कला शिकण्याची संधी मिळाली. पॅरिस, अल्जियर्स, साओ पावलो येथील द्वैवार्षिक महाप्रदर्शनांत (बिएनाले) त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. नवी दिल्लीत २००५ पर्यंत भरणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘ललितकला अकादमी- आंतरराष्ट्रीय त्रवार्षिकी’त तर त्यांनी तीनदा कला सादर केली.

१९८८ मध्ये ‘फोर डीकेड्स’ हे सिंहावलोकन स्वरूपाचे त्यांचे चित्र प्रदर्शन मुंबईत झाले होते. १९९२ मध्ये त्यांचे एक चित्र प्रदर्शन झाले त्यात त्यांनी खुर्च्या, पेटय़ा, कपाटे यांवर चित्रे रेखाटली होती. चित्रकलेतील नियमांची चौकट मोडून त्यांनी एका वेगळ्या पातळीवर ती नेण्याचा प्रयत्न केला. १९९६ मध्ये त्यांनी त्यांच्याच प्रसिद्ध चित्रांमधील प्रतिमा संगणकावर घेऊन अ‍ॅक्रिलिक व तैलरंगात ती सजवली. दिल्लीतील मेनोनजायटिस-थ्री जनरेशन्स ऑफ आर्ट (२००८), गॉड्स अँड अदर्स (२०००), यात्रा (२००६) ही त्यांची चित्र प्रदर्शने गाजली.

dr.kusala rajendran

डॉ. कुसला राजेंद्रन


6298   17-Jul-2018, Tue

सुमारे ४० वर्षांपूर्वी १९७९ मध्ये एका महिलेने विज्ञानातील अगदीच वेगळ्या क्षेत्रात मुशाफिरी करण्याचे धाडस केले, आज त्या नामांकित भूभौतिकशास्त्रज्ञ (जिओफिजिसिस्ट) आहेत. त्यांना नुकताच पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा पहिला महिला वैज्ञानिक पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे नाव आहे डॉ. कुसला राजेंद्रन.

महासागर विज्ञान, वातावरण तंत्रज्ञानातील कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. त्या बेंगळूरुच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या संस्थेत प्राध्यापक आहेत. १९७९ मध्ये त्यांनी उपयोजित भूभौतिकशास्त्रात रुरकी विद्यापीठातून एम-टेक केले. रसायनशास्त्रातील पदवी असूनही त्या रुरकी येथे शिकायला गेल्या कारण तिथे त्यांची बहीण काम करीत होती. तिथे त्या रसायनशास्त्र शिकण्याच्या उद्देशाने गेल्या असताना त्यांनी प्रत्यक्षात भूभौतिकीची वाट निवडली. त्या वेळी भूकंपशास्त्र हा विषय महिलांसाठी वेगळाच होता, पण त्यांनी त्यात काम करण्याचे ठरवले. १९८१ मध्ये सेंटर फॉर अर्थ सायन्स स्टडीज या संस्थेत त्यांनी काम सुरू केले. नंतर अमेरिकेत जाऊन युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅरोलिना विद्यापीठातून पीएचडी केली. देशप्रेमापोटी भारतात परतून येथील भूकंपाचा त्यांनी सखोल अभ्यास केला. किल्लारी (१९९३) व भूज(२००१) भूकंपांच्या अभ्यासाआधारे त्यांनी काही पुस्तकेही लिहिली. २००७ मध्ये डॉ. राजेंद्रन या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेसमध्ये सुरू झालेल्या सेंटर फॉर अर्थ सायन्सेसमध्ये रुजू झाल्या.

भूकंपाचा अभ्यास करण्यासाठी भूगर्भशास्त्राचा अभ्यास आवश्यक असतो. कुसला या त्यांच्या पतीसमवेत याच क्षेत्रात काम करीत आहेत. वादळांचा अभ्यास करून अंदाज वर्तवता येतो तसा भूकंपाचा अंदाज वर्तवता येत नाही. यात केवळ आधीच्या भूकंपांचा अभ्यास करून काही प्रारूपे तयार करून सूचना देता येतात, पण त्यातही फार काही सांगता येत नाही त्यामुळे हे शास्त्र अवघड आहे असे त्यांचे मत आहे. कुसला व त्यांचे पती सीपी राजेंद्रन (भूभौतिकशास्त्रज्ञ) यांनी तमिळनाडूतील कावेरीपट्टिनम येथील २००४ च्या सुनामीचा अभ्यास केला. तेथे पूर्वी, चोल राजांच्या काळातही असे घडल्याचा अंदाज त्यांनी मणीमेखलाई या खंडकाव्यातून बांधला. राजेंद्रन यांनी तेथील वाळूच्या थरांचा अभ्यास केला असता तेथे खरोखर एक हजार वर्षांपूर्वी सुनामी आली होती हे सिद्ध झाले. गुजरात, महाराष्ट्र व हिमालयातील भूकंपाचा मोठा अभ्यास त्यांनी केला असून किमान ४० शोधनिबंध सादर केले आहेत.

angelique karber

अँजेलिक कर्बर


10081   17-Jul-2018, Tue

जर्मनीची अँजेलिक कर्बर ही जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान आहे. त्याला साजेशी कामगिरी करताना प्रथमच टेनिस क्रीडा प्रकारातील प्रतिष्ठेच्या विम्बल्डन विजेतेपदाचा मान मिळवला आहे. मागील वर्षी कन्यारत्न झाल्यामुळे विम्बल्डन स्पर्धेतून माघार घेणाऱ्या सेरेना विल्यम्सला यंदा सर्वाधिक २४ ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवणाऱ्या मार्गारेट कोर्ट यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी होती. मात्र तिचे हे स्वप्न कारकीर्दीत फक्त दुसऱ्यांदा विम्बल्डनचा अंतिम सामना खेळणाऱ्या कर्बरने उद्ध्वस्त केले.

विशेष म्हणजे ३० वर्षीय कर्बरला २०१६च्या विम्बल्डनमध्ये सेरेनाकडूनच अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी व्यावसायिक टेनिसपटू म्हणून कर्बरने कारकीर्द घडवण्यास सुरुवात केली. फुटबॉल आवडणाऱ्या कर्बरला पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळण्याची संधी २००७ मध्ये मिळाली. मात्र, पहिल्याच फेरीत तिला गाशा गुंडाळावा लागला. मग ग्रँडस्लॅम स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी कर्बरला तब्बल चार वर्षे वाट पाहावी लागली. २०१०च्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत तिने मॅरेट अनेला पराभूत करून पहिला विजय मिळवला. त्यानंतर तिच्या कारकीर्दीने उंच भरारी घेतली. २०११च्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत तिने मजल मारली.  २०१२ मध्ये कर्बरने पहिल्यांदाच विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली. मात्र व्हिक्टोरिया अझारेंकाने तिला पराभूत केले.

२०१३ मध्ये कर्बरने एटीपी वर्ल्ड टूर, इस्टोरील व कतार खुली टेनिस स्पर्धा जिंकून सर्वानाच धक्का दिला. महिला एकेरीशिवाय दुहेरीतही तिने उल्लेखनीय कामगिरी केली. २०१६ हे वर्ष कर्बरनेच गाजवले. कारकीर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरून तिने एकाच वर्षी ऑस्ट्रेलियन व अमेरिकन अशा दोन्ही स्पर्धाचे विजेतेपद पटकावले. त्याच वर्षी कर्बरने जागतिक क्रमवारीत अव्वल १० महिलांमध्येही स्थान मिळवले. रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीत रौप्यपदक पटकावणारी ती जर्मनीची पहिली टेनिसपटू ठरली. 

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत तिचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले असले तरी विम्बल्डनचे जेतेपद पटकावून तिने ऐतिहासिक कामगिरी तर केलीच, शिवाय महिलांमध्ये वर्षांनुवर्षे सुरू असलेली विल्यम्स भगिनींची विजयी परंपराही तिने खंडित केली. कारकीर्दीत तिने चारपैकी तीन (ऑस्ट्रेलियन, अमेरिकन, विम्बल्डन) महत्त्वाची ग्रँडस्लॅम जेतेपदे एकदा मिळवली असून फक्त फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेने तिला हुलकावणी दिली आहे. मात्र या विजयामुळे टेनिसजगताला येणाऱ्या काळात कर्बरपर्व सुरू राहील, अशी आशा निर्माण झाली आहे.

v l dharurkar

वि. ल. धारुरकर


3913   14-Jul-2018, Sat

पुरातत्त्व विद्या आणि पत्रकारिता याचे मिश्रण ज्या व्यक्तिमत्त्वात सामावले आहे, ते नाव म्हणजे डॉ. वि. ल. धारुरकर. त्रिपुरा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी त्यांची झालेली निवड मराठवाडय़ासाठी भूषणावह. बातमी लिहिण्यापासून ते इतिहासातील अनेक पुरावे शोधून त्यावर संशोधन करणाऱ्या धारुरकरांनी मराठवाडय़ातील पत्रकारांना इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली.

उस्मानाबाद जिल्ह्य़ातील उमरगा हे मूळ गाव असणाऱ्या धारुरकरांनी शालेय शिक्षणात कधीही पहिला क्रमांक सोडला नाही. बी.ए.च्या दुसऱ्या वर्षांत शिकताना त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. पदवी परीक्षेत पहिला क्रमांक मिळविल्यानंतर रात्रपाळीचे उपसंपादक म्हणून त्यांनी दैनिकात काम केले.

मजकुराचे भाषांतर करत वृत्तपत्रात अनेक वर्षे काम करणाऱ्या धारुरकर यांना इतिहासाची आवड काही स्वस्थ बसू देईना. इतिहासाच्या पुरातत्त्व शाखेत प्रावीण्य मिळवत त्यांनी वेरुळ लेण्यातील जैन शिल्पांचा अभ्यास केला. याच विषयात त्यांची पीएच.डी.देखील आहे. सर्वसाधारणपणे प्रबंध लिहिले की प्राध्यापक मंडळी ते विसरून जातात. मात्र आजही धारुरकरांना त्यांच्या प्रबंधातील ओळीच्या ओळी पाठ आहेत.

१९७५ मध्ये नाशिक महाविद्यालयात इतिहास विषय शिकविणाऱ्या ‘वि. लं.’ची कुसुमाग्रजांशी भेट होत असे. तसेच वसंत कानेटकर यांनाही नाटक लिहिण्यासाठी लागणारे ऐतिहासिक संदर्भही वि.लं.नी शोधून दिले होते. ‘सिंधू संस्कृतीतील कलेचा उत्कट आविष्कार’ या विषयीही त्यांनी संशोधन केले. याच संशोधनासाठी गावोगावी फिरताना त्यांनी अहिराणी भाषा शिकून घेतली.  नाशिक जिल्ह्य़ात एक वर्ष, तुळजापूर येथे एक वर्ष नोकरी करण्यापूर्वी त्यांनी पुरातत्त्व विभागातही काम केले होते. 

इतिहासाच्या प्रांतात रमणारा हा माणूस तसा मूळ पत्रकार. त्यामुळे या क्षेत्रात त्यांनी मोठी कामगिरी केली. पत्रकारितेवरील त्यांची वेगवेगळी ३६  पुस्तके प्रकाशित आहेत. ‘सावरकरांची पत्रकारिता’ हे त्यांचे पुस्तकही बरेच गाजले. विचारांशी बांधिलकी जपत इतिहास आणि वर्तमानाचा दुवा म्हणून त्यांनी केलेले काम लक्षणीय मानले जाते.

शिवाजी विद्यापीठात असताना  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येऊन शिकवावे, अशी त्यांना विनंती करण्यात आली. सोलापूरचे ज्येष्ठ संपादक रंगाअण्णा वैद्य यांच्या पारखी नजरेतून त्यांची पत्रकारिता बहरली. इतिहास आणि वर्तमान याचा साकव बनत धारुरकर यांनी विविध विषयांवर संशोधनपर लेख लिहिले. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास या सर्व विषयांचा आवाका असणाऱ्या धारुरकर यांनी वेगवेगळ्या देशांत त्यांची संशोधने सादर केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १९८३ ते २०१६ पर्यंत पत्रकारितेतील विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. याच विद्यापीठात ‘लिबरल आर्ट्स’ या विषयाचा अभ्यासक्रम आखण्यात त्यांचे मोठे योगदान होते. इतिहास आणि पत्रकारिता अध्यापनातून वर्तमानाशी सांगड घालणाऱ्या धारुरकर यांची त्रिपुरा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी झालेली निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

brian gitta

ब्रायन गिट्टा


8457   12-Jul-2018, Thu

ब्रायनला सतत ताप येत होता, पण रोगाचे निदान होत नव्हते. गरज ही शोधाची जननी असते असे म्हणतात. त्यातूनच मग तो व त्याच्या मित्रांनी वैद्यकशास्त्राची पुस्तके तर धुंडाळली, शिवाय तो संगणक अभियंता असल्याने त्याला तंत्रज्ञानाची बाराखडी चांगली अवगत होती. त्यातूनच त्याने एक उपकरण शोधून काढले, त्याने या उपकरणाने रक्ताची चाचणी केल्यानंतर तो मलेरिया असल्याचे निष्पन्न झाले. ब्रायन गिट्टा हा २४ वर्षांचा युगांडाचा संशोधक आहे. त्याने रक्ताची चाचणी करण्यासाठी जे उपकरण शोधले आहे त्याला आफ्रि केचा अभियांत्रिकी नवप्रवर्तनाचा पुरस्कार मिळाला आहे.  या उपकरणाचे नाव ‘माटिबाबू’. त्याचा स्वाहिली भाषेतील अर्थ ट्रीटमेंट म्हणजे उपचार.

ब्रिटनच्या रॉयल अकॅडमी फॉर इंजिनीअरिंगचा हा पुरस्कार असून तो तंत्रज्ञानाचा मानवी विकासासाठी वापर करण्यासाठी दिला जातो. ब्रायन हा पुरस्कार मिळवणारा सर्वात तरुण संशोधक. रक्त न काढता मलेरियाची चाचणी करण्याचे उपकरण त्याने शोधले आहे. मलेरिया म्हणजे हिवताप हा युगांडात जास्त आढळणारा रोग आहे.  ब्रायनने शोधलेले उपकरण कु णीही वापरू शकेल असे व किफायतशीर आहे. हे उपकरण रुग्णाच्या बोटांना लावले जाते, ते वापरण्यासाठी कु णा तज्ज्ञाची गरज लागत नाही. या उपकरणातून लाल रंगाचा किरण रुग्णाच्या बोटावर टाकला जातो. त्यात लाल रक्तपेशी दिसत असतात. त्यामुळे योग्य तो संदेश स्मार्टफोनला पाठवला जातो. त्यातून रोगनिदान केले जाते. एरवी मलेरियाचे निदान करण्यासाठी रक्ताच्या चार चाचण्या केल्या जातात, यात केवळ एका चाचणीत काम भागते.  गिट्टा व त्याचे सहकारी हे कंपालातील माकेरे विद्यापीठाचे विद्यार्थी. एखादी समस्या हीच प्रेरणा समजण्याचा धडा त्यांनी विद्यार्थी म्हणून घेतला होता. त्यातूनच त्यांनी माटिबाबूचा शोध लावला. यात रक्तपेशींचा रंग, आकार व संहती लगेच कळते. रोगनिदानाचा निष्कर्ष तुमच्या स्मार्टफोनवर येतो. या शोधात ८० टक्के अचूक निष्कर्ष मिळतात. नंतर ते प्रमाण ९० टक्क्यांवर जाणार आहे. अभियांत्रिकीच्या माध्यमातून वैद्यकातील प्रश्न सोडवताना मानवी विकासाला स्पर्श करणारे हे संशोधन मानवतेसाठी वरदान आहे. हे उपकरण बाजारात येईल तेव्हा त्याची किंमत १०० डॉलर्सच्या आसपास राहील, शिवाय हे उपकरण पुन्हा वापरता येणारे आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कंपन्यांकडून त्याच्याकडे प्रस्ताव आले. त्यामुळे पुरस्काराचा आनंद त्याला साजरा करता आला नाही, पण या शोधातून ठोस असे काही तरी बाहेर पडावे व कुणी तरी त्याचे व्यावसायिक उत्पादन करावे अशी ब्रायनची इच्छा आहे. एकूणच त्याचा हा शोध आफ्रिकेतील मागास देश व विकसनशील देशांसाठी वरदान ठरणार आहे.

 amritlal begal writer

अमृतलाल वेगड


5889   11-Jul-2018, Wed

‘अमृतस्य नर्मदा’, ‘तीरे-तीरे नर्मदा’, ‘नर्मदा तुम कितनी सुंदर हो’ तसेच ‘सौंदर्य की नदी नर्मदा’ ही त्यांची चार पुस्तके, एकाच नदीबद्दल आहेत. या नर्मदेची परिक्रमा त्यांनी दोनदा केली : पहिली वयाच्या पन्नासाव्या वर्षी, तर दुसरी पंचाहत्तरी गाठल्यावर! याखेरीज अन्य पुस्तकेही त्यांनी लिहिली, चित्रे काढली.. नव्वदीपर्यंतचे कृतार्थ, कलामय जीवन जगूनच त्यांनी गेल्या शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला.

अमृतलाल वेगड हे ‘नर्मदापुत्र’ म्हणूनच प्रख्यात होते. लेखक म्हणून त्यांना दोनदा – हिंदी आणि गुजराती या दोन भाषांसाठी- साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. महापंडित राहुल सांस्कृत्यायन पुरस्कारही लेखक म्हणूनच त्यांनी स्वीकारला होता; पण त्यांचे ‘नर्मदापुत्र’ असणे, लेखकपणावरही मात करणारे होते. एकाच नदीवर असे प्रेम करणारे साहित्यिक-चित्रकार त्यांच्याआधीही होऊन गेले आहेत. वॉल्डनकाठचा थोरो आहे, आनंदयात्री रवीन्द्रनाथ ठाकूर आणि त्यांची (आता बांगलादेशात गेलेली) ‘पद्मा’ नदी आहे.. यापैकी रवीन्द्रनाथांच्या ‘शांतिनिकेतन’मध्ये ते शिकले. त्या वेळी नंदलाल बोस तिथे होते. राष्ट्राची सांस्कृतिक उभारणी करण्याचे काम महत्त्वाचे आहे, हे या बोस यांनी जाणले होते. त्यासाठी लोकसंस्कृतीच्या खुणा महत्त्वाच्या मानल्या होत्या आणि निसर्गाशी नाते अपरिहार्य असल्याची खूणगाठ बांधली होती. अमृतलाल यांनी नंदलाल बोस यांच्याकडून संस्कार घेतला, तो निसर्गाशी नाते जोडण्याचा.

जबलपुरात अमृतलाल यांचे वडील कामानिमित्त येऊन राहिले. मूळचे कच्छचे हे वेगड कुटुंब तत्कालीन मध्य प्रांतात स्थिरावले. त्यामुळे अमृतलाल यांच्यावर बालपणापासूनच गुजराती आणि हिंदी या दोन्ही भाषांचे संस्कार झाले होते. आजचा मध्य प्रदेश आणि आजचे गुजरात ही दोन्ही राज्ये नर्मदेचा जल-आशीर्वाद लाभलेली. नर्मदा मध्य प्रदेशात अमरकंटक येथून सुरू होते आणि गुजरातेत भडोच येथे तिच्या खाडय़ा होतात. अमृतलाल वेगड यांनी जन्मभूमी ते पितृभूमी असा प्रवासही परिक्रमेच्या निमित्ताने केला, त्यातून सांस्कृतिक संचिताची झळाळी दोन्ही राज्यांत थोडय़ाफार फरकाने सारखीच आहे हेही त्यांना जाणवले आणि यातून ‘थोडूं सोनूं, थोडूं रूपुं’ हे लोककथांचे पुस्तक सिद्ध झाले.

नर्मदेवर निस्सीम प्रेम करणारे, लोककथांचे संकलन करणारे अमृतलाल नर्मदाकाठच्या आदिवासी जमातींनी महाप्रचंड सरदार सरोवर- इंदिरासागर प्रकल्पाविरुद्ध दिलेल्या लढय़ापासून मात्र अलिप्त राहिले. ‘नर्मदा समग्र ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेचे ते विश्वस्त आणि अध्यक्ष होते; पण गेली काही वर्षे त्यांचे पद नामधारीच राहून, भाजप प्रदेश सरचिटणीसांच्या हाती कारभार गेला होता.

माधवराव ,भिडे ,madhvarao ,bhide ,

माधवराव भिडे


5624   10-Jul-2018, Tue

रेल्वेतील मुख्य अभियंता पदावरून ५६व्या वर्षी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.

मराठी उद्योजकांमध्ये सहकाराची रुजवणूक करण्याचे आव्हान एका व्यक्तीने लीलया पेलले आणि तेही ‘अवघे होऊ  श्रीमंत’ अशा सनातन मराठी मानसिकतेला आव्हान देणारे ब्रीद घेऊन! माधवराव भिडे हे एक व्यक्ती नव्हे तर संस्थाच होते, हे त्यांचा कार्यपट पाहता निश्चितच म्हणता येईल. संघटनकौशल्य, माणसे जोडणारा जिव्हाळा, लोकसंपर्काची आस, एकदा ठरविलेला संकल्प तडीस नेणारा कामाचा उत्साह आणि ऊर्जा, पटकन कोणालाही मदतीसाठी तत्परता अशा साऱ्या गुणांचा समुच्चय म्हणजे माधवराव. ब्रिज इंजिनीअर असलेल्या माधवरावांनी मराठी उद्योजकतेत मैत्रीचा मजबूत पूल बांधला! ‘मी व्यावसायिक होईनच’ असे स्वप्न मराठी तरुणांनी पाहावे, उद्योग वाढवावा, संपत्ती निर्माण करावी आणि स्वत:बरोबरीने इतरांनाही मदतीचा हात देत मोठे करावे, अशा भूमिकेतून त्यांनी २००० सालात सॅटर्डे क्लबची स्थापना केली. या संस्थेच्या आज ४५हून अधिक शाखा आणि १,७०० उद्योजक सदस्यांनी त्याला मूर्तरूप देत खऱ्या अर्थाने मराठी उद्योजकतेचा स्वयंसाहाय्य गट कार्यान्वित केल्याचे दिसून येते.

खरे तर माधवरावांचा उद्योजकीय प्रवास हा सेवानिवृत्तीनंतरच सुरू झाला. रेल्वेतील मुख्य अभियंता पदावरून ५६व्या वर्षी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. तथापि पेन्शनवर गुजराण करीत स्वान्तसुखाय जगणे शक्य असताना, त्यांनी आंतरिक ऊर्मीला अनुसरून उद्योजकतेचा मार्ग चोखाळला. रेल्वेतील मुख्य अभियंता म्हणून कारकीर्दीत त्यांनी कमी खर्चात, सुदृढ, सुबक आणि टिकाऊ  बांधकामाचे अनेक प्रयोग यशस्वीरीत्या राबविले. दिवा- डोंबिवली- वसई रेल्वे मार्गाचा प्रकल्प तसेच वांद्रे-खार हार्बर मार्गाचा अंधेरीपर्यंत विस्तार आणि त्यासाठी ‘प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट’ पद्धतीचा पूल रेल्वेच्या इतिहासात प्रथमच बांधण्यात आला. निवृत्तिपश्चात अभियांत्रिकी आणि सनदी कामाच्या प्रदीर्घ ज्ञान-अनुभवाच्या भांडवलावर ‘भिडे असोसिएट्स’ या सल्लागार संस्थेचा डोलारा त्यांनी उभा केला. कामे इतकी वाढत गेली की अल्पावधीतच देशभरात त्याच्या १५ शाखा उभ्या राहिल्या. ध्येयकेंद्रित सामाजिकता अंगी असल्याने पुलांची उभारणी, त्यामागील अभियांत्रिकी आणि त्यांच्या सांस्कृतिक-आर्थिक महत्त्वाला अधोरेखित करणारी ‘दि इन्स्टिटय़ूट ऑफ ब्रिज इंजिनीअर्स (आयबीबीई)’ची स्थापना त्यांनी १९८९ साली केली. म्हणजे वयाच्या सत्तरीत, ज्या वयात अनेकांना जीवनाबद्दलचा ध्यास संपलेला असतो, त्या वयात माधवरावांनी दोन अत्यंत महत्त्वाच्या संस्थांची पायभरणी केली. नेतृत्वाची दुसरी तरुण फळी हेतुपुरस्सर निर्माण करीत या संस्थांची पाळेमुळे मजबूत पायावर रुजतील याचीही काळजी घेतली.


Top