
बहुमताचे बौद्धिक
1933 25-Dec-2018, Tue
बहुसंख्य हिंदू धर्मीयांनीच तुम्हाला प्रतिष्ठा दिली आणि तरी त्यावर टीका करता, असे काही शहाणे नसीरुद्दीन यांना विचारतात. त्यातून दिसतो तो केवळ सांख्यिकी अहंकार.
धर्मसुधारणा होतात त्या धर्मावर मालकी सांगणाऱ्यांना प्रश्न विचारणाऱ्यांकडून. अनुयायांच्या हातून फक्त रीतिरिवाजाची पळीपंचपात्री सांभाळली जातात. खंडनमंडनाचे दोन हात करण्याची बौद्धिक क्षमता असणारेच कोणत्याही धर्मास पुढे नेत असतात आणि खंडनमंडनास तयार असणारा धर्मच काळाच्या कसोटीवर टिकत असतो. कारण तो असे करण्याची क्षमता असणाऱ्यांचे स्वागत करतो. तथापि कोणत्याही धर्मास खरे आव्हान असते ते त्यांच्या अंध अनुयायी वा समर्थकांचे. हे एक तर मुळात अंध असतात. दृष्टीने आणि विचारशक्तीने. त्यामुळे यांना दुसरी बाजू दिसतही नाही आणि ते समजूनही घेत नाहीत. असे आंधळेपण हे एक प्रकारे मालकी हक्क देते.
या मालकी हक्कातून या अंध अनुयायी गणांचा चरितार्थ चालत असतो. त्यामुळे आपल्या धर्मासंदर्भात जरा कोणी काही टीका करताना दिसला की या मंडळींना असुरक्षित वाटते आणि ते टीका करणाऱ्यांना पाखंडी ठरवून त्यांची मुस्कटदाबी करू लागतात. हिंदू धर्माचे मोठेपण हे की हा धर्म खंडनमंडन करणाऱ्यांचे स्वागत करत आला. मग ते चार्वाक असोत वा गार्गी/मैत्रेयी असोत. आदि शंकराचार्य असोत किंवा ईश्वरचंद विद्यासागर वा राजा राममोहन रॉय. हे सर्व वा असे अनेक हे हिंदू धर्माचे अंधानुयायी नव्हते. त्यांनी धर्माच्या नावे धिंगाणा घालणाऱ्या मुखंडांना प्रश्न विचारले आणि धर्मात कालानुरूप आवश्यक सुधारणा घडवून आणल्या.
हिंदू धर्म पुढे गेला.. आणि त्याचा कडवा इस्लाम झाला नाही.. तो यांच्यामुळे. हिंदुधर्मपालकांच्या कर्मठपणामुळे नव्हे. हिंदू धर्मीयांचे नशीब बलवत्तर म्हणून हे सर्व इतिहासात होऊन गेले. नपेक्षा आजच्या धर्मरक्षक म्हणवून घेणाऱ्यांनी केव्हाच त्यांचा आवाज बंद केला असता. अशी साधार भीती वाटण्याचे कारण नसीरुद्दीन शाह यांच्यासारख्या एका उत्तम कलावंतावर आलेली वेळ वर उल्लेखिलेल्यांप्रमाणे नसीरुद्दीन हे काही धर्मसुधारक नाहीत. तसा त्यांचा दावाही नाही. ते फक्त निधर्मी आहेत.
तथापि अलीकडच्या काळात धर्ममरतडांना धर्मसुधारक सोडाच, पण हे निधर्मीवादी हेच खरे आव्हान वाटते. याचे कारण अंधभक्तांप्रमाणे यांचा विचार करण्याचा अवयव झडलेला नसतो. अशी विचार करण्याची क्षमता असणाऱ्यांहातून घडते ते एकच पाप. ते म्हणजे प्रश्न विचारणे. तेच नसीरुद्दीन यांच्याकडून घडले. देशाच्या काही प्रांतांत माणसाच्या हत्येपेक्षा गाईच्या हत्येचाच बभ्रा होतो, हे कसे, असा आणि इतकाच त्यांचा प्रश्न. बरे तो अस्थानी आहे, असे म्हणावे तर तसेही नाही. त्यांच्या प्रश्नास उत्तरप्रदेशी बुलंदशहरात जे घडले त्याचा आधार आहे. या शहरात कथित गोप्रेमी तरुणांनी पोलीस अधिकाऱ्याचा जीव घेतला.
या पोलीस अधिकाऱ्याचे अस्तित्व गोरक्षकांना का सलत होते? कारण तो केवळ आपले कर्तव्य करीत होता. विद्यमान बहुसंख्याकवादाच्या काळात कर्तव्यपालन याचा अर्थ बहुसंख्याकांना आपले म्हणायचे आणि त्यांच्या गुन्ह्य़ांकडे दुर्लक्ष करायचे. असे न करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्याने गोमांस बाळगल्याच्या केवळ संशयावरून तीन वर्षांपूर्वी घडलेल्या दादरी हिंसाचारातील दोषींना जेरबंद केले.
यात बळी पडलेला मुसलमान होता आणि आरोपी हिंदू. तेव्हा हिंदू असूनही या पोलीस अधिकाऱ्याने हिंदू गुंडांकडे काणाडोळा केला नाही हा त्याचा सद्य:स्थितीत अक्षम्य गुन्हा. त्याची शिक्षा त्यास मिळाली. जमावाच्या हल्ल्यात हा पोलीस अधिकारी मारला गेला. कायद्याचे राज्य असलेल्या कोणत्याही प्रदेशासाठी वास्तविक ही घटना घृणास्पद. तिच्या मागे असणाऱ्यांचा तातडीने शोध घेणे आणि त्यांना तुरुंगात डांबणे हे त्या प्रदेशातील शासकांचे कर्तव्यच.
परंतु उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अजयसिंग बिश्त यांचे मत वेगळे असावे. पहिल्यांदा त्यांनी ही हत्या अपघात ठरवली आणि काही काळाने राजकीय कट. इतकी लज्जास्पद घटना आपल्या राज्यात घडली याबद्दल त्यांना किती खंत वा खेद वाटला हे कळावयास मार्ग नाही. परंतु गोहत्येच्या वावडय़ांनी मात्र ते विव्हल झाले. प्राणिमात्रांवर प्रेम करावे हे खरेच. परंतु म्हणून लटक्या प्राणिप्रेमासाठी माणसांचा जीव घ्यावा असे नाही.
किमान विचारी सज्जनांच्या मनात हीच भावना असेल. नसीरुद्दीन यांनी ती बोलून दाखवली आणि धर्माच्या आधारे या देशात सुरू असलेल्या धार्मिक ध्रुवीकरणाबाबत चिंता व्यक्त केली. आपली मुले कोणत्याच धर्माचे पालन करीत नाहीत. ते ना इस्लामी आहेत ना हिंदू, तेव्हा या धर्मकेंद्रित वातावरणात त्यांचे काय होणार ही कोणत्याही निधर्मी वडिलांस वाटणारी काळजी त्यांनी बोलून दाखवली. त्यांची चूक ती इतकीच.
खाली माना घालून आपल्या विचारशून्यत्वाची जाहीर कबुली देणाऱ्या समाजात ताठ मानेने प्रश्न विचारणे हेच पाप ठरते. तेदेखील एका कलावंताच्या हातून होणे म्हणजे तसे अब्रह्मण्यमच म्हणायचे. सरकारी कृपाकटाक्षासाठी त्याच त्या धोरणांना चित्रपटविषय बनवणारे अनेक कुमार वा महानायक आसपास अक्षय असताना त्यांच्या गोठय़ात स्वत:स बांधून न घेणारा बंडखोरच ठरणार. नसीरुद्दीन तसे ठरले यात आश्चर्य नाही. त्यामुळे समाजमाध्यमांतील झुंडी त्यांच्यावर चालून गेल्या आणि अजमेर येथील कार्यक्रम त्यांना रद्द करावा लागला. नेहमीप्रमाणे काही अतिउत्साहींनी त्यांना पाकिस्तानवादी म्हटले आणि हिंदुद्वेषीही ठरवले.
या उतावळ्या धर्मवेडय़ांच्या वर्तनातून त्यांचे धर्मप्रेम नव्हे तर धर्मविषयक अज्ञानच ठसठशीतपणे दिसून येते. देव या पारंपरिक संकल्पनेस आव्हान देणाऱ्या चार्वाक या बुद्धिवानास या धर्माने पूजनीय मानले. वेदांच्या अंधपूजेस आव्हान देणारा कणाद हिंदू धर्मानेच वंदनीय मानला. अद्वैताचा धर्मविचार मानणारे आदि शंकराचार्य याच धर्मात पूजले गेले. साचलेल्या धर्मविचारास आर्यसमाजी वाट देणारे स्वामी दयानंद हेदेखील हिंदूच आणि वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा असे म्हणणारे तुकाराम तर संतच. असे किती दाखले द्यावेत?
पण त्याचा उपयोग उघडे डोळे आणि मोकळे मन असणाऱ्यांनाच. मनाची कवाडे बंद असली की नसीरुद्दीन यांना मिळाली तशी वागणूक मिळते. बहुसंख्य हिंदू धर्मीयांनीच तुम्हाला प्रतिष्ठा दिली आणि तरी त्यावर टीका करता, असे काही शहाणे नसीरुद्दीन यांना विचारतात. त्यातून दिसतो तो केवळ ते आणि आपण हा निव्वळ सांख्यिकी अहंकार. संपत्तीप्रमाणे लोकसंख्येचा आकारही मिरवायचा नसतो. तो मिरवावा लागण्याइतकी केविलवाणी अवस्था दुसरी नाही. स्वत:स कडवे हिंदू धर्माभिमानी म्हणवून घेणारे अलीकडच्या काळात हिंदू धर्माच्या खऱ्या मोठेपणापेक्षा सांख्यिकी आकाराबद्दलच फुशारक्या मारताना दिसतात. हे दुर्दैवी खरेच. पण त्याचबरोबर हे हिंदू धर्मासही लहान करणारे आहे, याची जाणीवच या मंडळींना नाही.
अशा वेळी खरे तर या धर्मातील तसेच सत्ताधाऱ्यांतील शहाण्यांनी या अतिउत्साहींचे कान उपटायला हवेत. ते राहिले दूर. सत्ताधीश उलट या घटना पाहून न पाहिल्यासारखेच करताना दिसतात. हे धोक्याचे आहे. अशाने हे धर्माभिमानी अधिकच हाताबाहेर जातील आणि मोठाच उत्पात करू शकतील. हे कळण्याइतका शहाणपणा नेतृत्वाने दाखवण्याची गरज आहे. त्यासाठी नसीरुद्दीन यांच्यावर झुंडहल्ला करण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधण्याचा मुत्सद्दीपणा हवा. त्याच वेळी समाजानेही आपली विवेकशक्ती जोपासायला हवी. शहाण्यांचे मौन हे वेडय़ांच्या दुष्कृत्यापेक्षा अधिक घातक असते. तेव्हा जे काही मोजके शहाणे उरले असतील त्यांनी पोकळ बहुमताचे दडपण घेण्याची मुळीच गरज नाही. बहुमताचे योग्य असतेच असे नव्हे.
‘‘ख्रिस्ताला सुळावर चढवणारे आणि ते मुकाट पहात बसणारे बहुमत योग्य होते काय? पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सांगणाऱ्या गॅलिलिओस फरफटत नेऊन मारणारे बहुमतातच होते. त्या बहुमताच्या कृतीस रास्त म्हणायचे काय? आपण चुकलो याची जाणीव बहुमतास व्हायला पाच दशकांहून अधिक काळ लागतो,’’ असे आपल्या ‘अॅन एनिमी ऑफ द पीपल’ या गाजलेल्या ग्रंथात विख्यात नाटककार हेन्री इब्सेन लिहून जातो, तेव्हा ते कालातीत सत्य बनते. ‘‘The Majority is never right untill it does right’’, हे त्याचे वचन हे खरे बहुमताचे बौद्धिक. त्याची आज अधिक गरज आहे.