poverty

दारिद्रय़ाची समस्या


5440   20-Sep-2018, Thu

यूपीएससी मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सामान्य अध्ययन पेपर १ मध्ये ‘भारतीय समाजातील ज्वलंत मुद्दे’ या अभ्यासघटकांतर्गत ‘दारिद्रय़ आणि उपासमार’ हा सामाजिक मुद्दा अंतर्भूत आहे.

दारिद्रय़ाची समस्या भारतापुरती मर्यादित न राहता या समस्येने वैश्विक रूप धारण केल्याचे दिसते. त्यामुळेच संयुक्त राष्ट्रसंघाने २००० या वर्षी ‘सहस्रकातील विकासाची उद्दिष्टय़े’ निश्चित केली होती. त्यातील प्रमुख ध्येय म्हणून दारिद्रय़ आणि उपासमारी यांचे एकूण प्रमाण निम्म्यावर आणण्याचा प्राधान्याने अंतर्भाव केलेला होता. संयुक्त राष्ट्रसंघाने सहस्त्रकातील विकासाची ठरविलेली उद्दिष्टय़े पूर्ण करण्यात शासनाच्या पातळीवर भारताच्या उपलब्धीचे प्रमाण कार्य आहे, याचाही अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा. दारिद्रय़रेषेखालील लोकांचे प्रमाण माहिती करून घेणे, दारिद्रय़रेषेपासून दारिद्रय़ाच्या अंतराचा दर तपासणे, तसेच राष्ट्रीय उपभोगामधील वाटा शोधून त्यातील सरकारची कामगिरी निश्चित करता येणे आणि येणारे गतिरोधही समजून घ्यावेत.

यासंबंधी आंतरराष्ट्रीय दबाव पाहता गेल्या १५ वर्षांत भारताने शासनाच्या पातळीवर अनेक कृतिकार्यक्रम आखून त्याची अंमलबजावणी करण्यात मोठा पुढाकार घेतला. त्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय ग्रामीण आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, इंदिरा आवास योजना, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुज्जीवन योजना अशा कित्येक योजना सरकारने हाती घेतल्या आहेत. त्यामुळे दारिद्रय़ासंदर्भात अशा योजनांवर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.

डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेत ‘दारिद्रय़मुक्तीसाठी प्रथम वंचित होण्याच्या प्रक्रियेपासून मुक्त होण्याची गरज असते’ हे विधान सोदाहरणासहित देऊन स्पष्ट करण्यास सांगितले होते. खरे तर दारिद्रय़ाची संकल्पनात्मक धारणा केवळ आर्थिक नसून ती सामाजिक आहे. उदरनिर्वाहाची किमान साधने उपलब्ध नसणे किंवा ती तुटपुंजी असणे या बाबी आर्थिक दारिद्रय़ामध्ये मोडतात. आर्थिक प्रक्रिया कधीच सुटी आणि स्वायत्त नसते. आर्थिक प्रक्रियेसोबत सामाजिक, राजकीय प्रक्रिया यात अंतर्भूत असतात. भारतीय संदर्भात दारिद्रय़ाची मुळे जात, वर्ग, प्रदेश, लिंग, भाषा, शिक्षण, आरोग्य इ. सामाजिक घटकांमध्ये सापडतात. भारतात व्यक्तींचे सामाजिक स्थान वरील सामाजिक घटकांवर अवलंबून असते. म्हणूनच दारिद्रय़ाची कारणे सामाजिक घटकांच्या परस्पर प्रक्रियेत शोधावी लागतात.

भारतात कल्याणकारी प्रारूप स्वीकारूनसुद्धा दारिद्रय़ाची समस्या कायम राहिली. काँग्रेस राजवटीत ‘गरिबी हटावो’सारखे दारिद्रय़निर्मूलनाचे कार्यक्रम राबवूनही समस्या पूर्णत: नष्ट झाली नाही. वर्तमानातही राज्यसंस्थेची धोरणे आणि कृतिकार्यक्रम राबविले जात आहेत. दारिद्रय़ या समस्येचा अभ्यास करताना धोरणांच्या अंमलबजावणीत अडथळे आणणाऱ्या धोरणात्मक कच्च्या दुव्यांचाही विचार करावा लागतो.

भारताची अर्थव्यवस्था विकसित होताना समांतरपणे दारिद्रय़, उपासमार वाढताना दिसते. अर्थव्यवस्था वृद्धीभिमुख असावी का विकासाभिमुख यातील अंतर्विरोधातून दारिद्रय़, उपासमारी यांसारख्या समस्या निपजतात का, हेही पाहणे महत्त्वाचे ठरते. परिणामी योग्य आणि अचूक उपाययोजना कोणत्या असू शकतील याचा अंदाज बांधता येतो. जलद आर्थिक वाढ, संवर्धित कृषी आणि औद्योगिक विकास, छोटय़ा आणि कुटीरोद्योगांचा विकास, जमीन सुधारणा, सार्वजनिक वितरण व्यवस्थेची सुधारणा, लोकसंख्येवर नियंत्रण, सामान्य सेवा आणि सामाजिक सुरक्षेच्या तरतुदी, स्त्रियांच्या दर्जातील सुधारणा, उत्तम प्रशासकीय संरचना या उपाययोजना करूनच दारिद्रय़ाची समस्या आटोक्यात आणता येऊ शकते.

एका बाजूला दारिद्रय़ आणि उपासमारीचे कारण लोकसंख्या वृद्धीत दाखवले जाते. दुसऱ्या बाजूला लोकसंख्या वाढ ही समस्या नसून उपलब्ध संसाधने विशिष्ट वर्गाकडे केंद्रित झाल्याने उरलेल्या बहुसंख्य लोकसंख्येकडे संसाधनाची कमतरता जाणवते. त्यातून वंचित घटकाच्या वाटय़ाला दारिद्रय़, उपासमारीची समस्या जन्माला येतात. असे विभिन्न दृष्टिकोन लक्षात घेऊन त्यांच्या कारणांपर्यंत पोहोचता येते.

वास्तविक पाहता दारिद्रय़निर्मूलन ही सर्वसमावेशक विकासाची पूर्वअट मानून या सामाजिक संकल्पनेचा अभ्यास करावा लागतो. व्यक्तीच्या अस्तित्वासाठी किमान मूलभूत गरजा आवश्यक असतात, मात्र त्या पूर्ण करण्यासाठी संसाधने कमी पडतात. या अवस्थेला ढोबळमानाने दारिद्रय़ म्हणता येईल. देशकालपरत्वे तिचा अर्थ आणि स्वरूप बदलू शकते. या अर्थाने ही संकल्पना परिस्थितीसापेक्ष आहे. अंतिम दारिद्रय़ामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या किमान गरजांचाही अभाव असतो. या प्रकारचे दारिद्रय़ विकसनशील, अर्धविकसित आणि अविकसित राष्ट्रांमध्ये सर्रास आढळून येते. विकसित राष्ट्रांमध्ये अल्पकालीन दारिद्रय़ दिसून येते. ते अंतिम दारिद्रय़ाच्या उलट असते. मंदीच्या परिणामातून काही काळापुरता आर्थिक पेचप्रसंग अशा देशातील मध्यमवर्गीयांसमोर येतो. त्यांची अर्थव्यवस्था पूर्ववत झाली की त्यांचे पेचप्रसंगही सुटून जातात.

दारिद्रय़ाची मोजपट्टी ही आयुर्मानाची सरासरी, मृत्युदर, मातृत्व, पिण्याचे सुरक्षित पाणी, साक्षरता, शुद्ध हवा, स्त्री सक्षमीकरण, ऊर्जा उपभोग, मालमत्ता धारण, स्वच्छता, प्राथमिक आरोग्य सुविधा, स्वच्छ परिसर इ. बाबींवर अवलंबून असते. भारतात दारिद्रय़ाची रेषा दरडोई प्रतिमाह व्यक्तिगत उपभोगाच्या खर्चाची पातळी आणि दरडोई प्रतिदिन उष्मांक उपभोगाच्या पातळीवरून निर्धारित केली जाते.

अंतिम दारिद्रय़ाची मोजपट्टी काय असावी आणि दारिद्रय़रेषा ठरविण्याचे मापदंड काय असावेत, यावर अनेक समित्या आणि आयोग नेमले गेले. भारतात १९६२ मध्ये अधिकृतरीत्या ग्रामीण कुटुंबाचे मासिक उत्पन्न ११० रुपये आणि शहरपातळीवर १२५ रुपये अशी दारिद्रय़ाची रेषा निश्चित केली होती. पुढे दांडेकर आणि रथ, बर्धन, वैद्यनाथन, भट्टी, अहलुवालिया, महेंद्र देव, मिनहास-जैन-तेंडुलकर, रोहिणी नायर, काकवाणी आणि सुब्बाराव, सुरेश तेंडुलकर, एन. सी. सक्सेना, अर्जुन सेन गुप्ता, अभिजित सेन, नरेंद्र जाधव यांनी वेळोवेळी दारिद्रय़ाची रेषा आणि प्रमाण ठरविण्यात योगदान दिले.

रंगराजन समितीनंतर अलीकडे ८ फेब्रुवारी २०१५ मध्ये अधिकृत दारिद्रय़रेषा निश्चित करण्यासाठी पंगारिया समिती नियुक्त करून कृती गटाची रचना निश्चित केली आहे. या कृतीदलाच्या अहवालात दारिद्रय़ाचे मोजमाप आणि गरीब लोकसंख्येची ओळख ही उद्दिष्टे स्पष्ट केलेली आहेत. या पाश्र्वभूमीवर दारिद्रय़ाची कारणे समजून घेताना त्यामध्ये अविकसित अर्थव्यवस्था, असमानता, आर्थिक वाढीचा कमी दर, वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, औद्योगिक आणि कृषीक्षेत्रातील सुमार कामगिरी, महागाई, सामाजिक आणि राजकीय घटक यांचाही अभ्यास करावा लागतो.

ashaktanche sammelan

अशक्तांचे संमेलन


3167   19-Sep-2018, Wed

एकत्र येण्याने तीन बँकांच्या क्षमतेची जशी बेरीज होणार आहे त्याचप्रमाणे त्यांच्यावरील संकटांचीदेखील बेरीज होणार आहे..

आजारपणाच्या सुरुवातीस उपचार करणे टाळल्यानंतर आजार बळावतो आणि मग त्या रुग्णास थेट इस्पितळाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्याची वेळ येते. संबंधित रुग्णाचा आजार किती गंभीर आहे याचा पूर्ण अंदाज असला तरी त्यास रुग्णालयात दाखल करण्याच्या कृतीचे स्वागतच करावे लागते. म्हणून देना बँक, विजया बँक या दोन तुलनेने लहान बँका आणि त्यातल्या त्यात मोठी बँक ऑफ बडोदा अशा तीन बँकांच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाचे स्वागतच करावयास हवे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली. सदर विलीनीकरणास मंत्रिमंडळाची अनुमती मिळाली असून आता हा प्रस्ताव संबंधित बँकांच्या संचालक मंडळासमोर जाईल. सरकारी बँकांचे हे संचालक मंडळ आपल्याकडे तसे नामधारीच असते. शिवाय सरकार हाच या बँकांचा सर्वात मोठा भागधारक. म्हणजे मालकच. तेव्हा मालकाच्या विरोधात सरकारी बँकांचे संचालक मंडळ जाण्याची सुतराम शक्यता नाही. या विलीनीकरणानंतर तयार होणारी बँक ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक असेल. इतक्या मोठय़ा निर्णयाचे विश्लेषण केवळ वरवरच्या कौतुकाने होणे योग्य नव्हे. त्याच्या तपशिलाचा विचार करावा लागेल. जागतिक बँक संकटाचा दहावा स्मृतिदिन पाळला जात असताना आणि विद्यमान नरेंद्र मोदी सरकार निवडणुकीची तयारी करीत असताना हा विलीनीकरण प्रस्ताव मांडला गेला, ही बाबदेखील महत्त्वाची. मोदी सरकारने एकूणच हाती घेतलेल्या बँकिंग सुधारणांचा भाग म्हणून हे विलीनीकरण हाती घेण्यात येत आहे, असे जेटली म्हणाले.

हा सत्यापलाप आहे. या बँक विलीनीकरणामागे सुधारणांचा विचार नाही. तसा तो असता तर इतका वेळ सरकारने दवडला नसता. आता सरकारला हे विलीनीकरण करावे लागत आहे याचे कारण १ एप्रिल २०१९ पासून भारतात पूर्णपणे अमलात येणारा तिसरा बेसल करार. स्वित्र्झलडमधील बेसल या गावी १९८८ साली जागतिक बँकिंगसंदर्भात पहिली परिषद भरली. तेव्हापासून याबाबतचे करार बेसल या नावाने ओळखले जातात. बँकिंगबाबतचा अलीकडचा करार २००८ नंतरच्या अमेरिकी बँकिंग संकटानंतर केला गेला. त्याची अंमलबजावणी वास्तविक २०१३ पासून होणे अपेक्षित होते. परंतु विभिन्न वित्तीय स्थितींमुळे ती २०१८ पर्यंत पुढे ढकलली गेली. काही देशांच्या विनंतीवरून ती पुन्हा लांबली. आता त्याची अंमलबजावणी १ एप्रिल २०१९ पासून निश्चितपणे केली जाणार असून या करारानुसार बँकांना आपल्या भागभांडवलात लक्षणीय वाढ करावी लागणार आहे. कारण बेसल-३ नुसार जागतिक पातळीवर व्यवसाय करू इच्छिणाऱ्या बँकांनी सुदृढ आणि सक्षम असणे आवश्यक आहे.

सध्याच्या परिस्थितीत भारतीय बँका सुदृढतेचे स्वप्नदेखील पाहू शकणार नाहीत इतक्या त्या अशक्त आहेत. मग त्या जागतिक पातळीवरील स्पर्धेत टिकणार कशा? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे विलीनीकरण. तेव्हा या विलीनीकरणामागे सुधारणांपेक्षा जागतिक बँक कराराची अंमलबजावणी हा मुद्दा आहे. हे सत्य लक्षात घेतल्यानंतर पुढील मुद्दे सहज समजून घेता येतील.

सरकारच्या दृष्टीने यातील सर्वात मोठा मुद्दा म्हणजे आकार. या तीन बँकांच्या विलीनीकरणानंतर तयार होणारी बँक ही तिसऱ्या क्रमांकाची मोठी वित्तसंस्था असेल, असे जेटली म्हणतात. परंतु आकार ही आपल्या बँकांना ग्रासणारी समस्या नाही. आपली स्टेट बँक भारतातील सगळ्यात मोठय़ा आकाराची बँक आहे. पण म्हणून अन्य छोटय़ा बँकांना भेडसावणाऱ्या समस्या स्टेट बँकेसमोर नाहीत, असे अजिबात नाही. उलट त्या अधिक मोठय़ा प्रमाणावर स्टेट बँकेस भेडसावतात. याचे कारण मोठय़ा आकाराचे करायचे काय, याचेच उत्तर आपल्याकडे नाही. म्हणजे आकाराने मोठय़ा याचा अर्थ स्वतंत्र असा नाही. प्रत्यक्षात तसा तो अभिप्रेत आहे. एखादा मुलगा चांगला थोराड, बाप्या झाला म्हणून तो कर्तबगार असतो असे नाही. त्यास स्वतंत्र कर्तबगारी दाखवण्याची संधी आहे की नाही, हा मुद्दा आहे.

दिसायला थोराड आणि प्रत्यक्षात सगळी सूत्रे तीर्थरूपांच्या हाती अशी अवस्था असेल तर आकाराने मोठे होऊन करायचे काय? या तीन बँकांबाबत हा प्रश्न तसाच्या तसा लागू पडतो. स्वातंत्र्याचा अभाव हे भारतीय बँकांचे दुखणे आहे. आकार हे नाही.

दुसरा मुद्दा दोन वा तीन अशक्तांची मोट बांधली की एक सशक्त तयार होतो हा गैरसमज. एखाद्या तगडय़ा पलवानास दोन पाप्यांची पितरे हा पर्याय असू शकत नाही. देना बँक, विजया बँक आणि त्यातल्या त्यात सुदृढ बँक ऑफ बडोदा यांच्या संभाव्य विलीनीकरणासदेखील हा मुद्दा लागू होतो. उदाहरणार्थ यातील देना बँकेच्या बुडीत कर्जाचे प्रमाण २२ टक्के इतके अवाढव्य आहे. याचा अर्थ या बँकेने दिलेल्या प्रत्येकी १०० रुपये कर्जातील २२ रुपये बुडलेले आहेत.

विजया बँकेची परिस्थिती या तुलनेने बरी. या बँकेचे बुडीत खात्यात गेलेले कर्जप्रमाण ६.३४ टक्के इतके आहे. या दोन्हींच्या तुलनेत सशक्त आहे ती बँक ऑफ बडोदा. तिचे बुडीत कर्जप्रमाण १२.४६ टक्के इतके आहे. ही झाली टक्केवारी. ती त्या त्या बँकेसाठी कमीअधिक वाईट आहे. परंतु या तीनही बँका जेव्हा एकत्र येतील तेव्हा ठोक आकारात या बुडीत खात्यात गेलेल्या कर्जाची रक्कम तब्बल ८० हजार कोटी रुपये इतकी महाप्रचंड होईल. याचा सरकारी अर्थ असा की या तीन बँकांना जो भार एकेकटय़ाने पेलवत नव्हता तोच भार त्यांनी एकत्र येऊन पेलणे. तत्त्वत: हे म्हणणे योग्य असले तरी यातील लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे एकत्र येण्याने या बँकांच्या क्षमतेची जशी बेरीज होणार आहे त्याचप्रमाणे त्यांच्यावरील संकटांचीदेखील बेरीज होणार आहे. म्हणजे हे संकटदेखील मोठे होणार आहे. तेव्हा त्यास तोंड द्यावयाचे तर पुन्हा सरकारी भांडवल लागणारच. त्यापासून सुटका नाही. यातील बँक ऑफ बडोदातील ठेवींची रक्कम ही विजया बँक आणि देना बँक या दोन बँकांतील ठेवींच्या एकत्रित रकमेपेक्षा दुपटीने अधिक आहे. याचाच अर्थ असा की या ताज्या निर्णयामुळे बँक ऑफ बडोदास या दोन बँकांचे शुक्लकाष्ठ आपल्या खांद्यावर वाहावे लागणार. म्हणजे ज्याप्रमाणे सरकारने नुकसानीतील आयडीबीआय बँक नफ्यातील आयुर्वमिा महामंडळाच्या गळ्यात मारली आणि बरे असलेल्या संस्थेच्या पायात खोडा घातला त्याचप्रमाणे या दोन नुकसानीतील बँकांचे ओझे बँक ऑफ बडोदास वाहावे लागेल.

तिसरा मुद्दा या बँकांतील सर्व मिळून कर्मचाऱ्यांचा. नव्या प्रस्तावित विलीन बँकांतील कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ८० हजार वा अधिक असेल. यातील एकाही कर्मचाऱ्याला कमी केले जाणार नाही, असे सरकार म्हणते. पण त्याच वेळी इतक्यांना पोसत नवी बँक नफ्यात चालणार नाही, हेदेखील खरे. म्हणजे मग स्वेच्छानिवृत्ती वगैरे काही जाहीर करावे लागणार. याचा अर्थ नव्याने खर्च आला. तो कोण करणार? बँकांनीच करायचा तर त्यांच्या तिजोरीला भगदाड पडणार.

या सगळ्याचा अर्थ इतकाच की केवळ आकाराने मोठी बँक होण्यासाठी विलीनीकरण हे तितके फायदेशीर ठरणार नाही. मोठे झाल्यावर करायचे काय, याचे उत्तर आधी सरकारने द्यायला हवे. अन्यथा स्वातंत्र्याअभावी विलीनीकरण हे अशक्तांचे संमेलन ठरेल.

article 377 related to persons rights

असा मी असा मी..!


6178   18-Sep-2018, Tue

कलम ३७७ बद्दलचा निर्णय ही व्यक्ती-अधिकारास महत्त्व देणारी व्यवस्था तयार करण्याची सुरुवात ठरते..

समलैंगिकता हा आजार आहे, समलैंगिकता हा मानसिक रोग आहे, योगामुळे समलैंगिकता बरी होऊ  शकते अशी बाष्कळ आणि निर्बुद्ध विधाने करणाऱ्या मुखंडांच्या सामाजिक दबावास झुगारून सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी समलैंगिकतेत बेकायदेशीर काही नाही, असा निर्णय दिला, त्याबद्दल न्यायपालिका अभिनंदनास पात्र ठरते. अनेक अर्थानी आणि अनेक कारणांनी हा निर्णय ऐतिहासिक ठरतो. अर्थात असा निर्णय होण्यास एकविसाव्या शतकाची दोन दशके जावी लागली, हे वास्तव नाकारता येणारे नाही. तरीही समलैंगिकतेस गुन्हा ठरवणाऱ्या सौदी अरेबिया, इंडोनेशिया वगैरे देशांच्या रांगेतून आपण पुढे आलो हेही नसे थोडके. तसेच, हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाच्या विविध न्यायाधीशांनी जे भाष्य केले तेदेखील अत्यंत स्वागतार्ह ठरते. सर्व ताकदीनिशी समाजास करकचून बांधून ठेवू पाहणाऱ्या वातावरणात सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल म्हणजे एक वाऱ्याची प्रसन्न झुळूकच. त्याचे महत्त्व समजून घेणे आवश्यक ठरते.

याचे कारण आपल्याकडील अन्य अनेक मुद्दय़ांप्रमाणे लैंगिकता या विषयाबाबतची उच्चकोटीची सामाजिक दांभिकता. शारीर भावना म्हणजे जणू पापच असे शहाजोग आपले सामाजिक वर्तन असते. वरून कीर्तन आतून तमाशा हे अशा समाजाचे व्यवच्छेदक लक्षण. तेव्हा अशा समाजात समलैंगिकतेस अनैसर्गिक, गुन्हेगार, विकृत आदी ठरवले गेले नसते तरच नवल. खरे तर एखाद्या व्यक्तीने आपला कोणता अवयव कशा प्रकारे वापरावा हा पूर्णपणे खासगी मुद्दा आहे. जोपर्यंत त्यांच्या कोणत्याही कृत्याचा तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीस उपद्रव होत नाही तोपर्यंत त्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर बाधा आणण्याचा अधिकार समाजास नाही. परंतु हे साधे तत्त्व आपणास नामंजूर होते. त्यामुळे समलैंगिकतेस आपण गुन्हेगार ठरवत आलो. त्यातून फावले ते फक्त पोलीस आदी यंत्रणांचे. कोणाच्याही शयनगृहात शिरण्याचा अधिकार या सामाजिक वृत्तीमुळे पोलिसांनी स्वत:कडे घेतला आणि आपले खिसे तेवढे भरले. कारण समाजमान्यता (?) नाही म्हणून व्यक्ती आपल्या गरजा भागवणे थांबवतात असे नाही. त्यामुळे समलैंगिकतेस गुन्हेगार ठरवणाऱ्या भारतीय दंड संहितेतील कलम ३७७ मध्ये सुयोग्य बदल होणे गरजेचे होते. तेवढी सांस्कृतिक हिंमत आपल्या सरकारात नाही. कारण सरकारनामक यंत्रणा या बहुमतवादी असतात. ते चालवणारे बहुमताने निवडून आलेले असतात म्हणून बहुमतास सुखावेल तेच करण्याकडे त्यांचा बौद्धिक कल असतो.

परंतु एखाद्या निर्णयास वा परंपरेस बहुमत आहे म्हणजे त्यातून त्या निर्णय वा परंपरेची योग्यता/ अयोग्यता सिद्ध होत नाही. सामाजिक विचारांचा प्रवाह ज्या समाजात क्षीण असतो तो समाज बहुमत या तकलादू समजाचा आधार घेतो. म्हणूनच अशा समाजात ‘पाचामुखी परमेश्वर’ वगैरे छापाचे बौद्धिकदृष्टय़ा अत्यंत कमकुवत वाक्प्रचार रूढ होत गेले. सर्वोच्च न्यायालयाचा कलम ३७७ बद्दलचा निर्णय या मुद्दय़ावरदेखील स्वागतार्ह ठरतो. ‘बहुमतवादी दृष्टिकोन आणि प्रचलित नैतिकता हे घटनादत्त अधिकारांपेक्षा मोठे नाहीत’, हे न्यायालयाचे या संदर्भातील विधान तर जमेल तेथे फलक करून लावावयास हवे. कारण बहुमताचे म्हणजे सगळेच बरोबर असे मानण्याचा प्रघात सध्या आपल्याकडे पडलेला आहे. तेव्हा लैंगिकतेसारख्या पूर्णपणे वैयक्तिक मुद्दय़ावर बहुमत/ अल्पमत, नैसर्गिक/ अनैसर्गिक ठरवणार कोण? असे विचारत या प्रश्नाचे उत्तर सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल देतो. ते म्हणजे या प्रश्नावर निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला नाही, हा. वास्तविक कोणत्याही शहाण्या समाजात नैसर्गिक काय किंवा अनैसर्गिक काय याचा निर्णय सरकारने करावा ही अपेक्षाच कालबाह्य़ आहे. दुसरे असे की नैसर्गिक/ अनैसर्गिक याबाबतचे संकेत कालानुरूप असतात. संस्कृतीचे मापदंडदेखील तसेच असायला हवेत. एके काळी भारतीय समाजात समुद्र ओलांडणे हे पाप होते, ते आताही तसेच मानणे आजच्या संस्कृतिरक्षकांना चालेल काय? तेव्हा या बदलत्या काळाची कोणतीही दखल न घेता समलैंगिकतेस अनैसर्गिक आणि पुढे गुन्हेगार ठरवणे ही आपल्याकडची दांभिकतेची परिसीमा होती. ती दूर करण्याची हिंमत पहिल्यांदा दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए पी शहा यांनी दाखवली. २००९ साली दिलेल्या एका ऐतिहासिक निकालात त्यांनी समलैंगिकतेत अनैसर्गिक असे काही नाही असे स्पष्ट करीत या संबंधांना गुन्ह्य़ाच्या पडद्याआडून बाहेर काढले. तो मोठा निर्णय होता. आणि सरकारने त्याचा आधार घेत महत्त्वाची सुधारणा करून टाकण्यात शहाणपणा होता. तो त्या वेळी सरकारला दाखवता आला नाही आणि आताही तसे करणे सरकारने टाळले. त्यात सर्वोच्च न्यायालयाने नंतर दिल्ली उच्च न्यायालयाचा तो निर्णय फिरवल्याने ही समस्या अधिकच गुंतागुंतीची झाली. त्यावर लोकसभेत कायदा करून बदल घडवणे हा मार्ग होता. पण ते धारिष्टय़ सरकारकडे नव्हते. ‘मी योगमार्गाने समलैंगिकतेचा आजार बरा करू शकतो’, असे महान विधान करणारे बाबा रामदेव हे सांप्रतचे राजगुरू असल्याने असे काही होण्याची शक्यताही नव्हती. एकीकडे समलैंगिक संबंधांस कायदेशीर दर्जा देऊन त्यांना विवाहाचीही परवानगी अनेक पुढारलेल्या देशांत दिली जात असताना आपण मात्र वसाहतकालीन नैतिकताच कवटाळून होतो.

अखेर सर्वोच्च न्यायालयानेच यातून आपली सुटका केली. तसे करताना आपल्याच निर्णयाचा पुनर्विचार करण्याची तयारी या न्यायालयाने दाखवली. हे अभिनंदनीय आणि स्वागतार्ह आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. इंदू मल्होत्रा, न्या. आर एफ नरिमन आणि न्या. अजय खानविलकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना समलैंगिकतेस गुन्हा ठरवणारा जवळपास दीडशे वर्षांचा जुना कायदा सहमतीने होणाऱ्या कोणत्याही लैंगिक वर्तनाबाबत गैरलागू ठरविला. इतकेच नाही तर व्यक्तीच्या अन्य मूलभूत अधिकारांप्रमाणे आणि अधिकारांइतकाच समलैंगिकता हादेखील मूलभूत अधिकार आहे, हे न्यायालयाने स्पष्ट केले. आपणास विकसित समाज म्हणवून घ्यावयाचे असेल तर व्यक्ती आणि समाजास त्यांचे त्यांचे पूर्वग्रह सोडावे लागतील. अशा पूर्वग्रहांमुळे आपण इतरांवर अन्याय करत असतो, याचीही जाणीव सर्वोच्च न्यायालयाने या निकालात करून दिली. हे विधान दूरगामी ठरू शकते. गोमांस आदी प्रश्नांवरचे पूर्वग्रह आपल्याकडे दिसू लागले आहेतच. असो. न्या. इंदू मल्होत्रा यांची अलीकडेच सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली. या घटनापीठातील त्या एकमेव महिला न्यायाधीश. हा निकाल देताना त्यांनी काढलेले उद्गार दखलपात्र ठरतात. समलैंगिकांना आपण ज्या पद्धतीने इतका काळ वागवले ते पाहता समाजाने त्यांची माफी मागायला हवी, असे न्या. मल्होत्रा म्हणाल्या. असे काही करण्याइतकी आपली सामाजिक प्रगल्भता नाही, ही बाब अलाहिदा.

त्याचमुळे न्यायालयाने सरकारांना दिलेला आदेश आपल्या वास्तवाची जाणीव करून देण्यास पुरेसा ठरतो. या निर्णयास जास्तीत जास्त व्यापक प्रसिद्धी द्या, विशेषत: पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना याची माहिती द्या म्हणजे समलैंगिकांवर अन्याय होणार नाही, असे न्यायालयाने बजावले, यातच काय ते आले. हा निर्णय देताना सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी एका जर्मन तत्त्ववेत्त्याचे विधान उद्धृत केले, ‘‘I am what I am’’. तेव्हा ‘‘So take me as I am’’. मी आहे हा असा आहे आणि जसा आहे तसाच तो स्वीकारा. व्यक्तीपेक्षा समाजास मोठे मानणारी व्यवस्था माणसांना साच्यात बसवते. या साच्यात जो मावत नाही, तो बाहेर फेकला जातो. अशा वेळी व्यक्तीचे अधिकार मान्य करणारे हे सर्वोच्च न्यायालयाचे विधान सुवर्णाक्षराने कोरून ठेवावे असे. व्यक्ती-अधिकारास महत्त्व देणारी व्यवस्था तयार करण्याची हा निर्णय सुरुवात आहे. ‘‘कसा मी कसा मी, कसा मी कसा मी’’ या अंतर्मुख करणाऱ्या प्रश्नावर समलैंगिक यापुढे ‘‘असा मी असा मी, जसा मी तसा मी’’ असे उत्तर ताठ मानेने देऊ  शकतील.

trade between india and us 2 + 2

२ + २ = २


5119   18-Sep-2018, Tue

भारत – अमेरिका यांच्यात दिल्ली येथे झालेल्या परिषदेत तीन करार झाले, अमेरिकेने पाकिस्तानला इशाराही दिला. तरीही हे यश आपणास हवे होते तितके नाही..

याआधी दोन वेळा रद्द झालेली अमेरिका आणि भारत यांच्यातील दोन अधिक दोन परिषद दिल्लीत अखेर झाली. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दाखवलेली चिकाटी निश्चितच अभिनंदनीय. सध्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेकडून काही काढून घेणे तितके सोपे नाही. तरीही ही दोन अधिक दोन परिषद पार पडली आणि तीत तीन करार होऊ शकले. मोदी सरकारचे हे यश ठरते. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी या दुहेरी चर्चेत भारताचे प्रतिनिधित्व केले. एकाच वेळी परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण यावर चर्चा करणे हाच या दोन अधिक दोन परिषदेचा हेतू. या आधी आपण जपानशी अशी दुहेरी चर्चा केली. परंतु त्यापेक्षा अमेरिकेबरोबर अशी चर्चा होणे हे कित्येक पटींनी महत्त्वाचे होते. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांच्या लहरींमुळे ही चर्चा दोन वेळा ऐनवेळी रद्द करावी लागली. त्यामुळे आताची चर्चादेखील होते की नाही याविषयी शंका होतीच. पण तसे काही झाले नाही. ही चर्चा निर्विघ्न पार पडली. अमेरिकेतर्फे परराष्ट्रमंत्री मायकेल पाँपेओ आणि संरक्षणमंत्री जेम्स मॅटीस या चर्चेसाठी दिल्लीत आले होते. या चौघांतील चर्चात उभय देशांतील संबंधांबाबत तीन महत्त्वाचे करार पार पडले. या चर्चेचे महत्त्व लक्षात घेता तिच्या फलिताचा सविस्तर आढावा घेणे आवश्यक ठरते.

यातील सर्वात मोठा करार आहे तो Communications Compatibility And Security Arrangement, म्हणजे COMCASA या नावाने ओळखला जातो. त्याची अंमलबजावणी ताबडतोब सुरू होईल. या करारानुसार अमेरिका आधुनिक दळणवळणाच्या साह्य़ाने उपलब्ध होणारी माहिती आपणास देणार आहे. मानवरहित ड्रोन, अत्याधुनिक उपग्रह आदींपासून ही माहिती मिळेल. आपल्यासाठी हे फारच महत्त्वाचे आहे. परंतु यातील मेख अशी की अमेरिकी आयुधांमार्फत जमा केली जाणारी माहितीच आपल्याला दिली जाईल. म्हणजे अमेरिकी कंपन्यांनी बनवलेले ड्रोन वा सी १३० सारखी विमाने यांचाच वापर त्यासाठी करावा लागेल. अन्य कोणत्याही साधनांच्या आधारे आपण माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्यास त्यासाठी मदत करण्यास अमेरिका बांधील नाही. या कॉमकासा करारासाठी आपली अमेरिकेशी दहा वर्षे झटापट सुरू होती. त्यानंतर मिळाले ते इतकेच. अर्थात तेही कमी नाही. परंतु जितके अपेक्षित होते तितके खचितच नाही. दुसरा करार आहे तो उभय देशांचे परराष्ट्रमंत्री अणि संरक्षणमंत्री यांच्यात यापुढे थेट संपर्क वाहिनी असेल. त्यामुळे अमेरिकेशी आपला कायम संपर्क राहील. हेदेखील या कराराचे यशच. तिसरा मुद्दा आहे तो भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त लष्करी कवायतींचा. भूदल, आरमार आणि हवाई दल अशा तीनही आघाडय़ांवर भारत आणि अमेरिका यांच्यात संयुक्त लष्करी कवायती होतील. ही बाबदेखील आपल्यासाठी अत्यंत मोलाची. जगातील सर्वोत्तम आणि अत्याधुनिक संरक्षण दलांबरोबर कवायती करायला मिळणे हे आपल्यासाठी एक प्रकारचे प्रशिक्षणच ठरते. तेव्हा ही बाबदेखील आपल्या पथ्यावरच पडणारी. या परिषदेच्या व्यासपीठावरून अमेरिकेने पाकिस्तानला खडसावले. पाकिस्तानने दहशतवादास आळा घालावा असा इशारा भारतीय भूमीतून अमेरिकेने देणे याइतके आनंददायी आपल्यासाठी अन्य काही नाही. अशा इशाऱ्यात प्रतीकात्मकता अधिक असते हे मान्य केले तरी भारतीय राजकारणी आणि समाजमन अमेरिकेने पाकिस्तानला इशारा वगैरे दिल्याने सुखावते हे खरेच. त्याचा विचार करून अमेरिकेने आपणास हा आनंद दिला. तेव्हा याही आघाडीवर ही चर्चा यशस्वी ठरली. तथापि हे यश आपणास हवे होते तितके नाही. किंबहुना अपेक्षेपेक्षा अत्यंत कमीच आहे. कसे, ते समजून घ्यायला हवे.

अमेरिका आणि भारत यांच्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो आपण आणि रशिया, तसेच आपण आणि इराण या दोन देशांतील संबंध हा. आपण रशियाकडून एस ४०० ही क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी करू इच्छितो. पण अमेरिकेने त्या देशावर र्निबध लादले आहेत. आपणास या र्निबधातून वगळावे असा आपला प्रयत्न आहे. त्या संदर्भातील सूतोवाचही झाले आहे. परंतु या परिषदेत त्याबाबत अमेरिकेने नि:संदिग्ध आश्वासन देणे टाळले. इतकेच नव्हे तर या विषयावर या परिषदेत चर्चा केली जाणार नाही, असे स्पष्ट करून अमेरिकेने आपणासाठी भारत आणि रशिया संबंध.. त्यातही लष्करी देवाणघेवाण.. हा मुद्दा संपलेला नाही, हे जाणवून दिले. तीच बाब इराण संदर्भातील. आपण इराणचे मोठे तेल खरेदीदार आहोत. परंतु अमेरिकेने इराणवरही र्निबध लादले असून त्यानुसार ७ नोव्हेंबपर्यंत इराणशी सर्व देश, व्यक्ती वा कंपनी यांनी व्यापारी संबंध तोडणे अपेक्षित आहे. म्हणजे आपणास इराणी तेलावर पाणी सोडावे लागणार. हे आपणासाठी अत्यंत खर्चीक असे पाऊल आहे. तेव्हा त्यातूनही आपणास सवलत मिळावी असा आपला प्रयत्न होता. परंतु अमेरिकेने एक चकार शब्ददेखील या संदर्भात काढला नाही. उलट, कॉमकासा वगैरे करारांचा संबंध भारत आणि इराण संबंधांशी जोडण्यापर्यंत अमेरिकेची मजल गेली. म्हणजे आम्ही इतके देत आहोत तर त्या बदल्यात भारताने इराणशी व्यापारी संबंध तोडणे अपेक्षित आहे, असेच अमेरिकेच्या या दोन मंत्र्यांनी ध्वनित केले. तेव्हा त्या इराणी तेल मुद्दय़ावरची आपल्या डोक्यावरची टांगती तलवार अमेरिकेने काही दूर केलेली नाही. हे झाले या परिषदेतील मुद्दय़ांचे थेट परिणाम. पण त्याहीपेक्षा एका मुद्दय़ावर अमेरिकी अरेरावी आपल्याला सहन करावी लागणार आहे.

उभय देशांतील व्यापार हा तो मुद्दा. आजमितीला उभय देशांतील व्यापारी संबंध हे भारतानुकूल आहेत. ते अमेरिकेस अजिबात मान्य नाही. २३०० कोटी डॉलर इतकी प्रचंड तफावत उभय देशांतील व्यापारांत आहे. ती बुजवावी असे अमेरिकेचे स्पष्ट म्हणणे असून पुढील तीन वर्षे भारताने अमेरिकेकडून किमान १००० कोटी डॉलरची अतिरिक्त खरेदी करावी असा अमेरिकेचा आग्रह आहे. याचा अर्थ इतक्या रकमेची अमेरिकी उत्पादने भारतीय बाजारपेठेत यायला हवी. त्याच वेळी हे व्यापार संतुलन दूर करण्यासाठी अमेरिका मात्र भारतीय उत्पादनांवर र्निबध आणणार अथवा त्यावर अधिक कर लावणार. त्यानुसार भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या पोलाद आणि अ‍ॅल्युमिनियम यावर अमेरिकेने अधिक कर आकारणी सुरू केली असून त्यामुळे भारतीय उत्पादकांना अमेरिकी बाजारपेठेवर पाणी सोडावे लागेल अशी परिस्थिती आहे. कारण अमेरिकी बाजारात ही भारतीय उत्पादने या नव्या करांमुळे महाग होणार आहेत. याबाबत तडजोड करण्याच्या मन:स्थितीत अमेरिका नाही. Generalised System of Preference, GSP हा भारत आणि अमेरिका यांच्यातील नाजुक मुद्दा. यानुसार भारतास अमेरिकी बाजारपेठेसाठी विशेष दर्जा मिळणे अपेक्षित होते. तसा तो मिळाला असता तर अमेरिकी बाजारपेठेत भारतीय उत्पादने अधिक विकता आली असती. ते राहिले दूर. उलट आपण नैसर्गिक वायू, इंधन तेल आणि विमाने अमेरिकेकडूनच घ्यावीत असा आग्रह अमेरिकेने धरला असून त्याबाबत तो देश कमालीचा ठाम आहे. अमेरिका आणि भारत यांतील व्यापार असंतुलन दूर व्हायलाच हवे, असे त्या देशाचे म्हणणे.

म्हणूनच ही परिषद संपवून अमेरिकी पाहुणे मायदेशी रवाना झाले त्याच दिवशी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले, हे सूचक ठरते. बाजारपेठेत भारतीयांचे लाड करणे थांबवायला हवे, अशा अर्थाचे विधान ट्रम्प यांनी केले. तेव्हा दोन अधिक दोन ही परिषद यशस्वी झाली याचा आनंद असला तरी त्याचे उत्तर चार असे मिळू शकलेले नाही, ते दोनच राहिले, हे विसरून चालणार नाही.

lt.general yogesh kumar  singh

ले. ज. योगेश कुमार जोशी


6047   15-Sep-2018, Sat

कारगिल युद्धातील विजयाचे अनेकजण शिल्पकार ठरले. भारतीय भूमीत शिरलेल्या पाकिस्तानी घुसखोरांना पिटाळण्यासाठी भारतीय लष्करातील अधिकारी-जवानांनी पराक्रमाची पराकाष्ठा केली. शत्रूने बळकावलेला प्रदेश ताब्यात घेण्यात महत्त्वाची कामगिरी निभावणारे हे वीर देशवासीयांना सदैव प्रेरणा देतात. टायगर हिलसह परिसरातील महत्त्वाची ठाणी ताब्यात घेणाऱ्या १३ व्या जम्मू-काश्मीर रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर योगेश कुमार जोशी हे त्यापैकीच एक. कारगिल युद्धात जो प्रदेश त्यांच्या व्यूहरचनेतून भारतीय लष्कराने परत मिळविला, त्याच क्षेत्राच्या सुरक्षेची भिस्त सांभाळणाऱ्या १४ कोअरचे प्रमुख म्हणून आता जोशी यांची नियुक्ती झाली आहे. भारतीय लष्करातील या कोअरवर पूर्व-पश्चिमी लडाखच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. त्यात कारगिलचाही अंतर्भाव होतो. एकीकडे पाकिस्तानची नियंत्रण रेषा, तर दुसरीकडे चीनलगतची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा. दोन्ही आघाडय़ांवर कोअरला सजग राहावे लागते. जगातील सर्वात उंचावरील रणभूमी अर्थात सियाचीनदेखील या कोअरअंतर्गत समाविष्ट आहे. तिचे ‘जनरल ऑफिसर अन् कमांडिंग’ अर्थात प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल जोशी यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यांनी या क्षेत्रात पूर्वी ब्रिगेड आणि डिव्हिजनचे नेतृत्व केले आहे. या आधी ते महानिरीक्षक (पायदळ) या पदावर कार्यरत होते.

अतिउंच पर्वतरांगांनी वेढलेले हे दुर्गम क्षेत्र कित्येक महिने बर्फाच्छादित असते. कारगिल युद्धात पाकिस्तानी घुसखोरांनी उंचावरील ठाणी बळकावल्याने भारतीय सैन्य दलाच्या हालचाली, पुरवठा व्यवस्था आदींबाबतची माहिती प्राप्त करणे पाकिस्तानला सुकर झाले. इतकेच नव्हे तर, या क्षेत्राच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणाऱ्या ५६ ब्रिगेडचे मुख्यालयही घुसखोरांच्या दृष्टिपथात होते. या स्थितीत भारतीय लष्कराने- जोशी यांच्या नेतृत्वाखालील १३ व्या जम्मू-काश्मीर रायफल्सच्या बटालियनने – चार यशस्वी हल्ले चढविले. त्यात  ‘पॉइंट ४८७५’चा समावेश आहे. जोशी यांच्या बटालियनने कारगिल युद्धात पराक्रमाची पराकाष्ठा करत उंचावरील भारतीय ठाण्यांवर वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले. या बटालियनच्या कामगिरीचा ‘शुरांमधील शूर वीर’ म्हणून गौरव झाला. बटालियनला दोन परमवीरचक्र, आठ वीरचक्र, १४ सेना पदके प्राप्त झाली. कारगिल युद्धातील कामगिरीबद्दल जोशी यांना ‘वीरचक्र’ देण्यात आले. तत्पूर्वी त्यांचा सेना पदक, अतिविशिष्ट सेवा पदकाने गौरव झाला आहे.

सीमावाद सोडविण्यासाठी चीन-भारत यांच्यात सुरू असलेल्या चर्चेत भारतीय शिष्टमंडळाकडून जोशी यांचा अनेकदा सहभाग राहिला. पूर्व लडाख येथील ब्रिगेड, डिव्हिजनचे नेतृत्व त्यांनी केले आहे. तसेच लष्करी मुख्यालयात लष्करी कार्यवाही विभागाची जबाबदारी त्यांनी काही काळ सांभाळली आहे. लष्करातील हा दांडगा अनुभव त्यांना नवीन जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यास बळ देईल.

mehlii gobhai

मेह्ली गोभई


8069   15-Sep-2018, Sat

मेह्ली  गोभई यांच्या नावाचा मुंबईत रूढ झालेला उच्चार ‘मेल्ही’ असाच होता. त्यांच्या उंच, गौरवर्णी आणि देखण्या व्यक्तिमत्त्वाचा वावर अतिशय सहज असे; त्यामुळे त्यांचे समवयस्क चित्रकार, समीक्षक यांच्यापासून अगदी नवख्यांपर्यंत सर्व जण त्यांना ‘मेल्ही’ अशीच हाक मारत. ते कुणाचेही ‘गोभईसर’ वगैरे कधीच नव्हते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे काय आहे, हे कळण्यासदेखील त्यांच्या मनमिळाऊ- तरीही- संयमी स्वभावामुळेच काही वेळ जावा लागत असे! कुलाब्याला एका दोनमजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर एकटेच ते राहात, तिथेच ६०० चौरस फुटांचा त्यांचा स्टुडिओ होता. थोडय़ाफार ओळखीवर आणि वेळ ठरवण्याचे सोपस्कार पाळल्यास कुणाचेही तिथे स्वागत होई. अशा ‘मेल्ही’ गोभईंची निधनवार्ता गुरुवारी आली. गेल्या दोन वर्षांत कंपवात आणि अन्य व्याधींनी त्यांना घेरले होते. रुग्णालयातच त्यांचे निधन झाले.

डहाणूच्या पारशी कुटुंबात १९३१ साली जन्मलेले  मेल्ही मुंबईत वाढले. सेंट झेवियर्स स्कूल व सेंट झेवियर्स कॉलेजात शिकले. कलाशिक्षण घेतले नसताना, ‘हात चांगला’ म्हणून ते के. एच. आरांच्या घरी- ‘आर्टिस्ट सेंटर’मध्ये जात, अन्य चित्रकारांना भेटत. हा चित्रकारांचा मेळा कधी ‘न्यूड मॉडेल’ चितारण्याचा बेत करी.. ते दिवस मागे ठेवून मेल्ही लंडनला कलाशिक्षणासाठी गेले, तिथून अमेरिकेस गेले. तो १९६० चा काळ अमेरिकी अमूर्त अभिव्यक्तिवाद (अ‍ॅबस्ट्रॅक्ट एक्स्प्रेशनिझम) या चळवळीचा. मार्क रॉथ्कोच्या चित्रांनी मेल्ही  प्रभावित झाले, पण न्यूयॉर्कच्या ‘आर्ट स्टुडंट्स लीग’मधील शिक्षक-चित्रकार नॉक्स मार्टिन यांची- कोणत्याही प्रभावापासून मुक्त राहून आपली वाट शोधण्याची- शिकवण बलवत्तर ठरली. अमेरिकेत एका जाहिरात संस्थेत काम करणारे मेल्ही बोधचित्रांत (इलस्ट्रेशन) प्रवीण होते. तिथे वरच्या पदांवर ते गेले आणि त्यांनी पुरस्कारही मिळवले; पण मुळात अभिजात संगीताची, शांतता आणि स्व-शोधाची आस असलेल्या मेल्हींना डहाणू खुणावू लागले आणि १९८० च्या दरम्यान मायदेशी परतून त्यांनी, अमेरिकेत सुरू केलेल्या अमूर्त चित्रकलेचा पूर्णवेळ पाठपुरावा सुरू केला.

मुलांसाठीची पाच चित्रमय पुस्तके त्यांनी १९६८ ते १९७३ या काळात लिहिली होती. यापैकी दोन पुस्तकांचे पुनर्मुद्रण हल्लीच ‘स्पीकिंग टायगर’ या प्रकाशनसंस्थेने केले; पण ‘रामू अँड द काइट’ हे त्यांचे पुस्तक खरे तर, त्यांची चित्रे समजण्यास सोपी करणारे ठरले असते, ते दुर्मीळच आहे. या पुस्तकात पतंगाच्या आकारावरले मेल्ही यांचे चिंतन सुलभपणे दिसते, तर पुढल्या आयुष्यातही त्यांच्या चित्रांच्या बाह्य़रूपातून (मधोमध रेघ, काही तिरक्या रेघा, मोजक्याच, पण काटेकोर रेघा) अतिशय व्यामिश्रपणे हे चिंतन दिसून येते.

भूमितीचे संगीत आपण ऐकू शकतो. चौल काळातील कांस्यमूर्तीपासून प्रकाशाच्या तिरिपेपर्यंत अनेक ठिकाणी भूमितीचे हे संगीत गुंजत असते, असा मेल्ही  यांचा विश्वास होता. रंग, आकार यांना पूर्ण नकार देऊन मला चित्र घडवायचे आहे, अशा चित्रातून लोकांनी केवळ सरळ रेषांची लय घ्यावी, अशी आस त्यांना होती.  ‘तुमच्या चित्रांत भारतीय काय?’ या थेट प्रश्नाला त्यांचे उत्तर होते- ‘संगीत! धृपद गायकीसारखे शांत संगीत’. हे संगीत ‘समजण्या’साठी प्रेक्षकाला सराव हवा; पण मेल्ही होते तेव्हा ते स्वत: चित्र समजण्यास मदत करीत. आता त्यांच्या चित्रांचे प्रेक्षक पोरके झाले आहेत.

biofuel

जैवइंधन : भरारी आणि सबुरी


3914   05-Sep-2018, Wed

भारतीय विमान वाहतुकीच्या दृष्टीने २७ ऑगस्ट २०१८ हा दिवस महत्त्वाचा ठरतो. कारण या दिवशी स्पाइसजेट कंपनीच्या विमानाने डेहराडून ते नवी दिल्ली असा प्रवास अंशत: जैवइंधनाच्या बळावर केला. पारंपरिक जेट इंधनाच्या (एटीएफ) चढय़ा किमती, त्यांच्यामुळे आणि स्वस्तात तिकिटे विकण्याच्या असहायतेपायी देशातील अनेक विमान कंपन्यांना (जेट एअरवेज हे एक ठळक उदाहरण) लागलेली घरघर, पृथ्वीभोवतालच्या वातावरणाला बाधा पोहोचू नये यासाठी जेट इंधनाचा वापर टप्प्याटप्प्याने घटवण्यामागची अपरिहार्यता असे अनेक घटक विचारात घेतल्यास जैवइंधनांचा पर्याय स्वागतार्हच मानला पाहिजे. पण यानिमित्ताने व्यक्त होत असलेला आशावाद अनाठायी ठरणार नाही याची दक्षता घ्यावीच लागेल.

स्पाइसजेटच्या बम्बार्डियर क्यू ४०० टबरेप्रॉप प्रकारातल्या विमानात २८ प्रवासी आणि कर्मचारी होते. ४० मिनिटांच्या उड्डाणादरम्यान या विमानाने ७५ टक्के पारंपरिक इंधनाचा आणि २५ टक्के जैवइंधनाचा वापर केला. विमान उड्डाणांसाठी बायोइंधनांचा प्रायोगिक तत्त्वावर वापर यापूर्वीही झालेला आहे. २००८ मध्ये व्हर्जिन अटलांटिकच्या विमानाने लंडन ते अ‍ॅमस्टरडॅम असा प्रवास अंशत: जैवइंधनाच्या आधारे केला होता.

क्वान्टास या ऑस्ट्रेलियन विमान कंपनीने या वर्षी लॉस एंजलिस ते मेलबर्न असा १५ तासांचा प्रदीर्घ प्रवास १० टक्के जैवइंधनाच्या जोरावर केला. अलास्का एअरलाइन्स, केएलएम या कंपन्यांनीही असे प्रयोग करून झालेले आहेत. भारतात हा प्रयोग करण्यात डेहराडूनस्थित इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोलियमचे योगदान महत्त्वाचे आहे. स्पाइसजेटच्या उड्डाणासाठी या संस्थेने खास ३३० किलो जैवइंधन बनवले. यासाठी छत्तीसगडमधील शेतकऱ्यांनी खास लागवड केलेल्या जत्रोफा वनस्पतीचा वापर करण्यात आला. अशा प्रकारे ५० टक्क्यांपर्यंत जैवइंधन उड्डाणांमध्ये वापरता येऊ शकते. त्या प्रमाणापलीकडे जैवइंधन वापरल्याने उड्डाणक्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असे विश्लेषकांचे मत आहे. ते ध्यानात घेतल्यास, ‘जैवइंधनामुळे पारंपरिक इंधनावरील अवलंबिता ५० टक्क्यांनी कमी होऊ शकते’ असे स्पाइसजेटचे प्रमुख अजयसिंह म्हणतात, त्याचा खरा अर्थ कळेल.

विमान वाहतूक उद्योगाची सद्य:स्थिती गंभीर आहे. हवाई इंधनाच्या चढय़ा किमती, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घसरत चाललेले मूल्य, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तिकीट दरांमध्ये द्याव्या लागणाऱ्या भरमसाट सवलतींमुळे बहुतेक सर्व विमान कंपन्या तोटय़ात आहेत. एप्रिल-जून या तिमाहीत इंडिगो एअरलाइन्सच्या नफ्यात ९७ टक्के घट झाली. स्पाइसजेटला ३८ कोटी रुपयांचा तर जेट एअरवेजला १३२३ कोटींचा तोटा झालेला आहे.

जेट एअरवेजच्या इंधन खर्चातच तब्बल ३५ टक्के वाढ झालेली आहे. अशा परिस्थितीत जैवइंधनाविषयी आशावाद निर्माण होणे स्वाभाविक आहे. परंतु सध्या तरी मोठय़ा प्रमाणात जैवइंधन निर्माण होऊन त्याचा व्यापारी तत्त्वावर वापर विमान कंपन्यांना करता येईल, अशी परिस्थिती सध्या तरी नाही. एक तर जैवइंधन हे पर्यायी इंधन असले, तरी तो ‘स्वच्छ’ पर्याय ठरेलच याची कोणतीही शाश्वती नाही.

सध्या जैवइंधनाचा सध्याचा एकमेव प्रमुख स्रोत असलेल्या जत्रोफा वनस्पतीवर अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेने (नासा) चार वर्षांपूर्वी केलेल्या संशोधनाअंती आढळले की, या वनस्पतीच्या ज्वलनाने हरितगृह वायू उत्सर्जनाचे (ग्रीनहाऊस गॅस एमिशन) प्रमाण वाढू शकते किंवा घटूही शकते. जैवइंधनाची साठवणूक आणि वाहतूक ही तर स्वतंत्र आव्हाने आहेत. शिवाय व्यापारी तत्त्वावर जैवइंधननिर्मिती करायची झाल्यास जत्रोफाची लागवड मोठय़ा प्रमाणात करावी लागेल. या संभाव्य प्रचंड उत्पादनाचा इतर पिकांवर, जमिनीच्या कसावर, भूजलावर काय परिणाम होईल याविषयी संशोधन झालेले नाही. हे होत नाही तोवर जैवइंधनाला पारंपरिक इंधनाचा पर्याय म्हणून स्वीकारायचे का, या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल.

ncert-declared-the-provisional-result-of-national-talent-search-examination

प्रज्ञा प्रतीक्षा


5396   05-Sep-2018, Wed

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी होणे ही विद्यार्थ्यांसाठी जेवढी अभिमानाची बाब, तेवढीच शिक्षकांसाठीही असायला हवी. तरीही राज्याचा टक्का कमी का होतो आहे?

सरकारी पातळीवर शिक्षणाचे प्रयोजन दुहेरी असायला हवे. सरासरी बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांना किमान शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे आणि जे सरासरीपेक्षा अधिक बुद्धिमान आहेत त्यांच्या प्रतिभेस धुमारे फुटतील असे वातावरण निर्माण करणे. महाराष्ट्र या दोन्हींतही मार खातो. परीक्षेतील गुणांच्या दौलतजाद्यामुळे आपल्याकडे यथातथा बुद्धिमत्तेचे विद्यार्थी आहेत त्यापेक्षा अधिक हुशार भासतात आणि पंचाईत ही की त्यांच्या पालकांनाही ते तसे वाटू लागतात. त्याच वेळी जे खरोखरच हुशार असतात त्यांचे या पद्धतीत सपाटीकरण होत जाते.

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत महाराष्ट्रातील गुणवंतांच्या संख्येत होत असलेली घट हे त्याचे द्योतक. गेले दोन दिवस ‘लोकसत्ता’ने या संदर्भातील विशेष वृत्त प्रकाशित करून राज्यातील बुद्धिवान विद्यार्थ्यांच्या टंचाईकडे लक्ष वेधले. एके काळी महाराष्ट्रातील विद्यार्थी या परीक्षेत घवघवीत यश मिळवत. सध्या यात लक्षणीय घट झाल्याचे दिसते. ही बाब काळजी वाटावी अशी. शिक्षणाचा प्रसार होत असताना प्रज्ञा परीक्षेतील मराठी टक्क्यात घट का होत असावी?

याचे कारण शिक्षकांना अभ्यासक्रमांच्या, तासिकांच्या पाटय़ा टाकायच्या आहेत आणि त्या आपल्या पाल्यांनी आनंदाने वाहाव्यात असेच पालकांना वाटू लागले आहे. राज्याच्या परीक्षा मंडळाने तयार करून दिलेला अभ्यासक्रम शिकवता शिकवता नाकीनऊ येणारे शिक्षक आणि परीक्षेच्या पलीकडे काहीही असत नाही, अशा समजुतीत असलेले पालक हे राज्याच्या शिक्षण क्षेत्रासमोरील सध्याचे मोठे आव्हान आहे. परिणामी ‘आदर्श’(?) पालक आणि शिक्षक होण्याच्या नादात आपले पाल्य आणि विद्यार्थी जगण्यातील गुंतागुंतीला सामोरे जाण्यासाठी सज्ज करण्याचे काम गेल्या काही वर्षांत विसरले जात आहे.

परीक्षा सोपी, उत्तरपत्रिकांची तपासणी सोपी, नापास होण्याचा प्रश्नच नाही अशा वातावरणातून एकदम स्पर्धेच्या जगात उतरल्यावर उडणारी भंबेरी विद्यार्थ्यांना निराशेच्या गत्रेत ढकलणारी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास त्यांना नियमित अभ्यासक्रमांच्या बरोबरीने सोप्यातून अवघडाकडे घेऊन जाणारा हवा. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी तो आवश्यक असतो. याचाच विसर आपणास पडला असून त्यामुळे राज्य शिक्षण क्षेत्रातील पीछेहाट अनुभवत आहे. हे गंभीर आहेच. परंतु शिक्षक आणि पालक यांना मात्र त्याचे सोयरसुतकही नाही ही बाब अधिक गंभीर आहे.

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा सक्तीची नसते. ती शालेय अभ्यासक्रमाच्या बरोबरीने द्यावी लागते. पंचवीस वर्षांपूर्वी या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अठरा हजारांच्या घरात होती. पण त्या वेळेस राष्ट्रीय पातळीवर निवड होणाऱ्यांची संख्या चारशेपर्यंत असे. गेली काही वर्षे परीक्षेस सामोरे जाणारे विद्यार्थी सत्तर हजार आणि निवड होणारे चारशे. आता तर ही शिष्यवृत्ती मिळवणाऱ्यांची संख्या शंभराच्या आतच असते. म्हणजेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या वाढली, पण गुणवत्ता मात्र घसरली. ही शिष्यवृत्ती मिळवण्यात एक अभिमान असतो. असे विद्यार्थी केवळ परीक्षार्थी न होता उत्तरायुष्यात विज्ञान, गणित आदींत काही मूलभूत कामे करतील अशी शक्यता निर्माण होते. तसेच राष्ट्रीय पातळीवर काही यश संपादन करण्याने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढीला लागतो. परंतु राज्यातील शिक्षण खात्याला असे काही घडावे, असे वाटत नसावे. तेथे असलेली अनागोंदी आणि कंटाळलेपण याचा परिणाम राज्यातील एकूणच शिक्षण व्यवस्थेवर किती विपरीतपणे होतो आहे, याचे प्रज्ञाशोध परीक्षा हे एक अगदी छोटेसे उदाहरण आहे.

स्पर्धा परीक्षेत मुलामुलींचे यश राज्याचा दर्जा ठरवत असते. देशातील अन्य राज्ये अशा अभ्यासक्रमेतर परीक्षांसाठी किती काळजीपूर्वक तयारी करतात हे पाहिले, तर महाराष्ट्रातील त्याबाबतची उदासीनता अधिकच उठून दिसते. अशा वातावरणात काहींत अशी परीक्षा देण्याची उमेद शिल्लक राहिलीच तर तीदेखील मारून टाकण्याचे काम व्यवस्थेकडून होते. ही परीक्षा कशी देतात, तयारी कशी करावी, तीत गुणांकन कसे होते वगैरे काहीही माहिती विद्यार्थ्यांना सहज मिळत नाही. त्यासाठी शिक्षकांमध्ये उत्साह असावा लागतो.

विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन मिळण्यासाठी सरकार विशेष शिबिरांचे आयोजन करते खरे, मात्र त्याचा निधी अतिशय तुटपुंजा. प्रत्येक पातळीवर निधीची कमतरता हे सरकारी पालुपद याही परीक्षेच्या माथी चिकटल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड होतो आणि या वाटेला जाण्याचे टाळले जाते. राज्याच्या अभिमानासाठी देशातील छोटी राज्येही किती तरी प्रयत्नशील असतात.

महाराष्ट्रात मात्र त्याबाबत कमालीची मरगळ आहे. प्रज्ञाशोध परीक्षेतील महाराष्ट्राचे यश मंदावत असताना त्यात काही सुधारणा करण्याचीही आवश्यकता शिक्षण खात्याला वाटत नाही. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमापलीकडे काही शिकवायचे म्हटले, की शिक्षकांच्या अंगावर काटा येतो. वस्तुत: प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी होणे ही विद्यार्थ्यांसाठी जेवढी अभिमानाची बाब, तेवढीच शिक्षकांसाठीही असायला हवी. अशा एखाद्या गुणवंताला अशी शिष्यवृत्ती त्याच्या पीएच.डी.च्या पदवीपर्यंत मिळत राहते, याचे भान ठेवून शिक्षकांनी आपला उत्साह वाढवणे आवश्यक असते. मात्र केवळ शासकीय परिपत्रकांची वाट पाहात राहण्याने ना विद्यार्थ्यांचे भले होते ना शिक्षकांचे.

स्पर्धा परीक्षांचे महत्त्व शिक्षण खात्याला ओळखता आलेले नाही. राज्यातील हुशार मुलांना ‘सब घोडे बारा टके’ या न्यायाने वागवण्याचे दुष्परिणाम आत्ताच दिसू लागले आहेत. केंद्रीय पातळीवर होणाऱ्या अशा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्राचा टक्का सातत्याने घसरतो आहे. याचे कारण विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेचा अभाव हे नाही. योग्य अशा शैक्षणिक वातावरणाची वानवा हे त्याचे खरे कारण आहे.

शिक्षणाचा बाजार होत असताना, गुणवत्तेकडे दुर्लक्ष झाले, तर त्याचा फटका विद्यार्थ्यांच्या भविष्यास बसतो आणि त्यांच्यामध्ये निराशेचे मळभ दाटून येते. हे टाळायचे, तर शिक्षण खात्यानेही चाकोरी सोडून नव्या दमाने नवनवे उपक्रम राबवायला हवेत. त्यासाठी त्या खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांत विश्वास निर्माण व्हायला हवा. वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, जयंत्या-मयंत्या अशा ठरावीक कार्यक्रमांच्या पलीकडे जाण्याची गरज ना शिक्षकांना वाटते ना शिक्षण खात्यास. त्यामुळे शिक्षणाच्या दर्जा खालावतो. पण हे समजून घेण्याएवढी गुणवत्ता अजून या खात्यातच आलेली नाही.

परीक्षा मंडळाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा सरकारी ध्यास शिक्षणाचे सपाटीकरण करू लागला आहे. अशा सरधोपट मार्गामुळे विद्यार्थ्यांतील बौद्धिक क्षमतांचा विकास खुंटतो. गुणात्मक वाढ या शब्दाचा शब्दश: अर्थ घेणाऱ्या सरकारी बाबूंना विद्यार्थ्यांच्या आकांक्षांना फुटणारे धुमारे दिसत नाहीत आणि त्या आकांक्षांच्या पंखात बळ निर्माण करण्याची आवश्यकताही वाटत नाही. त्यामुळे सोप्यातून अधिक सोप्याकडे होत असलेला राज्यातील शिक्षणाचा प्रवास काळजी वाढवणारा आहे.

एके काळी या राज्याने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तंत्रज्ञ शंकर आबाजी भिसे, गणिती केरूनाना छत्रे, धुंडिराज ऊर्फ दादासाहेब फाळके, भौतिकशास्त्रज्ञ श्रीधर सर्वोत्तम जोशी, रसायन शास्त्रज्ञ नरसिंह नारायण गोडबोले, वनस्पती शास्त्रज्ञ शंकर पांडुरंग आघारकर आदी वैज्ञानिक दिले. अलीकडच्या काळात मूलभूत विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात जयंत नारळीकर वा गणिती नरेंद्र करमरकर आदी मोजकीच मराठी नावे दिसतात. भीती ही की ही सर्व वा यातील काही नावे मराठी शिक्षकांनाही माहीत नसतील. तेव्हा विद्यार्थ्यांचा प्रश्नच नाही.

शिक्षणाच्या सपाटीकरणामुळे एक तर मराठीत कोणालाही शास्त्रज्ञ गणले जाते आणि खऱ्या शास्त्रसंशोधन आदींकडे आपले लक्षच जात नाही. प्रज्ञाशोध परीक्षेचे सध्याचे वास्तव हा धोक्याचा इशारा आहे. त्यावर वेळीच उपाय केला नाही तर महाराष्ट्र फक्त सुशिक्षित कामगारनिर्मितीचा कारखाना ठरेल. त्यांची कमतरता नाही. या राज्यास प्रतीक्षा आणि गरजही आहे ती खऱ्या प्रज्ञेची.

collective-farming-experiment-in-goa

आमची जमीन, आमका जाय


5476   05-Sep-2018, Wed

सामूहिक शेतीचा गोव्यातील प्रयोग जर यशस्वी झाला आणि गोवा राज्यभर तो राबवण्याचा विचार सरकारने पुढे नेला, तर तो इतरांसाठीही वस्तुपाठ ठरेल..

शहरांचे आक्रमण ही आपल्याकडील खेडय़ांची मुख्य समस्या. हे आक्रमण अनेक प्रकारचे असते. माणसे, सीमा, जगण्याच्या सवयी आणि मुळात काही शे जणांसाठी असलेल्या जागेत काही हजारांची करावी लागणारी सोय. त्यास पर्याय नसतो. यातून एक प्रकारचा बकालपणा पसरतो. येणारे माणसांचे लोंढे सामावून घेण्यासाठी मग या खेडय़ांना आपली कवाडे उघडावी लागतात. परिणाम असा की खेडय़ांचे खेडेपण हरवले जाते आणि तरीही अशा चेहरा हरवलेल्या खेडय़ांना शहरांची ओळख मिळत नाही. अशी उसवलेली खेडी आणि विस्कटलेली शहरे आपल्या आसपास नजर फिरवू तेथे दिसतात. कोणतेही सरकार असो. यात बदल होत नाही. योजनांची नावे तेवढी बदलतात. जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान जाऊन स्मार्ट सिटी योजना येते इतकेच. परंतु जमिनीवरील स्थितीत यित्कचितही बदल होत नाही. खेडय़ांचे विद्रूपीकरण आणि शहरांचे विकृतीकरण यांच्या बरोबरीने यात आणखी एका घटकाची अपरिमित हानी होते. तो म्हणजे शेतजमीन. गेल्या काही वर्षांत या शेतजमिनीचे रूपांतर बिगर शेतजमिनीत करण्याची स्पर्धाच सुरू असून त्यामागे अनियंत्रित नागरीकरण हे एक कारण आहे. या संदर्भात गोवा या सुंदर चिमुकल्या शहराने घालून दिलेला धडा महत्त्वाचा तसेच अनुकरणीय ठरतो.

महाराष्ट्राच्या तुलनेत गोव्यातील अनेक खेडय़ांना आणखी एक मोठा धोका आहे, तो स्थलांतरितांचा. गोव्यात येणारे स्थलांतरित हे रोजगारासाठी मुंबई वा अन्य महानगरांत येणाऱ्यांपेक्षा वेगळे असतात. रोजगाराची त्यांना ददात नसते. कारण ते तसे धनाढय़ असतात आणि हातातील संपत्तीचा गुणाकार करण्याची संधी शोधत असतात. गोव्यात ही संधी मुबलक आहे. ती आहे तेथील जमिनीत. परिणामी हे स्थलांतरित गोव्यात बुभुक्षितासारखे जमिनी खरेदी करू लागले आहेत. पणजी ते म्हापसा या टप्प्याचे जे काही झाले आहे त्यावरून हे दिसेल. कलंगुट, बागा, हणजुणे अथवा कोलवा आदी समुद्रकिनारी प्रदेशांचेही रूपडे नको तितके बदलले आहे. परिणामी गोव्याची हिरवाई झपाटय़ाने नष्ट होऊ लागली असून तीस विद्यमान मनोहर पर्रिकर सरकारने आपल्या धोरणांनी हातभारच लावलेला आहे. हे असे होते कारण स्थलांतरित पशाच्या थल्या घेऊन गोव्यात येतात आणि त्या रिकाम्या करून जमेल तितक्या जमिनी ताब्यात घेतात. अन्य शहरांच्या तुलनेत गोव्यात जमिनींचे भाव अजूनही कमी आहेत. त्याचाही फायदा या धनदांडग्यांना होतो. त्यात दुसरा घटक म्हणजे गोव्यातील जमिनीचा पोत. गोव्यातील शेतजमिनीत प्राधान्याने भातच पिकते आणि अन्यत्र मोठय़ा प्रमाणावर काजू. यापैकी काजूस तितकी काही मशागतीची गरज नसते. तो गावागावांमधल्या भरताड जमिनींवरही जोमाने वाढतो. प्रश्न असतो तो भाताचा.

कारण या भातातून येणारे उत्पन्न फार काही प्रचंड असते असे नव्हे. या शेतांतून शेतमालकासाठी साधारण वर्षभराची बेगमी होते. म्हणजे हे तांदूळ विकून शेतकऱ्यांना मोठी कमाई असते असे नाही. परिणामी बरेच शेतकरी आपापल्या वर्षभराच्या गरजा भागतील इतका भात पिकवतात. याचाच अर्थ ही भातशेती आर्थिकदृष्टय़ा तितकी काही आकर्षक नाही. हे वास्तव. त्यामुळे गोव्यात गेली कित्येक वर्षे शेतजमिनींचे रूपांतर बिगर शेतजमिनीत करण्याचा वेग भयावह आहे. गोवा मंत्रिमंडळाच्या जवळपास प्रत्येक बठकीत या जमिनी रूपांतरणाचे प्रस्ताव चच्रेला येत असतात आणि मुख्यमंत्री ते नाकारतात असे नाही. या अशा प्रस्तावांमागे बऱ्याचदा परराज्यातील भूमाफियाच असतात. स्थानिकांना हाताशी धरून ही मंडळी जमिनी बळकावतात आणि यथावकाश तेथे गृहनिर्माण संकुल वा मॉल, तारांकित हॉटेल आदी उभारले जाते. ही शेतजमीन विकण्याकडे स्थानिकांचाही कल असतो. कारण तसेही या शेतजमिनीतून फार काही उत्पन्न हाताला लागते असे नव्हे. या जमिनी कसून जेमतेम चार घासच मिळणार असतील तर आल्या किमतीला त्या विकून पसा कमावणे बरे, असाच विचार शेतकरी करतात. परिणामी गोव्यातील शेतजमिनी मोठय़ा प्रमाणावर घटू लागल्या आहेत. अशा वेळी हे टाळण्यासाठी गोव्याने काय केले हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो.

सेंट इस्तेव या खेडय़ाने ते दाखवून दिले. या गावच्या स्थानिक धर्मगुरूंनी गावातील सर्व रहिवाशांना एकत्र आणण्यात पुढाकार घेतला आणि परिसरातील शेतीयोग्य जमीन सर्वानी एकत्र कसण्याची कल्पना मांडली. गोवा कृषी संचालनालयातील अधिकारी संजीव मयेकर यांनी या प्रयोगासाठी सातत्याने प्रयोग केले. ती लगेच स्वीकारली गेली नाही. याचे कारण गोव्यात साधारण घरटी एक माणूस हा परदेशात नोकरीस असतो आणि जमीन मालकीची कागदपत्रेही सुविहित अवस्थेत नाहीत. परदेशात नोकरीस गेलेल्यास याची फिकीर नसते. त्यामुळे या प्रयोगात पहिली अडचण आली ती जमीन मालकी निश्चित करण्याची. स्थानिक चर्चने आणि धर्मगुरूने गावातील तरुणांना एकत्र करून, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मूळ जमीन मालकी निश्चित करण्याच्या, त्या संदर्भातील सातबारा उतारे हुडकून काढण्याच्या कामात स्वत:ला झोकून दिले. संबंधित सरकारी यंत्रणांनीही मदत केली. ही मालकी निश्चित झाल्यावर सर्व जमीनमालकांची बैठक घेतली गेली. तीत चच्रेस ठेवला गेला एकच मुद्दा. ही सर्व जमीन तुमची इच्छा असो वा नसो योग्य/अयोग्य मार्गानी बळकावली जाणार असून तसे होऊ नये म्हणून तुमची एकत्र यायची इच्छा आहे काय? याचे उत्तर नकारार्थी असणे शक्यच नव्हते. आपली जमीन धनदांडग्यांच्या हाती जाण्यापासून वाचण्याची शक्यता दिसू लागल्यावर समस्त ग्रामस्थ एकत्र आले आणि त्यातून एक नवाच पर्याय समोर उभा राहिला.

सामुदायिक शेतीचा. एकटय़ादुकटय़ाने आहे त्या जमिनीतील तुकडय़ात शेती करणे किफायतशीर नाही. कारण दरडोई जमीन मालकी अगदीच कमी आहे. अशा वेळी नुकसानीत शेती करण्यापेक्षा ती न करण्याकडेच सगळ्यांचा कल असतो आणि अशा वेळी जमीनमालक शेतजमीन विकण्यास तयार होतो. सेंट इस्तेवच्या गावकऱ्यांना तेच टाळायचे होते. म्हणून सामुदायिक शेतीचा पर्याय समोर आला. तो स्वीकारार्ह आहे असे दिसल्यावर राज्य सरकारच्या कृषी खात्यानेही एक पाऊल पुढे येऊन या ग्रामस्थांसाठी भाताचे एक नवे वाण उपलब्ध करून दिले. ते लवकर होते आणि त्याची निगाही कमी घ्यावी लागते. इतकेच नव्हे तर कृषी खात्याने या गावाच्या जवळ स्वतंत्र रोप वितरण केंद्रदेखील सुरू केले आणि या लागवडीनंतर त्याची देखरेखदेखील कृषी खात्याकडून केली जाते. यावर, यात सरकारला पडायचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

ते असे की हा प्रयोग जर यशस्वी झाला तर संपूर्ण गोवा राज्यभर तो राबवण्याचा सरकारचा विचार आहे. गोव्यातील भात उत्पादन गेली काही वर्षे सातत्याने कमी होत असून त्यावर आणि परप्रांतीयांनी जमिनी बळकावण्यावर यातून उत्तर सापडू शकते, असे गोवा सरकारला वाटते. या प्रयोगाची दखल आपणही यासाठीच घ्यायची. महाराष्ट्रातही असे जमीन बळकाव उद्योग सुरू असून दरडोई शेतजमिनाचा आकार सरासरी लहान असल्याने ते रोखणे अवघड जाते. त्यावर गोव्याने दिलेला पर्याय निश्चितच स्वीकारार्ह ठरतो. एके काळी  ‘आमचे गोंय आमका जाय’  ही घोषणा गाजली. आता तिचे रूपांतर  ‘आमची जमीन, आमका जाय’ (आमची जमीन आम्हाला हवी) असे झाले आहे. आपणही ही घोषणा देण्यास हरकत नाही.

booming-sale-of-cars-bikes-hit-public-transport-system

लाख दुखों की एक दवा..


6126   05-Sep-2018, Wed

कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोणत्याही शहराच्या विकासाला फार मोठा हातभार लावत असते; परंतु त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्याने अनेक प्रश्न उभे राहतात. भारतातील सगळ्या मोठय़ा शहरांची ही व्यथा आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम आणि कार्यक्षम असेल, तर कुणीही आपला जीव धोक्यात घालून स्वत:च्या वाहनाने प्रवास करण्याचे धैर्य दाखवणार नाही; परंतु गेल्या २५ वर्षांत देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बसच्या फे ऱ्यांमध्ये प्रचंड घट झालेली दिसते.

१९९४ मध्ये देशातील या व्यवस्थेत प्रवासी वाहतूक करणाऱ्या फे ऱ्या ६० ते ८० टक्के एवढय़ा होत्या. त्या आता २५ ते ३५ टक्क्यांपर्यंत कमी झाल्या आहेत. याचा अर्थ शहरांत खासगी वाहनांचा वापर प्रचंड वाढला आहे. गेल्या चार वर्षांत खासगी दुचाकी वाहनांची टक्केवारी १४ टक्क्यांवरून १८.५ टक्क्यांवर गेली आहे. याच चार वर्षांत देशभर सार्वजनिक वाहतुकीच्या बसगाडय़ांचे प्रमाण मात्र ०.२ टक्के एवढेच राहिले. रस्त्यांवर प्रचंड वाहने येणे, हे वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण असते. या कोंडीमुळे रस्त्यांची अवस्था जेवढी बिकट होते, त्याहूनही अधिक प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो.

गेल्या काही दशकांपासून रस्त्यांचे रुंदीकरण जवळपास ठप्प झाल्यासारखे आहे. रुंदीकरणाला पर्याय म्हणून जागोजागी उड्डाणपूल बांधण्याचा सपाटा गेल्या काही वर्षांत सुरू झाला. तरीही त्याने प्रश्न सुटला नाहीच. उलट अधिक जटिल झाला. खासगी वाहननिर्मिती उद्योगाला या काळात प्रचंड चालना मिळाली हे खरे असले, तरीही त्यामुळे कोणत्याही शहराचे अधिक भले झाले नाही. सरकारी धोरणांमधील गोंधळ या सगळ्यास कारणीभूत आहे.

बहुतेक ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही फायद्यातील व्यवस्था असत नाही. त्यासाठी अन्य व्यवस्थांचा पाठिंबा आवश्यक असतो. प्रत्यक्षात सगळ्याच शहरांमध्ये या व्यवस्था खड्डय़ात कशा राहतील, याकडेच राज्यकर्त्यांनी लक्ष दिल्याने, त्यांची धन झाली; पण शहरांमधील बकालपणात कमालीची भर पडली.

खासगी वाहन खरेदीला प्रोत्साहन देणाऱ्या बँकांच्या योजना आणि त्याच्याशी जोडलेला प्रतिष्ठेचा मुद्दा यामुळे वाहनांच्या संख्येत मोठीच भर पडली. पुण्यासारख्या शहरात दरडोई दीड वाहन आहे. चंदिगढमध्ये हे प्रमाण अधिक आहे. एके काळी कार्यक्षमतेसाठी प्रसिद्ध असलेली मुंबईची बेस्ट बससेवा आता अतिशय हलाखीच्या स्थितीत आहे, याचे कारण राज्यकर्ते येथे गांभीर्याने पाहातच नाहीत.

छोटय़ा शहरांमध्ये तर अशी व्यवस्था मोडकळीस आलेली आहे. अधिक वाहने म्हणजे इंधनाचा अधिक वापर, परिणामी परकीय चलनावर ताण, हे सूत्र न कळण्याएवढे राज्यकर्ते अजाण नाहीत. मात्र खासगी वाहनांना प्रोत्साहन देऊन सार्वजनिक व्यवस्था मोडकळीस आणण्यास तेच जबाबदार आहेत. अनेक प्रगत देशांमध्ये, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा विकासाचा कणा मानला जातो. तेथे खासगी वाहनांवर मोठय़ा प्रमाणात करांचा बोजा टाकला जातो. वाहनतळांमध्येही जास्त शुल्क आकारले जाते.

खासगी वाहने कमी व्हावीत, यासाठी अशा धोरणांची भारतात अधिक आवश्यकता आहे. गेल्या चार वर्षांत दुचाकी व चारचाकी वाहनांच्या संख्येत आठ ते दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे एका पाहणीत आढळले. हे चित्र भयावह आहे. वाहतूक कोंडी, इंधनाचा अतिरेकी वापर, वाहनतळांच्या अभावाने रस्त्यांवर स्थायी राहणारी वाहने, प्रदूषण या सगळ्या प्रश्नांवर एकच उत्तर असू शकते. ‘लाख दुखों की एक दवा’ असलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अधिक लक्ष केंद्रित केले गेले नाही, तर देशातील शहरांची अवस्था अतिशय हलाखीची होईल.


Top

Whoops, looks like something went wrong.