dr.kusala rajendran

डॉ. कुसला राजेंद्रन


6360   17-Jul-2018, Tue

सुमारे ४० वर्षांपूर्वी १९७९ मध्ये एका महिलेने विज्ञानातील अगदीच वेगळ्या क्षेत्रात मुशाफिरी करण्याचे धाडस केले, आज त्या नामांकित भूभौतिकशास्त्रज्ञ (जिओफिजिसिस्ट) आहेत. त्यांना नुकताच पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा पहिला महिला वैज्ञानिक पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे नाव आहे डॉ. कुसला राजेंद्रन.

महासागर विज्ञान, वातावरण तंत्रज्ञानातील कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. त्या बेंगळूरुच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या संस्थेत प्राध्यापक आहेत. १९७९ मध्ये त्यांनी उपयोजित भूभौतिकशास्त्रात रुरकी विद्यापीठातून एम-टेक केले. रसायनशास्त्रातील पदवी असूनही त्या रुरकी येथे शिकायला गेल्या कारण तिथे त्यांची बहीण काम करीत होती. तिथे त्या रसायनशास्त्र शिकण्याच्या उद्देशाने गेल्या असताना त्यांनी प्रत्यक्षात भूभौतिकीची वाट निवडली. त्या वेळी भूकंपशास्त्र हा विषय महिलांसाठी वेगळाच होता, पण त्यांनी त्यात काम करण्याचे ठरवले. १९८१ मध्ये सेंटर फॉर अर्थ सायन्स स्टडीज या संस्थेत त्यांनी काम सुरू केले. नंतर अमेरिकेत जाऊन युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅरोलिना विद्यापीठातून पीएचडी केली. देशप्रेमापोटी भारतात परतून येथील भूकंपाचा त्यांनी सखोल अभ्यास केला. किल्लारी (१९९३) व भूज(२००१) भूकंपांच्या अभ्यासाआधारे त्यांनी काही पुस्तकेही लिहिली. २००७ मध्ये डॉ. राजेंद्रन या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेसमध्ये सुरू झालेल्या सेंटर फॉर अर्थ सायन्सेसमध्ये रुजू झाल्या.

भूकंपाचा अभ्यास करण्यासाठी भूगर्भशास्त्राचा अभ्यास आवश्यक असतो. कुसला या त्यांच्या पतीसमवेत याच क्षेत्रात काम करीत आहेत. वादळांचा अभ्यास करून अंदाज वर्तवता येतो तसा भूकंपाचा अंदाज वर्तवता येत नाही. यात केवळ आधीच्या भूकंपांचा अभ्यास करून काही प्रारूपे तयार करून सूचना देता येतात, पण त्यातही फार काही सांगता येत नाही त्यामुळे हे शास्त्र अवघड आहे असे त्यांचे मत आहे. कुसला व त्यांचे पती सीपी राजेंद्रन (भूभौतिकशास्त्रज्ञ) यांनी तमिळनाडूतील कावेरीपट्टिनम येथील २००४ च्या सुनामीचा अभ्यास केला. तेथे पूर्वी, चोल राजांच्या काळातही असे घडल्याचा अंदाज त्यांनी मणीमेखलाई या खंडकाव्यातून बांधला. राजेंद्रन यांनी तेथील वाळूच्या थरांचा अभ्यास केला असता तेथे खरोखर एक हजार वर्षांपूर्वी सुनामी आली होती हे सिद्ध झाले. गुजरात, महाराष्ट्र व हिमालयातील भूकंपाचा मोठा अभ्यास त्यांनी केला असून किमान ४० शोधनिबंध सादर केले आहेत.

angelique karber

अँजेलिक कर्बर


10283   17-Jul-2018, Tue

जर्मनीची अँजेलिक कर्बर ही जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान आहे. त्याला साजेशी कामगिरी करताना प्रथमच टेनिस क्रीडा प्रकारातील प्रतिष्ठेच्या विम्बल्डन विजेतेपदाचा मान मिळवला आहे. मागील वर्षी कन्यारत्न झाल्यामुळे विम्बल्डन स्पर्धेतून माघार घेणाऱ्या सेरेना विल्यम्सला यंदा सर्वाधिक २४ ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवणाऱ्या मार्गारेट कोर्ट यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी होती. मात्र तिचे हे स्वप्न कारकीर्दीत फक्त दुसऱ्यांदा विम्बल्डनचा अंतिम सामना खेळणाऱ्या कर्बरने उद्ध्वस्त केले.

विशेष म्हणजे ३० वर्षीय कर्बरला २०१६च्या विम्बल्डनमध्ये सेरेनाकडूनच अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी व्यावसायिक टेनिसपटू म्हणून कर्बरने कारकीर्द घडवण्यास सुरुवात केली. फुटबॉल आवडणाऱ्या कर्बरला पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळण्याची संधी २००७ मध्ये मिळाली. मात्र, पहिल्याच फेरीत तिला गाशा गुंडाळावा लागला. मग ग्रँडस्लॅम स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी कर्बरला तब्बल चार वर्षे वाट पाहावी लागली. २०१०च्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत तिने मॅरेट अनेला पराभूत करून पहिला विजय मिळवला. त्यानंतर तिच्या कारकीर्दीने उंच भरारी घेतली. २०११च्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत तिने मजल मारली.  २०१२ मध्ये कर्बरने पहिल्यांदाच विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली. मात्र व्हिक्टोरिया अझारेंकाने तिला पराभूत केले.

२०१३ मध्ये कर्बरने एटीपी वर्ल्ड टूर, इस्टोरील व कतार खुली टेनिस स्पर्धा जिंकून सर्वानाच धक्का दिला. महिला एकेरीशिवाय दुहेरीतही तिने उल्लेखनीय कामगिरी केली. २०१६ हे वर्ष कर्बरनेच गाजवले. कारकीर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरून तिने एकाच वर्षी ऑस्ट्रेलियन व अमेरिकन अशा दोन्ही स्पर्धाचे विजेतेपद पटकावले. त्याच वर्षी कर्बरने जागतिक क्रमवारीत अव्वल १० महिलांमध्येही स्थान मिळवले. रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीत रौप्यपदक पटकावणारी ती जर्मनीची पहिली टेनिसपटू ठरली. 

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत तिचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले असले तरी विम्बल्डनचे जेतेपद पटकावून तिने ऐतिहासिक कामगिरी तर केलीच, शिवाय महिलांमध्ये वर्षांनुवर्षे सुरू असलेली विल्यम्स भगिनींची विजयी परंपराही तिने खंडित केली. कारकीर्दीत तिने चारपैकी तीन (ऑस्ट्रेलियन, अमेरिकन, विम्बल्डन) महत्त्वाची ग्रँडस्लॅम जेतेपदे एकदा मिळवली असून फक्त फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेने तिला हुलकावणी दिली आहे. मात्र या विजयामुळे टेनिसजगताला येणाऱ्या काळात कर्बरपर्व सुरू राहील, अशी आशा निर्माण झाली आहे.

v l dharurkar

वि. ल. धारुरकर


3935   14-Jul-2018, Sat

पुरातत्त्व विद्या आणि पत्रकारिता याचे मिश्रण ज्या व्यक्तिमत्त्वात सामावले आहे, ते नाव म्हणजे डॉ. वि. ल. धारुरकर. त्रिपुरा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी त्यांची झालेली निवड मराठवाडय़ासाठी भूषणावह. बातमी लिहिण्यापासून ते इतिहासातील अनेक पुरावे शोधून त्यावर संशोधन करणाऱ्या धारुरकरांनी मराठवाडय़ातील पत्रकारांना इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली.

उस्मानाबाद जिल्ह्य़ातील उमरगा हे मूळ गाव असणाऱ्या धारुरकरांनी शालेय शिक्षणात कधीही पहिला क्रमांक सोडला नाही. बी.ए.च्या दुसऱ्या वर्षांत शिकताना त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. पदवी परीक्षेत पहिला क्रमांक मिळविल्यानंतर रात्रपाळीचे उपसंपादक म्हणून त्यांनी दैनिकात काम केले.

मजकुराचे भाषांतर करत वृत्तपत्रात अनेक वर्षे काम करणाऱ्या धारुरकर यांना इतिहासाची आवड काही स्वस्थ बसू देईना. इतिहासाच्या पुरातत्त्व शाखेत प्रावीण्य मिळवत त्यांनी वेरुळ लेण्यातील जैन शिल्पांचा अभ्यास केला. याच विषयात त्यांची पीएच.डी.देखील आहे. सर्वसाधारणपणे प्रबंध लिहिले की प्राध्यापक मंडळी ते विसरून जातात. मात्र आजही धारुरकरांना त्यांच्या प्रबंधातील ओळीच्या ओळी पाठ आहेत.

१९७५ मध्ये नाशिक महाविद्यालयात इतिहास विषय शिकविणाऱ्या ‘वि. लं.’ची कुसुमाग्रजांशी भेट होत असे. तसेच वसंत कानेटकर यांनाही नाटक लिहिण्यासाठी लागणारे ऐतिहासिक संदर्भही वि.लं.नी शोधून दिले होते. ‘सिंधू संस्कृतीतील कलेचा उत्कट आविष्कार’ या विषयीही त्यांनी संशोधन केले. याच संशोधनासाठी गावोगावी फिरताना त्यांनी अहिराणी भाषा शिकून घेतली.  नाशिक जिल्ह्य़ात एक वर्ष, तुळजापूर येथे एक वर्ष नोकरी करण्यापूर्वी त्यांनी पुरातत्त्व विभागातही काम केले होते. 

इतिहासाच्या प्रांतात रमणारा हा माणूस तसा मूळ पत्रकार. त्यामुळे या क्षेत्रात त्यांनी मोठी कामगिरी केली. पत्रकारितेवरील त्यांची वेगवेगळी ३६  पुस्तके प्रकाशित आहेत. ‘सावरकरांची पत्रकारिता’ हे त्यांचे पुस्तकही बरेच गाजले. विचारांशी बांधिलकी जपत इतिहास आणि वर्तमानाचा दुवा म्हणून त्यांनी केलेले काम लक्षणीय मानले जाते.

शिवाजी विद्यापीठात असताना  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येऊन शिकवावे, अशी त्यांना विनंती करण्यात आली. सोलापूरचे ज्येष्ठ संपादक रंगाअण्णा वैद्य यांच्या पारखी नजरेतून त्यांची पत्रकारिता बहरली. इतिहास आणि वर्तमान याचा साकव बनत धारुरकर यांनी विविध विषयांवर संशोधनपर लेख लिहिले. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास या सर्व विषयांचा आवाका असणाऱ्या धारुरकर यांनी वेगवेगळ्या देशांत त्यांची संशोधने सादर केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १९८३ ते २०१६ पर्यंत पत्रकारितेतील विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. याच विद्यापीठात ‘लिबरल आर्ट्स’ या विषयाचा अभ्यासक्रम आखण्यात त्यांचे मोठे योगदान होते. इतिहास आणि पत्रकारिता अध्यापनातून वर्तमानाशी सांगड घालणाऱ्या धारुरकर यांची त्रिपुरा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी झालेली निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

brian gitta

ब्रायन गिट्टा


9208   12-Jul-2018, Thu

ब्रायनला सतत ताप येत होता, पण रोगाचे निदान होत नव्हते. गरज ही शोधाची जननी असते असे म्हणतात. त्यातूनच मग तो व त्याच्या मित्रांनी वैद्यकशास्त्राची पुस्तके तर धुंडाळली, शिवाय तो संगणक अभियंता असल्याने त्याला तंत्रज्ञानाची बाराखडी चांगली अवगत होती. त्यातूनच त्याने एक उपकरण शोधून काढले, त्याने या उपकरणाने रक्ताची चाचणी केल्यानंतर तो मलेरिया असल्याचे निष्पन्न झाले. ब्रायन गिट्टा हा २४ वर्षांचा युगांडाचा संशोधक आहे. त्याने रक्ताची चाचणी करण्यासाठी जे उपकरण शोधले आहे त्याला आफ्रि केचा अभियांत्रिकी नवप्रवर्तनाचा पुरस्कार मिळाला आहे.  या उपकरणाचे नाव ‘माटिबाबू’. त्याचा स्वाहिली भाषेतील अर्थ ट्रीटमेंट म्हणजे उपचार.

ब्रिटनच्या रॉयल अकॅडमी फॉर इंजिनीअरिंगचा हा पुरस्कार असून तो तंत्रज्ञानाचा मानवी विकासासाठी वापर करण्यासाठी दिला जातो. ब्रायन हा पुरस्कार मिळवणारा सर्वात तरुण संशोधक. रक्त न काढता मलेरियाची चाचणी करण्याचे उपकरण त्याने शोधले आहे. मलेरिया म्हणजे हिवताप हा युगांडात जास्त आढळणारा रोग आहे.  ब्रायनने शोधलेले उपकरण कु णीही वापरू शकेल असे व किफायतशीर आहे. हे उपकरण रुग्णाच्या बोटांना लावले जाते, ते वापरण्यासाठी कु णा तज्ज्ञाची गरज लागत नाही. या उपकरणातून लाल रंगाचा किरण रुग्णाच्या बोटावर टाकला जातो. त्यात लाल रक्तपेशी दिसत असतात. त्यामुळे योग्य तो संदेश स्मार्टफोनला पाठवला जातो. त्यातून रोगनिदान केले जाते. एरवी मलेरियाचे निदान करण्यासाठी रक्ताच्या चार चाचण्या केल्या जातात, यात केवळ एका चाचणीत काम भागते.  गिट्टा व त्याचे सहकारी हे कंपालातील माकेरे विद्यापीठाचे विद्यार्थी. एखादी समस्या हीच प्रेरणा समजण्याचा धडा त्यांनी विद्यार्थी म्हणून घेतला होता. त्यातूनच त्यांनी माटिबाबूचा शोध लावला. यात रक्तपेशींचा रंग, आकार व संहती लगेच कळते. रोगनिदानाचा निष्कर्ष तुमच्या स्मार्टफोनवर येतो. या शोधात ८० टक्के अचूक निष्कर्ष मिळतात. नंतर ते प्रमाण ९० टक्क्यांवर जाणार आहे. अभियांत्रिकीच्या माध्यमातून वैद्यकातील प्रश्न सोडवताना मानवी विकासाला स्पर्श करणारे हे संशोधन मानवतेसाठी वरदान आहे. हे उपकरण बाजारात येईल तेव्हा त्याची किंमत १०० डॉलर्सच्या आसपास राहील, शिवाय हे उपकरण पुन्हा वापरता येणारे आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कंपन्यांकडून त्याच्याकडे प्रस्ताव आले. त्यामुळे पुरस्काराचा आनंद त्याला साजरा करता आला नाही, पण या शोधातून ठोस असे काही तरी बाहेर पडावे व कुणी तरी त्याचे व्यावसायिक उत्पादन करावे अशी ब्रायनची इच्छा आहे. एकूणच त्याचा हा शोध आफ्रिकेतील मागास देश व विकसनशील देशांसाठी वरदान ठरणार आहे.

 amritlal begal writer

अमृतलाल वेगड


6113   11-Jul-2018, Wed

‘अमृतस्य नर्मदा’, ‘तीरे-तीरे नर्मदा’, ‘नर्मदा तुम कितनी सुंदर हो’ तसेच ‘सौंदर्य की नदी नर्मदा’ ही त्यांची चार पुस्तके, एकाच नदीबद्दल आहेत. या नर्मदेची परिक्रमा त्यांनी दोनदा केली : पहिली वयाच्या पन्नासाव्या वर्षी, तर दुसरी पंचाहत्तरी गाठल्यावर! याखेरीज अन्य पुस्तकेही त्यांनी लिहिली, चित्रे काढली.. नव्वदीपर्यंतचे कृतार्थ, कलामय जीवन जगूनच त्यांनी गेल्या शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला.

अमृतलाल वेगड हे ‘नर्मदापुत्र’ म्हणूनच प्रख्यात होते. लेखक म्हणून त्यांना दोनदा – हिंदी आणि गुजराती या दोन भाषांसाठी- साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. महापंडित राहुल सांस्कृत्यायन पुरस्कारही लेखक म्हणूनच त्यांनी स्वीकारला होता; पण त्यांचे ‘नर्मदापुत्र’ असणे, लेखकपणावरही मात करणारे होते. एकाच नदीवर असे प्रेम करणारे साहित्यिक-चित्रकार त्यांच्याआधीही होऊन गेले आहेत. वॉल्डनकाठचा थोरो आहे, आनंदयात्री रवीन्द्रनाथ ठाकूर आणि त्यांची (आता बांगलादेशात गेलेली) ‘पद्मा’ नदी आहे.. यापैकी रवीन्द्रनाथांच्या ‘शांतिनिकेतन’मध्ये ते शिकले. त्या वेळी नंदलाल बोस तिथे होते. राष्ट्राची सांस्कृतिक उभारणी करण्याचे काम महत्त्वाचे आहे, हे या बोस यांनी जाणले होते. त्यासाठी लोकसंस्कृतीच्या खुणा महत्त्वाच्या मानल्या होत्या आणि निसर्गाशी नाते अपरिहार्य असल्याची खूणगाठ बांधली होती. अमृतलाल यांनी नंदलाल बोस यांच्याकडून संस्कार घेतला, तो निसर्गाशी नाते जोडण्याचा.

जबलपुरात अमृतलाल यांचे वडील कामानिमित्त येऊन राहिले. मूळचे कच्छचे हे वेगड कुटुंब तत्कालीन मध्य प्रांतात स्थिरावले. त्यामुळे अमृतलाल यांच्यावर बालपणापासूनच गुजराती आणि हिंदी या दोन्ही भाषांचे संस्कार झाले होते. आजचा मध्य प्रदेश आणि आजचे गुजरात ही दोन्ही राज्ये नर्मदेचा जल-आशीर्वाद लाभलेली. नर्मदा मध्य प्रदेशात अमरकंटक येथून सुरू होते आणि गुजरातेत भडोच येथे तिच्या खाडय़ा होतात. अमृतलाल वेगड यांनी जन्मभूमी ते पितृभूमी असा प्रवासही परिक्रमेच्या निमित्ताने केला, त्यातून सांस्कृतिक संचिताची झळाळी दोन्ही राज्यांत थोडय़ाफार फरकाने सारखीच आहे हेही त्यांना जाणवले आणि यातून ‘थोडूं सोनूं, थोडूं रूपुं’ हे लोककथांचे पुस्तक सिद्ध झाले.

नर्मदेवर निस्सीम प्रेम करणारे, लोककथांचे संकलन करणारे अमृतलाल नर्मदाकाठच्या आदिवासी जमातींनी महाप्रचंड सरदार सरोवर- इंदिरासागर प्रकल्पाविरुद्ध दिलेल्या लढय़ापासून मात्र अलिप्त राहिले. ‘नर्मदा समग्र ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेचे ते विश्वस्त आणि अध्यक्ष होते; पण गेली काही वर्षे त्यांचे पद नामधारीच राहून, भाजप प्रदेश सरचिटणीसांच्या हाती कारभार गेला होता.

माधवराव ,भिडे ,madhvarao ,bhide ,

माधवराव भिडे


5827   10-Jul-2018, Tue

रेल्वेतील मुख्य अभियंता पदावरून ५६व्या वर्षी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.

मराठी उद्योजकांमध्ये सहकाराची रुजवणूक करण्याचे आव्हान एका व्यक्तीने लीलया पेलले आणि तेही ‘अवघे होऊ  श्रीमंत’ अशा सनातन मराठी मानसिकतेला आव्हान देणारे ब्रीद घेऊन! माधवराव भिडे हे एक व्यक्ती नव्हे तर संस्थाच होते, हे त्यांचा कार्यपट पाहता निश्चितच म्हणता येईल. संघटनकौशल्य, माणसे जोडणारा जिव्हाळा, लोकसंपर्काची आस, एकदा ठरविलेला संकल्प तडीस नेणारा कामाचा उत्साह आणि ऊर्जा, पटकन कोणालाही मदतीसाठी तत्परता अशा साऱ्या गुणांचा समुच्चय म्हणजे माधवराव. ब्रिज इंजिनीअर असलेल्या माधवरावांनी मराठी उद्योजकतेत मैत्रीचा मजबूत पूल बांधला! ‘मी व्यावसायिक होईनच’ असे स्वप्न मराठी तरुणांनी पाहावे, उद्योग वाढवावा, संपत्ती निर्माण करावी आणि स्वत:बरोबरीने इतरांनाही मदतीचा हात देत मोठे करावे, अशा भूमिकेतून त्यांनी २००० सालात सॅटर्डे क्लबची स्थापना केली. या संस्थेच्या आज ४५हून अधिक शाखा आणि १,७०० उद्योजक सदस्यांनी त्याला मूर्तरूप देत खऱ्या अर्थाने मराठी उद्योजकतेचा स्वयंसाहाय्य गट कार्यान्वित केल्याचे दिसून येते.

खरे तर माधवरावांचा उद्योजकीय प्रवास हा सेवानिवृत्तीनंतरच सुरू झाला. रेल्वेतील मुख्य अभियंता पदावरून ५६व्या वर्षी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. तथापि पेन्शनवर गुजराण करीत स्वान्तसुखाय जगणे शक्य असताना, त्यांनी आंतरिक ऊर्मीला अनुसरून उद्योजकतेचा मार्ग चोखाळला. रेल्वेतील मुख्य अभियंता म्हणून कारकीर्दीत त्यांनी कमी खर्चात, सुदृढ, सुबक आणि टिकाऊ  बांधकामाचे अनेक प्रयोग यशस्वीरीत्या राबविले. दिवा- डोंबिवली- वसई रेल्वे मार्गाचा प्रकल्प तसेच वांद्रे-खार हार्बर मार्गाचा अंधेरीपर्यंत विस्तार आणि त्यासाठी ‘प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट’ पद्धतीचा पूल रेल्वेच्या इतिहासात प्रथमच बांधण्यात आला. निवृत्तिपश्चात अभियांत्रिकी आणि सनदी कामाच्या प्रदीर्घ ज्ञान-अनुभवाच्या भांडवलावर ‘भिडे असोसिएट्स’ या सल्लागार संस्थेचा डोलारा त्यांनी उभा केला. कामे इतकी वाढत गेली की अल्पावधीतच देशभरात त्याच्या १५ शाखा उभ्या राहिल्या. ध्येयकेंद्रित सामाजिकता अंगी असल्याने पुलांची उभारणी, त्यामागील अभियांत्रिकी आणि त्यांच्या सांस्कृतिक-आर्थिक महत्त्वाला अधोरेखित करणारी ‘दि इन्स्टिटय़ूट ऑफ ब्रिज इंजिनीअर्स (आयबीबीई)’ची स्थापना त्यांनी १९८९ साली केली. म्हणजे वयाच्या सत्तरीत, ज्या वयात अनेकांना जीवनाबद्दलचा ध्यास संपलेला असतो, त्या वयात माधवरावांनी दोन अत्यंत महत्त्वाच्या संस्थांची पायभरणी केली. नेतृत्वाची दुसरी तरुण फळी हेतुपुरस्सर निर्माण करीत या संस्थांची पाळेमुळे मजबूत पायावर रुजतील याचीही काळजी घेतली.

nobel winning scientist arvid carlsson

डॉ. अरविड कार्लसन


9674   09-Jul-2018, Mon

पार्किन्सन म्हणजे कंपवाताच्या रोगावर अजूनही इलाज सापडलेला नाही. त्यावर थोडेबहुत नियंत्रण ठेवता येईल अशी औषधे आहेत इतकेच. या औषधांमुळे काही प्रमाणात हा रोग नियंत्रित राहतो. या रोगावरील औषधे ज्यांच्या संशोधनातून तयार झाली अशा वैज्ञानिकांपैकी एक म्हणजे डॉ. अरविड कार्लसन. ते स्वीडिश वैज्ञानिक होते. त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना कंपवातावरील संशोधनासाठी नोबेलही मिळाले होते.

डॉ. कार्लसन यांचे संशोधन १९५० मध्ये मेंदूतील डोपॅमाइन या रसायनापासून सुरू झाले. त्या काळात डोपॅमाइनचे महत्त्व फारसे समजलेले नव्हते, पण हाच चेतासंवेदक एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे संदेश पाठवत असतो. कार्लसन यांनी डोपॅमाइन हे मेंदूच्या बॅसल गँगलिया भागात असते हे प्रथम सांगितले. हाच भाग शरीराच्या हालचाली नियंत्रित करीत असतो. डोपॅमाइन कमी झाले की शारीरिक हालचाली मंद होतात. त्यातूनच एल डोपा या औषधाचा शोध लागला, त्यामुळे मेंदूत डोपॅमाइन वाढवले जाते. कार्लसन यांनी हे सगळे प्रयोग सशांवर केले होते.

मेंदूतील संदेशवहनाचे गूढ शोधणाऱ्या डॉ. कार्लसन यांना इ.स. २००० मध्ये डॉ. एरिक कांडेल व डॉ. पॉल ग्रीनगार्ड यांच्यासमवेत नोबेल देण्यात आले.

स्वीडनमधील ल्युंड शहरात ते लहानाचे मोठे  झाले. त्यांची आई एमए झालेली होती. आईचा सामाजिक संशोधनाचा वारसा मुलाने विज्ञानात पुढे नेताना जगातील असंख्य लोकांचे आयुष्य अवघड करून टाकणाऱ्या पार्किन्सनवर संशोधन केले. दोन भाऊ मानव विद्या शाखेकडेच वळले असताना डॉ. कार्लसन यांनी बौद्धिक बंडखोरी करून वैद्यकशास्त्राचा मार्ग निवडला.  दुसऱ्या महायुद्धावेळी ते जर्मनीला गेले, तेथे अनेक ज्यू कैद्यांची मनाची अवस्था पाहून त्यांना आश्चर्य वाटले होते. नंतर १९५१ मध्ये कार्लसन वैद्यकीय डॉक्टर झाले व फार्माकॉलॉजीत डॉक्टरेटही पूर्ण केली. डॉक्टरकी व संशोधन यात त्यांनी संशोधन निवडले. नंतर अमेरिकेत बर्नार्ड ब्रॉडी या फार्माकॉलॉजिस्टच्या प्रयोगशाळेत त्यांनी जे संशोधन केले ते त्यांना नोबेलपर्यंत घेऊन गेले.

ब्रॉडी यांच्यामुळेच मी घडलो, असे कार्लसन यांनी नमूद केले आहे. ते अमेरिकेतून मायदेशी आले व नंतर एल डोपा औषधाचे प्रयोग केले, ते यशस्वी ठरले. कार्लसन हे गोथेनबर्ग विद्यापीठात प्राध्यापक होते. रॉयल स्वीडिश विज्ञान अकादमीचे सदस्य बनले. १९८४ मध्ये त्यांना जपानचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी शोधलेले एल डोपा हे औषध आजही कंपवातावर मोठय़ा प्रमाणात वापरले जात आहे, इतके त्यांचे संशोधन शाश्वत राहिले.

gst

वळणावळणाची वाट


6488   08-Jul-2018, Sun

देशभरातील विविध अप्रत्यक्ष कर व अन्य उपकर रद्द करून करसंकलनात व करप्रणालीत आमूलाग्र बदल घडविणाऱ्या दीर्घकाल प्रतिक्षित जीएसटीच्या (वस्तू व सेवाकर) अंमलबजावणीला एक जुलैला एक वर्ष पूर्ण झाले. आधीच्या सरकारच्या काळात प्रस्थावित या करप्रस्तावाची योजना विद्यमान सरकारच्या कालखंडात झाली. या कराच्या अंमलबजावणीची विविध अडचणींनी भरलेली पहिल्या वर्षाची वळणावळणाची वाट काही संपलेली नाही.

या करप्रणालीतील तरतुदी आणि त्याच्या अंमलबजावणीतील अडचणी यांचा एकत्रित आढावा घेतल्यास तो एक कटुगोड असाच म्हणायला हवा. एक देश एक कर अशी आकर्षक घोषणा करणाऱ्या या घोषणावंत सरकारने जीएसटीत केलेली अविचारी तरतूद आणि अंमलबजावणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या अभावाची न घेतलेली दखल यामुळे प्रारंभीचा प्रवास खूपच अडथळ्यांचा, गोंधळाचा आणि हताशेचा होता. केवळ व्यापारी आणि उद्योजक यांच्या पातळीवरच हे गोंधळ आणि हताशा नव्हती तर सरकारपातळीवरही तितकीच होती. दररोज निघणाऱ्या सुधारक परिपत्रके आणि घोषणांनी या गोंधळात भरच पडली. महिन्याला किती परतावे भरावेत, आंतरराज्यासाठी किती आणि कोणी भरावेत किंवा भरू नयेत, या कराच्या जाळ्यात कोण आहे आणि कोण नाही याबाबतचा संभ्रम देशातील उद्योगव्यापाऱ्यांपेक्षाही अर्थखात्याच्या बाजूने अधिक होता.

या कराच्या अंमलबजावणीचा इव्हेंट मोठा करण्याच्या नादात या छोट्या गोष्टी राहून गेलेल्या असू शकतात. तथापि, आता एक वर्ष पूर्ण होताना प्रारंभीचा हा गोंधळ बऱ्याच प्रमाणात दूर झाला आणि केंद्रीय अर्थखात्यालाही वस्तुस्थितीचा अंदाज आला असे संपूर्णपणे सुखद नसले तरी निःश्वासाचे चित्र नक्कीच आहे. निदान जीएसटीच्या अंमलापासून त्याच्या यशस्वितेबद्दल असलेल्या शंकांना विश्रांती मिळाली आहे. करांचे टप्पे, कर टप्पे लागू होणारी क्षेत्रे आणि उत्पादने यात सुरळीतपणा आला आहे. जकातनाके बंद झाल्याने मालवाहतुकीच्या वाहनांच्या लांबलचक रांगा गायब झाल्याने मालवाहतुकीला लागणाऱ्या वेळेत बचत होते आहे. कोणी किती वेळा परतावे भरावेत आदी गोंधळ संपले नसले तरी तो विषय पूर्वीइतका मोठा नाही, इथपत प्रगती झालेली आहे. या करप्रणालीच्या फायद्याबाबत कोणाला शंका नव्हती. असलीच तर अंमलबजावणीतील अस्थिरतेमुळे निर्माण झाली होती. ती दूर करण्याऐवजी सरकारने तीत भर घातल्याने गोष्टी गुंतागुंतीच्या झाल्या. एक देश एक कर म्हटले तरी त्याचे टप्पे विविध असल्याने त्यात भविष्यकाळात अजून सुधारणांना वाव आहे. तसेच, या कराशिवाय अन्य कोणतेही कर लागू होणार नाहीत असे अपेक्षित असताना आणि सरकारनेही असे आश्वासन दिले असताना, सरकारने उपकर लावणे काही थांबवले नाही. यात सर्वच व्यावसायिक आस्थापनांना करपरतावे भरण्यासाठी अंतर्भूत करून घेण्यात आल्याने करदाते वाढले आणि ते साहजिक आहे. तथापि, अद्याप अपेक्षित प्रमाणात कर जमा होत नाही हे वास्तवही दुर्लक्ष करता येणार नाही. कर भविष्यात वाढू शकतो असे आशादायक उद्गार काढण्याऐवजी त्यासाठी सुलभीकरणातून लाभ हे तत्त्व लागू होणे आवश्यक आहे. कारण भारतात करविषयक कायद्याचे पालन करण्यापेक्षा तो चुकवणे अधिक सोपे किंवा सोयीचे आहे.

डिजिटलीकरणामुळे तसे होणार नाही, हा भ्रम आहे हेही एव्हाना सगळ्यांना कळून चुकले आहे. त्यामुळे सरकारला या बाबतीत करभरणा लाभदायक ठरण्यासाठी तसे वातावरण निर्माण करण्यावर भर हवा. कारण या डिजिटलीकरणाचा गैरफायदाही घेतला जात असल्याचे खुद्द जीएसटी अधिकाऱ्यांनीच मान्य केले आहे. काही व्यावसायिकांनी मालपुरवठा न करता खोटी बिले सादर करून इनपुट टॅक्स क्रेडिटपोटी हजारो कोटी रुपयांची वसुली केल्याचे उघड झाले आहे. खरा आकडा याहून अधिक असल्याची भीतीही आहे. त्यासाठीच्या दुरुस्त्या करतानाच जीएसटी कर विवरणपत्रांचे अधिक सुलभीकरण होणे आवश्यक आहे. त्याद्वारे व्यावसायिकांचा त्रास कमी होणे महत्वाचे आहे, कारण तसे झाले तरच करसंकलन वाढेल.

दरमहा एक कोटी रुपयाच्या करसंकलनाचे लक्ष्य अद्याप गाठले गेलेले नाही. या पार्श्वभूमीवर त्या सुलभीकरणावर भर द्यावा लागेल. पुढील वर्षाच्या पहिल्या दिवसापासून जीएसटी विवरणपत्राचे नवे अर्ज अंमलात येतील, अशी अपेक्षा आहे. तसेच, पेट्रोल व डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याविषयीचा प्रश्नही सरकारने हाती घेतलेला नाही. त्यामुळे एक आदर्श करप्रणाली होण्यासाठी जीएसटीचा प्रवास काही संपलेला नाही. मात्र पुढच्या वर्षी तो अधिक सुरळीत असेल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. 

safety of investment

गुंतवणूक करताना टाळावयाच्या चुका


13770   08-Jul-2018, Sun

तुमच्या दीर्घकालीन गुंतवणुकीचे यश तुमचे ‘आतील शत्रू’ आणि ‘भावनिक सापळे’ यांच्यावर तुम्ही कशाप्रकारे नियंत्रण मिळवता त्यावर अवलंबून आहे. आनंदाची बातमी ही की, प्राध्यापक डॅन एरियली यांनी ‘प्रेडिक्टेबली इररॅशनल’ या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे माणसांची वागणूक ही सूचकपणे असंमजस असते. एकदा का आपण हे ‘आतील शत्रू’ ओळखले की त्यांचा सामना करण्याचा मार्गही आपण शोधू शकतो. विचारपूर्वक निर्णय घेणारा गुंतवणूकदार या सूचक असमंजस वागणुकीवर मात करून कुठल्याही गोंधळात विचलित न होता हुशारीने निर्णय घेतो आणि इतरांच्या ‘वागणुकीतील असमतोलाचा’ फायदा उठवतो.

एक महत्त्वाचा आतील शत्रू म्हणजे ‘फाजील आत्मविश्वास.’ वारंवार आपण आपली क्षमता, ज्ञान आणि कौशल्य यांना अतिमहत्त्वाचे समजतो. २४ तास चालणाऱ्या बातम्यांच्या वाहिन्या पाहून आणि त्यावरील ‘तज्ज्ञांना’ ऐकून आपण स्वत:लाच तज्ज्ञ समजू लागतो आणि कुठलाही सखोल विचार न करता गुंतवणुकीचे निर्णय घेतो. आपण असा विचार करायला लागतो की आपण दैनंदिन किमतीमधील चढ-उताराचा अजूक अंदाज वर्तवू व त्यानुसार गुंतवणूक करू. अतिआत्मविश्वासामुळे खूप जास्त ट्रेडिंग होते व चुकीचे गुंतवणुकीचे निर्णय घेतले जातात. यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत शून्याधारित दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे. गुंतवणूकदाराला इतके हुशार असायला हवे की चांगला परतावा देणारी त्याची गुंतवणूक लगेच विकायची नाही आणि तोटा देणारी गुंतवणूक जास्त काळ टिकवून ठेवायची नाही.

आणखी एक महत्त्वाचे, भावनिक सापळा आपल्याला टाळायला हवा. ‘कळपासोबत चालणे’ आपल्याला टाळता यायला हवे. स्वत:च्या ज्ञानाव्यतिरिक्त लोक मोठय़ा समूहाच्या कृतीचे अनुकरण करायला लागतात. मोठय़ा प्रमाणावर असलेल्या सामाजिक मर्यादांमुळे प्रत्यक्षात असलेली किंमत आणि मूल्य यामध्ये मोठा फरक राहू शकतो. कळपासारख्या या वागणुकीमुळे एखाद्या समभागासाठी नफ्याची मोठी संधी निर्माण होऊ  शकते. मात्र सामूहिक असमंजसतेचा लाभ ठरावीक समभाग किंवा बाजारासाठी उठविणे कठीण असते. आपल्यापैकी बहुतांश लोकांना कळपाचा हिस्सा बनण्याची मोठी इच्छा असते, स्वतंत्रपणे उभे राहणे हे सोपे नाही. मात्र जर आपण आपल्या या वागणुकीवर नियंत्रण मिळवू शकतो तर आपल्या गुंतवणुकीपासून चांगला परतावा मिळू शकतो. वॉरेन बफे यासंदर्भात सांगतात, ‘जेव्हा इतर लोक हावरट असतात तेव्हा आम्ही घाबरून राहण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा इतर लोक घाबरून असतात तेव्हा आम्ही हावरट राहण्याचा प्रयत्न करतो.’ हे प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या भावनांवर मोठय़ा प्रमाणात नियंत्रण मिळविण्याची गरज आहे.

संशोधनातून असे आढळून आले आहे की, वागणुकीतील चुकांमुळे गुंतवणुकीवरील परतावा १० ते ७५ टक्कय़ांपर्यंत कमी होऊ शकतो. हे टाळण्यासाठी तुम्हाला काय करण्याची गरज आहे? एका शब्दात हे सांगता येईल, शिस्त. प्रत्येकाला नेहमीच स्मार्ट होण्यावर लक्ष देण्याची गरज नाही. वॉरेन बफेंनी एकदा सांगितले आहे, ‘तुमच्या आयुष्यात अवघ्या काही गोष्टी तुम्हाला बरोबर करायच्या आहेत, जर तुम्ही खूप गोष्टी चुकीच्या करणार नसाल तर.’ जर तुम्ही मोठी चूक टाळू शकणार असाल तर योग्य निर्णय त्यांची काळजी घेईल.

महत्त्वाचे काय?

’  समभाग विकत घेताना आणि विकताना ‘चेकलिस्ट’ वापरा. ती नेहमी छोटी आणि वाजवी ठेवा

’  गुंतवणुकीपूर्वी आवश्यक ती खबरदारी घ्या. सुरक्षित मार्जिन ठेवा, कधीही अघळपघळ गुंतवणूक करू नका.

’  ‘विकत घ्या आणि सांभाळा’ या धोरणाचा अवलंब करा आणि ठरावीक कालावधीने त्याचा पडताळा करा. जितके कमी तुम्ही बाजारातील चढ-उतार पाहाल आणि तुमचा पोर्टफोलिओ तपासून पाहाल तितके कमी तुम्ही शेअर बाजारातील नैसर्गिक चढ-उतारांमध्ये भावनिकरीत्या निर्णय घ्याल.

’  दीर्घकालीन गुंतवणुकीचा निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. जर तुम्ही एखादा समभाग १० वर्षांसाठी ठेवणार असाल तर एखाद दिवसाचा परतावा गेला तरी फरक पडत नाही. जेव्हा तुम्हाला पॅनिक वातावरण जाणवते तेव्हा आणखी एखादा दिवस वाट पाहा. गुंतवणूक ही दीर्घकालीन दृष्टिकोनातून विचारपूर्वक केली असेल तर चांगल्या परताव्याची संधी नक्की मिळेल आणि भविष्यातही येईल.

’  संपत्तीचे विभाजन योग्यरीतीने करा आणि ठरावीक कालावधीनंतर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये समतोल राखत राहा.

’  नम्र राहा आणि तुमच्या चुकांपासून शिका. जेव्हा तुम्हाला यश मिळते तेव्हा कोणत्या गोष्टींमुळे यश मिळाले ते पाहा आणि कशामुळे नाही मिळाले हेही पडताळा. योगायोगाने मिळालेल्या यशाचे श्रेय घेऊ  नका. अयशस्वी ठरल्यावर ते पटवून देण्याचा प्रयत्न करू नका. त्याहून महत्त्वाचे म्हणजे अपयशातील दुर्दैवाचा भाग आणखी मोठा करून सांगू नका.

yoga education and opportunity

योगशिक्षण आणि संधी


6228   07-Jul-2018, Sat

गेल्या काही वर्षांपासून जून महिन्यात देशात आणि परदेशातही आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात येतो. आरोग्यदायी जीवनासाठी योगसाधना अत्यंत उपयोगी आहे. तणाव दूर करणे, मन:शांती कायम राखणे, प्रकृत्ती उत्तम ठेवणे यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे याकडे अधिकाधिक नागरिक वळत आहेत. यामध्ये करिअरचीही चांगली संधी आहे. भारत सरकारने योग प्रशिक्षणास कौशल्यविकास श्रेणीत टाकले आहे. योगगुरू होण्यासाठी चांगल्या संस्थेतून प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. ही संधी मोरारजी देसाई इन्स्टिटय़ूट ऑफ योगमुळे उपलब्ध झाली आहे.

योग शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि उपचार या बाबींशी निगडित असलेली आणि सरकारने स्थापन केलेली ही देशातील महत्त्वाची व आघाडीची संस्था होय. स्वायत्ताप्राप्त असलेली ही संस्था आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या संस्थेने पुढील पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

बॅचलर ऑफ सायन्स इन योग सायन्स – व्यावसायिक योग प्रशिक्षक निर्मितीसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरावा या दृष्टीने त्याची संरचना करण्यात आली आहे. तीन वर्षे कालावधीचा हा अभ्यासक्रस सहा सत्रांमध्ये विभाजित करण्यात आला आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांना योगप्रशिक्षकासाठी आवश्यक असणारे तंत्र आणि कौशल्य शिकवले जाते. तसेच यासंबंधातील विस्तृत ज्ञान दिले जाते. हा अभ्याकसक्रम नवी दिल्लीस्थित गुरू गोबिंदसिंघ इंद्रप्रस्थ विद्यापीठाशी संलग्नित आहे.

अर्हता- या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांला १२वी विज्ञान परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीन विषयांमध्ये सरासरीने किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक. तथापी प्रत्येक विषयामध्ये स्वतंत्ररीत्या उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. राखीव संवर्गातील उमेदवारांसाठी विद्यापीठाच्या नियमानुसार गुणांमध्ये सूट दिली जाते.

वयोमर्यादा- २१ वर्षे.

निवड प्रक्रिया- १२ वीमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. या यादीतील निवडक विद्यार्थ्यांना मुलाखत आणि वैद्यकीय चाळणीनंतर अंतिम निवड केली जाते. एकूण ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नॉनक्रीमी लेअर इतर मागास वर्ग संवर्गासाठी नियमानुसार जागा राखीव ठेवल्या जातात. हा अभ्यासक्रम इंग्रजीतून शिकवला जातो. या अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या २० टक्के विद्यार्थ्यांना वसतिगृहाची व्यवस्था पुरवण्यात येते. यासाठी त्यांना दरमहा ५ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. या अभ्यासक्रमाचे दरवर्षांचे शुल्क २७ हजार रुपये आहे.

फाउंडेशन कोर्स इन योगिक सायन्स फॅार वेलनेस – हा अभ्यासक्रम १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करता येतो.

कालावधी- ५० तास/एक महिना.

शुल्क- २ हजार रुपये.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्त्वावर ५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

सर्टिफिकेट कोर्स इन योगासन फॉर हेल्थ प्रमोशन – या अभ्यासक्रमाचा कालावधी ३ महिने. कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येतो. या विद्यार्थ्यांने या संस्थेचा योगविज्ञान विषयातील फाऊंडेशन अभ्यासक्रम वा इतर मान्यताप्राप्त संस्थेतील एक महिने कालावधीचा हा अभ्यासक्रम केलेला असावा. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय उपलब्ध करून दिली जात नाही. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्त्वावर प्रवेश दिला जातो.

अभ्यासक्रमाचे शुल्क-६५०० रुपये.

सर्टिफिकेट कोर्स इन प्राणायम अ‍ॅण्ड मेडिटेशन फॉर हेल्थ प्रमोशन –  या अभ्यासक्रमाचा कालावधी ३ महिने. कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येतो. या विद्यार्थ्यांने या संस्थेचा योग विज्ञान विषयातील फाऊंडेशन अभ्यासक्रम वा इतर मान्यताप्राप्त संस्थेतील एक महिने कालावधीचा हा अभ्यासक्रम केलेला असावा. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय उपलब्ध करून दिली जात नाही. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्त्वावर प्रवेश दिला जातो. हा अंशकालीन अभ्यासक्रम आहे.

शुल्क-६,५०० रुपये. ५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.


Top