playstore
Reliable Academy | Study Materials | कळंब ते दिल्ली व्हाया मुंबई, निवृत्त कंडक्टरचा मुलगा रवींद्र शेळके मागासवर्गातून प्रथम

कळंब ते दिल्ली व्हाया मुंबई, निवृत्त कंडक्टरचा मुलगा रवींद्र शेळके मागासवर्गातून प्रथम


कळंब ते दिल्ली व्हाया मुंबई, निवृत्त कंडक्टरचा मुलगा रवींद्र शेळके मागासवर्गातून प्रथम

एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता त्यात  राज्यात एकूण 420 उमेदवार अधिकारी झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील सेवानिवृत्त कंडक्टरच्या मुलाने दमदार कामगिरी केली. रवींद्र शेळके याने राज्यात सर्वसाधारण वर्गात दुसरा, तर मागासवर्गीयांमध्ये पहिला येण्याचा मान मिळवला. 

अपदेव शेळके हे कळंब एसटी डेपोत कंडक्टर म्हणून कार्यरत होते. नुकतेच ते सेवानिवृत्त झाले. एमपीएससीचा निकाल लागल्यापासून त्यांचा फोन 24 तास खणखणत आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांचा मुलगा रवींद्र शेळके याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात सर्वसाधारणमधून ‘असाधारण’ कामगिरी करत दुसरा तर मागास प्रवर्गातून पहिला येण्याचा मान मिळवला आहे. मुलगा अधिकारी झाल्याने अपदेव शेळके यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे.

रवींद्रमध्ये सुरुवातीपासूनच काहीतरी वेगळे करण्याची जिद्द होती. कळंबमध्ये शालेय शिक्षण पूर्ण करत लातूरला त्याने उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेत राज्यात सहावा येण्याचा मान त्याने मिळवला. मुंबईतील लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन एमबीबीएसची पदवी प्राप्त केली. खुलताबाद आणि पुणे येथे वैद्यकीय सेवा बजावत असताना दिल्लीला जाऊन स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली आणि त्याला यश मिळाले आहे. या यशाचे श्रेय रवींद्रने आपल्या आई वडिलांना दिले.

आई-वडिलांनाही आपल्या मुलाचे कौतुक आणि अभिमान वाटतो. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर फक्त मर्यादित क्षेत्रात राहून सेवा करण्याची संधी मिळते, म्हणून रवींद्रने स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि अधिकारी होण्याचं ठरवलं. आपला मुलगा अधिकारी झाल्याचा आनंद आई वडिलांच्या डोळ्यात स्पष्ट दिसतो.

मेहनत जिद्द आणि चिकटीच्या जोरावर माणूस काहीही साध्य करु शकतो याचं उत्तम उदाहरण रवींद्र शेळके आहे. आता यापुढे केंद्रीय लोकसेवा आयोगावर फोकस करुन आयएएस व्हायचं असं रवींद्रचं स्वप्न आहे.