playstore
Reliable Academy | Study Materials | प्राचीन भारत

प्राचीन भारत


प्राचीन भारत

आजच्या लेखामध्ये आपण ‘भारतीय इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ’ या घटकामधील प्राचीन भारत या महत्त्वाच्या मुद्याची पूर्वपरीक्षेसाठी तयारी कशी करावी यावर चर्चा करणार आहोत. या घटकावर २०११ ते २०२० मध्ये एकूण थेट २९ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि यातील  बौद्धयुग अथवा महाजनपदाचा कालखंड यावर सर्वाधिक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. या विश्लेषणामध्ये कला आणि संस्कृती संबंधित प्रश्न ग्रा धरलेले नाहीत. या घटकाची पुढील येणाऱ्या लेखामध्ये स्वतंत्रपणे चर्चा करणार आहोत.

गतवर्षीय परीक्षेत विचारण्यात आलेले कांही प्रश्न आणि त्यांचे स्वरूप

* २०२० मध्ये गुप्त कालखंडात घंटाशाळा, कादुरा आणि चौल हे शहरे कशासाठी प्रसिद्ध होते? अशोकाचे शिलालेख, बौद्ध धर्म इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते. यातील काही प्रश्न हे कला व संस्कृतीच्या पार्श्वभूमीशी संबंधित होते.

* २०१९ मध्ये राजा अशोकाचा उल्लेख असणारा शिलालेख, बौद्ध धर्मातील महायान पंथ, गुप्त काळातील विष्टी या प्रकाराची माहिती,  हडप्पा संस्कृतीतील ठिकाणे इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.

* २०१८ मध्ये भारतातील धार्मिक प्रथांच्या संदर्भात ‘स्थानकवासी’ संप्रदायाचा सबंध कशाशी आहे? हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नासाठी बौद्धधर्म,  जैन धर्म,   वैष्णव धर्म आणि  शैव धर्म हे चार पर्याय देण्यात आलेले होते.

* २०१७ मध्ये ‘भारताच्या धार्मिक इतिहासाच्या संदर्भात, खालील विधाने ग्रा धरा.’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यातील पहिले विधान होते, –  सौत्रान्तिका आणि सम्मितीय (Sautrantika and Sammitiya) हे जैन धर्माचे संप्रदाय होते. तर दुसरे विधान होते –  सर्वस्तीवादिन (Sarvastivadin) यांचे असे मत होते की अविष्काराचे घटक (constituents of phenomena) हे पूर्णता क्षणिक नाहीत पण  ते सदैव अव्यक्त स्वरूपात अस्तित्वात असतात. या दोहोपैकी कुठले विधान/विधाने योग्य आहे/आहेत. असा प्रश्न विचारण्यात आलेला होता.

* २०१६ मध्ये सर्वप्रथम अशोकाच्या शिलालेखाची उकल कोणी केली?असा प्रश्न विचारला होता. त्यासाठी पर्याय होते – जॉर्ज बुहलर, जेम्स प्रिन्सिप, मॅक्स म्युल्लर आणि विल्लिअम्म जोनेस.

या व्यतिरिक्त प्राचीन भारतातील श्रेणी व्यवस्था, परकीय प्रवाशाद्वारे प्राचीन भारताचे केलेले वर्णन यासारख्या बाबींवरही प्रश्न विचारण्यात आलेले होते.

* खालीलपैकी कोणत्या राज्याचा बुद्ध जीवनाशी संबंध होता? या प्रश्नासाठी अवंती, गांधार, कोशल आणि मगध असे चार पर्याय होते. हा प्रश्न २०१४ आणि २०१५ मध्ये मध्ये लागोपाठ विचारण्यात आलेला होता.

* २०१३ मध्ये बौद्ध धर्माशी संबंधित ‘निर्वाण’ या संकल्पनेवर प्रश्न विचारण्यात आलेला होता, तर वैदिक संस्कृतीवर २०१२ मध्ये ‘प्रारंभीच्या वैदिक आर्याचा धर्म कोणता होता?’ अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला होता. याच परीक्षेमध्ये ‘प्राचीन भारताच्या संदर्भानुसार जैन व बौद्ध धर्म  यांना काय एकसारखे होते?’  दुख: आणि आनंद या दोन्ही भावनाचा अव्हेर, वेदाबाबत अनास्था अथवा विरक्ती, आणि कर्मकांडाचे महत्त्व अमान्य. असे तीन पर्याय दिलेले होते.

* २०११ च्या परीक्षेमध्ये सिंधू अथवा हडप्पा संस्कृती वर दोन विधाने देऊन प्रश्न विचारण्यात आलेले होता. यातील पहिले विधान ‘धार्मिक गोष्टीचे अस्तित्व असूनही एक धर्मनिरपेक्ष संस्कृती होती’, आणि दुसरे विधान ‘या काळात कापूस वस्त्र निर्मितीसाठी वापरले जात होते.’

गतवर्षीच्या प्रश्न विश्लेषणावरून या विषयाची तयारी कशी करावी  याची एक स्पष्ट दिशा आपणाला निर्धारित करता येते. यातील जवळपास सर्व प्रश्न हे वस्तुनिष्ठ स्वरुपाचे आहेत. प्राचीन भारताचा अभ्यास करताना याचे विविध टप्प्यानुसार अथवा कालखंडनुसार विभागणी करून संबंधित कालखंडातील सामाजिक, धार्मिक ,आर्थिक आणि राजकीय घडामोडीचे व्यवस्थित आकलन करणे गरजेचे आहे.  या विषयाची एक व्यापक समज तयार करून अचूक पद्धतीने अभ्यास करावा लागतो. या विषयाची तयारी करण्यासाठी किती वेळ दयावा हे आधीच नक्की करणे गरजेचे आहे तसेच याची तयारी आपण फक्त पूर्वपरीक्षेसाठी करत असतो म्हणून पहिल्यांदा विषयाचा सर्वागीण अभ्यास करून स्वत: काढलेल्या नोटसची वारंवार उजळणी करणे गरजेचे आहे. जरी परीक्षेमध्ये या विषयावर कमी प्रश्न विचारले जात असले तरी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी जास्तीत जास्त प्रश्न अचूक सोडविणे गरजेचे आहे, त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण  होण्याच्या दृष्टीने नमूद अभ्यासक्रमामधील प्रत्येक घटकाची योग्य तयारी करणे अपरिहार्य आहे याची जाणीव असणे गरजेचे आहे.

या पुढील लेखामध्ये आपण ‘मध्ययुगीन भारत’ या घटकाचा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा सर्वागीण आढावा घेणार आहोत.

संदर्भसाहित्य

या घटकाची तयारी करण्यासाठी कोणते संदर्भसाहित्य वापरावे याची चर्चा करू. या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकाचा आधार घ्यावा लागतो आणि या घटकाचे स्वरूप हे पारंपरिक असल्यामुळे अचूक माहिती अभ्यासणे गरजेचे आहे ज्यासाठी आपणाला एनसीईआरटीची  इयत्ता – ८ वी ते १२ वीची इतिहासाची पुस्तके वाचावी लागतात. ज्यामध्ये विशेषकरून इयत्ता १२ वीचे Themes in Indian History part- I   हे पुस्तक वाचावे लागते तसेच याच्या जोडीला आर.एस.शर्मा लिखित प्राचीन भारत या वरील एनसीईआरटीचे जुने पुस्तक वाचणे आवश्यक आहे. या विषयावरील अनेक संदर्भग्रंथ बाजारात उपलब्ध आहेत. पण परीक्षाभिमुख पद्धतीने सखोल अभ्यास करण्यासाठी काही निवडक संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करावा लागतो.  ज्यामध्ये   Early India – रोमिला थापर आणि  A History of Ancient and Early Medieval India   उपेंद्र सिंग इत्यादी ग्रंथांचा वापर करणे अधिक उपयोगाचे ठरू शकते.