playstore
Reliable Academy | Study Materials | तहसीलदार

तहसीलदार


तहसीलदार

शासनाच्या तहसिलीचा प्रमुख अधिकारी असतो.

तहसील म्हणजे वसूली. त्यामुळे तहसीलदार म्हणजे ग्रामीण जनतेकडून कर वसूल करणारा अधिकारी. ग्रामीण म्हणण्याचा उद्देश असा की, इतर प्रकारच्या जनतेकडून कर वसूल करण्यास अन्य अधिकारी असतात.

जिल्ह्याच्या ज्या तुकड्याला आपण मराठीत तालुका म्हणतो त्याला हिन्दीत तहसील म्हणतात. त्यामुळे तहसीलदार हा तालुक्याचा सर्वोच्च नागरी अधिकारी असतो. त्याला इंग्रजीत मामलतदार आणि मराठीत मामलेदार म्हणतात.

मामलेदाराची नेमणूक राज्य लोक सेवा आयोगाकडून होते

मामलेदार करवसूलीव्यतिरिक्त तालुक्यातली इतर अनेक सरकारी कामे करतो.

तो प्रसंगी दिवाणी दाव्यांमध्ये न्यायदानही करतो.

महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अन्वये राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक ‘तहसीलदार’ नेमते.

तहसीलदारालाच ‘मामलेदार’ असेही नाव प्रचलित आहे. हे गट ‘अ’ प्रकारचे पद आहे.

जमीन महसूलाबाबत कोणताही अर्ज सर्वप्रथम तहसीलदारासमोर येतो. त्यावर त्याने योग्य निर्णय घेतल्यावरच तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जातो.

जमीन महसुलाशिवाय पिकांची आणेवारी काढणे ही महत्त्वाची जबाबदारी तहसीलदारावर असते. या आणेवारीच्या आधारेच दुष्काळाची स्थिती जाणून घेऊन त्याची घोषणा केली जाते. यानंतर सरकारने नियमांनुसार निश्चित केलेली नुकसानभरपाई तहसीलदाराच शेतकऱ्यांपर्यंत पोहचवतो.

तालुक्यातून गौण खनिजांचे उत्खनन करायचे असेल (उदा. वाळू) तरी तहसीलदाराची परवानगी घ्यावी लागते. ‘बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या लोकांवर कारवाई करायला गेल्यावर तहसीलदारावर हल्ला झाला,’ अशा बातम्या वर्तमानपत्रात नेहमी वाचायला मिळतात. त्यातून तहसीलदार पदाचे महत्त्व दिसते. स्वस्त धान्य दुकानांवर देखरेख ठेवणे व काळाबाजार रोखणे ही कामेही तो करतो.

तहसीलदार तालुका दंडाधिकारी म्हणून देखील काम करतो. कायद्याची पदवी न घेताही तो अर्ध न्यायिक जबाबदाऱ्या पार पाडतो. त्यात समन्स पाठवणे, प्रसंगी अटक वॉरण्ट काढणे, दंड करणे असे अधिकार येतात.नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी यांना मार्गदर्शन करणे, वेळोवेळी आपल्या कार्याचा अहवाल प्रांताधिकाऱ्यांकडे सादर करणे आणि तालुक्यात नैसर्गिक संकट आल्यास त्यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे त्वरित सादर करणे, ही कामे तहसीलदारास करावी लागतात.

तहसीलदाराचे महत्त्व

वरील जबाबदाऱ्यांचे बारकाईने अवलोकन केले तर लक्षात येईल की ज्याला आपण सरकार म्हणतो त्याचे दृश्यरूप म्हणजे तहसीलदार आहे.

विशेषत: ग्रामीण भागात तहसीलदार हा तालुक्यातील प्रशासन व्यवस्थेचा केंद्रबिंदू ठरतो. तहसील कार्यालय पूर्णपणे त्याच्या हाताखाली काम करते. एकप्रकारे जिल्ह्यात जे स्थान जिल्हाधिकाऱ्याचे, तितकेच किंबहुना त्याहून महत्त्वाचे स्थान तालुक्यात तहसीलदाराचे आहे.

हे पद जितके जबाबदारीचे तितकेच अधिकार देणारे आहे. म्हणून कधीकधी या पदावरून बढती घ्यायलादेखील अधिकारी नाखूष असतात.