playstore
Reliable Academy | Study Materials | उपजिल्हाधिकारी

उपजिल्हाधिकारी


उपजिल्हाधिकारी

उपजिल्हाधिकारी

हे राज्य सेवेतील सर्वोच्च पद आहे.

ते वर्ग एक (class I) मध्ये मोडते.

दोन प्रकारे या पदापर्यंत पोहचता येते, बढतीने व सरळ सेवा प्रवेशाने.

या पदाचे वैशिष्ट हे की १५ ते २० वर्षे सेवा झाल्यावर काही निकष पूर्ण केले असतील तर भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) प्रवेश मिळतो. ही गोष्ट या पदाचे आकर्षण वाढवते.

यूपीएससीची परीक्षा देऊन जेव्हा आयएएस मिळते तेव्हा केडर म्हणून भारतातील कोणतेही राज्य मिळते. पण काहींना राज्यातच काम करायची इच्छा असते. त्यांच्यासाठी आधी जिल्हाधिकारी बनून मग आयएएस बनणे हा थोडा लांबचा पण इच्छापूर्ती करणारा प्रवास ठरतो.

मार्गातील खाचखळगे

आयएएसचे मिळणे हे जरी आकर्षक असले तरी ते नक्की किती वर्षांत साध्य होईल हे निश्चित नसते. यूपीएससी कडून थेट भरती झालेल्या अधिकाऱ्यांची पदोन्नती जशी विशिष्ट कालक्रमाने होत जाते तसे इथे होत नाही.

राज्यात जेव्हढी आय. ए. एस. ची पदे उपलब्ध असतील तर त्यात दोन वाटे केले जातात. पहिला वाटा राज्यसेवा परीक्षा देऊन आलेले (आतले) इच्छुक यांना जातो.

दुसरा वाटा जे यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन थेट राज्य केडर मिळवून दाखल होतात त्यांना जातो. पहिला वाटा जो असतो त्याला गट अ व गट ब या दोन्ही सेवांना प्रयत्न करायची संधी असते. साधारणपणे दोन तृतीयांश पदे गट अ मधून भरली जातात व उरलेली एक तृतीयांश पदे गट ब मधून भरली जातात. ज्या अधिकाऱ्यांना आयएएसमध्ये बढती द्यायची आहे त्यांची शिफारस राज्य सरकार करते. ही शिफारस करण्यापूर्वी अधिकाऱ्यांचा सेवा पूर्वेतिहास (service record) पहिला जातो. तो ज्यांचा समाधानकारक आहे त्यांची एक यादी बनवली जाते. मग या यादीतील अधिकाऱ्यांची एक छोटी लेखी परीक्षा घेतली जाते व नंतर मुलाखत घेतली जाते. अशा प्रकारे एक शिफारसीची अंतिम यादी बनवून यूपीएससी कडे सोपवली जाते.

यूपीएससी या उमेदवारांची मुलाखत घेते व त्यातून अंतिम नेमणूक होते. काहीजण लवकर आय. ए. एस. मध्ये शिरतात तर काहींना वेळ लागू शकतो. सगळ्यांना ते पद मिळेलच असेही नाही. त्यामुळे प्रत्येक उपजिल्हाधिकारी आय. ए. एस. या प्रतिष्ठित सेवेपर्यंत पोहोचतोच असे नाही.

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या

उपजिल्हाधिकारी हा उपविभागीय अधिकारी म्हणून काम करतो. ते करताना त्या उपविभागात शांतता व सुव्यवस्था राखणे, निर्वाचन अधिकारी म्हणून काम करणे व महसुली वसुलीचा आढावा घेणे या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. तो त्या उपविभागाचा प्रशासक किंवा सेनापती असतो. याशिवाय विविध खात्यांचा उपजिल्हाधिकारी म्हणूनही नेमणूक होऊ शकते. उदा. पुनर्वसन, रोहयो, राज शिष्टाचार इत्यादी.

एकूण पंधरा प्रकारच्या प्रमुख पदांवर त्याची नेमणूक होऊ शकते. ही कामे करताना त्या खात्याचा इतर खात्यांशी समन्वय साधणे, ठरलेली उद्दिष्टे पूर्ण करणे व त्यासंबंधी अहवाल तयार करणे या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.

उपजिल्हाधिकारी हा निवासी जिल्हाधिकारी म्हणूनही नेमला जाऊ शकतो. ते काम करताना सर्व खाती, जिल्हाधिकारी व तहसीलदार केंद्र व राज्यांचे विभाग यांच्यात समन्वय साधण्याची कसरत त्याला करावी लागते. शिष्टमंडळांना भेटणे, मोर्चाला सामोरे जाऊन परिस्थिती सांभाळणे ही कामेही करावी लागतात.

जिल्हाधिकाऱ्याच्या अनुपस्थितीत जिल्हा प्रशासनात सुसूत्रता ठेवण्याची जबाबदारीही निवासी जिल्हाधीकाऱ्यावर असते.

याशिवाय उपजिल्हाधिकाऱ्याची प्रतिनियुक्तीवर MIDC, CIDCO, MHADA अशा स्वायत्त मंडळांवरही नेमणूक होऊ शकते. यातून हे दिसते की उपजिल्हाधिकाऱ्याचे काम वैविध्यपूर्ण असते. या जबाबदाऱ्या सांभाळताना सावधानता, प्रशासन कौशल्य यांचा कस लागतो.