playstore
Reliable Academy | Study Materials | अभ्यासात सातत्य ठेवा

अभ्यासात सातत्य ठेवा


अभ्यासात सातत्य ठेवा

एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आदमापूर (ता. भुदरगड) येथील डॉ. दीपाली भोसले यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. त्यांची मुख्याधिकारी या पदावर वर्णी लागली. नियमित अभ्यास, वाचन-मनन आणि स्वयंअध्ययनाच्या बळावर आपण हे यश मिळविल्याचे त्यांनी सांगितले. स्वयंअध्यनाबरोबरच अभ्यासात सातत्यठेवल्यास हमखास यश मिळू शकते असा सल्लाही त्यांनी दिला.

आतापर्यंतच्या शैक्षणिक प्रगतीबाबत काय सांगाल?

माझे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण आजरा हायस्कूल, आजरा येथे झाले. दहावीला मला ८८.९३ टक्के गुण मिळाले. बारावीचे शिक्षण आजरा महाविद्यालयात झाले. बारावीमध्ये मला ८०.६७ टक्के गुण मिळाले. त्यानंतर डॉ. जे. जे. मगदूम होमिओपॅथिक कॉलेज, जयसिंगपूर येथे बीएचएमएस पूर्ण केले. माझे वडील कृषी खात्यात वरिष्ठ लिपिक होते. सध्या ते सेवानिवृत्त आहे. भाऊ संतोष डॉक्टर असून, आई गृहिणी आहे.

व्यावसायिक शिक्षण घेऊनही शासकीय सेवेत जाण्याची प्रेरणा कशी मिळाली?

प्रशासकीय सेवेत जायची पूर्वीपासूनच इच्छा होती. वडील लहानपणी म्हणायचे तू मोठी अधिकारी हो. त्यामुळे शालेय शिक्षण घेत असतानाच प्रशासकीय सेवेत जाण्याचा निश्चय केला. याशिवाय सर्वोत्तम करिअरचा पर्याय म्हणून व्यावसायिक शिक्षणाशिवाय अजून काही तरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे मी प्रशासकीय सेवेकडे वळले.

पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेचा अभ्यास कसा केला?

अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी जुन्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप व प्रश्नांचा पॅटर्न यांचा अभ्यास केला. त्यानुसार सखोल वाचन व स्वतःच्या नोट्स काढल्या. रेडिमेड नोट्सपेक्षा संदर्भ पुस्तके वापरून स्वतः नोट्स काढल्या. नियमित वर्तमानपत्रांचे वाचन केले. तसेच चिंतन व मननावर भर दिला. दररोज दहा ते बारा तास नियमित अभ्यास, मराठी, इंग्लिश निबंध, सारांश, भाषांतर याचा सराव केला.इंटरव्ह्यूची तयारी कशी केलीस?

इंटरव्यूसाठी ए. बी. फाउंडेशन तसेच अतिग्रे सरांचे मार्गदर्शन लाभले. वैयक्तिक माहिती, ग्रॅज्युएशन, राज्य सेवेतील पदांची माहिती, चालू घडामोडी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, स्थानिक समस्या या विषयांच्या अनुषंगाने प्रश्नावली तयार करून प्रश्नोतरे लिहून काढली. बोलण्याचा सराव केला. त्यासाठी भूमिअभिलेखच्या उपअधीक्षक पल्लवी उगले यांचे मार्गदर्शन लाभले.

पुढचे ध्येय काय?

राज्यसेवेतील सर्वोच्च पद मिळविणे तसेच यूपीएससी देण्याचीही इच्छा आहे. त्यासाठी मी प्रयत्न करत आहे.

तुझे आदर्श कोण? आणि तुला कोणाचे मार्गदर्शन लाभले?

माझे आई-वडील, कुटुंबीय आणि आयुष्यात संघर्ष करून सर्वोच्च पदावर गेलेल्या व्यक्ती हेच माझे आदर्श आहेत. कारण त्यांच्याकडून शिकण्यासारखे भरपूर असते. जयवंत उगले, पल्लवी उगले, इंद्रजित देशमुख, दीपक तोरस्कर, विलास पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग प्रशासकीय सेवेत कसा करणार?

जेथे पोस्टिंग मिळेल, त्या ठिकाणी लोकांच्या आरोग्याच्या काय समस्या आहेत व त्यावर काय उपाययोजना करता येतील याचा अभ्यास करून तातडीने समस्या सोडविण्याला प्राधान्य देईन.

ग्रामीण भाग आणि महिला म्हणून काय अडचणी येतात?

ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षेसाठी फारसे मार्गदर्शन मिळत नाही. मात्र, परीक्षेचे स्वरूप समजून घेऊन अभ्यासाची तयारी केली की, आपण ग्रामीण भागात राहतो की शहरात याचा काही परिणाम होत नाही. एक महिला म्हणून तर काहीच फरक पडत नाही. कारण मुली मुलांपेक्षा अधिक जिद्दी असतात. अभ्यासात नियमितता, जिद्द, संयम असल्यास यश नक्की प्राप्त होते. शिवाय कुटुंबीयांचे सहकार्य व प्रोत्साहन मोलाचे ठरते.