Reliable Academy | Study | पीएसआय होऊन पुसला “ढ” शिक्का...
पीएसआय होऊन पुसला “ढ” शिक्का...

11 Sep 2020


पीएसआय होऊन पुसला “ढ” शिक्का...

तब्बल ९ वेळा (बारावीला ५ वेळा आणि डिप्लोमाला ४ वेळा) नापास झालेल्या श्रीकांत नेवेची कहानी....

हातलावल्यावर सोन्याची माती व्हावी, त्याप्रमाणे त्याला प्रत्येक परीक्षेत अपयश आले. नापासाचा शिक्का माथी चिकटवून फिरणे लाजिरवाणे वाटू लागले.शेवटी एक दिवस त्याच्यातील आत्मविश्वास परत आला. “ढ” विद्यार्थ्याचा शिक्का पुसून आज तो चक्क “पीएसआय” झाला आहे.

श्रीकांतचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जळगाव शहरातील न्यू इंग्लीश स्कूलमध्ये झाले.दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने मोठया हिमतीने व पुढे जाऊन मोठे होण्याच्या उर्मीने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. दुर्दैवाने चांगल्या प्रयत्नानंतरही तो बारावीची परीक्षा अनुतीर्ण झाला.अपयशाने पहिला धक्का दिल्यानंतर, त्याच्यातील होता नव्हता सर्व आत्मविश्वास गळून पडला. तरीही त्याने धीर धरून पुणे येथे दहावीच्या गुणांवर एरोनॉटिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला.मात्र प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कळले,की त्या डिग्रीला कुठेच मान्यता नाही.

शेवटी जळगावात येवून मेकॅनिकलच्या डिप्लोमाला प्रवेश घेतला. मनातील आत्मविश्वास कमी झाल्याच्या स्थितीत दोन वर्षा नंतरही कॉलेज मधील शिकविलेले सर्व डोक्यावरून जाते आहे, हे लक्षांत घेऊन त्याने डिप्लोमाला रामराम केला.दरम्यानच्या काळात पुन्हा बारावीची परीक्षा देऊन पहिली, तेथेही अपयश आले. या सर्व घडामोडीत तब्बल नऊवेळा (बारावी पाचवेळा व डिप्लोमा चारवेळा) नापास झालेल्या शिकांतवर घरच्यांनीही विश्वास ठेवणे बंद केले.

सुदैवाने श्रीकांत मध्ये दळलेल्या आत्मविश्वासाचा निखारा कुठेतरी धगधगत होता.तो विझण्यापूर्वीच त्याने आपले नेमके चुकते तरी काय, यावर चिंतन केले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेऊन बी.ए. चे शिक्षण घेण्याचा ध्यास घेतला.घरच्यांनी सहकार्य करणे सोडून दिल्याने, शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी टेलिफोन बूथ, स्थानिक वृत्त वाहिनीवर उद्घोषक म्हणून काम केले.ऑडीओ जाहिरातींना background व्हाईस दिला. वृतनिवेदक म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सिंघल यांची मुलाखात घेतल्यानंतर त्याच्यात स्पर्धा परीक्षेची ओढ निर्माण झाली.आवश्यक तो अभ्यास करून दोनवेळा राज्यसेवा पूर्व व एकवेळ मुख्य परीक्षा तसेच उपनिरीक्षक, विक्रीकर निरक्षकाची परीक्षा दिली.मात्र या सर्व परीक्षामध्ये अपयशच पदरी पडले. अखेर आरपार ची लढाई समजून त्याने तिसऱ्या प्रयत्नात यशश्रीला आपलाल्याकडे खेचून आणली. हुलकावणी देणाऱ्या यशाने त्याच्या अंगावर “पीएसआय” ची वर्दी चढवली.

मुलाने नाव ठेवणाऱ्याना तोंडात बोट घालायला लावले म्हणून श्रीकांतचे वडील भास्कर नेवे यांचा आनंद गगनात मावला नाही. अधूनमधून आर्धिक पाठबळ देणाऱ्या मोठ्या भावालाही आपले पैसे सार्थकी लागल्याबद्दल समाधान वाटले.....